Future Goals of the Nationalist Congress Party (NCP) Sarkarnama
विश्लेषण

Sunil Tatkare: ‘महाराष्ट्र धर्म’ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया! राज्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहू!

Future Goals of the Nationalist Congress Party (NCP): सामाजिक सलोखा आणि सामाजिक बंधुभावाने ‘महाराष्ट्र धर्म’ ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया आहे.सामान्य प्रशासन विभागाने पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

सुनील तटकरे

(प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)

महाराष्ट्राने गेल्या ६५ वर्षांत मोठे यश मिळवले असले, तरी काही आव्हानेही समोर आहेत. शहरीकरणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी आणि सामाजिक असमानता ही काही प्रमुख मुद्दे आहेत. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती आणि शहरी भागात वाढते स्थलांतर यामुळे प्रशासनावर ताण येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस या आव्हानांना तोंड देण्यासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही आमची प्राथमिकता आहे. इतर अनेक प्रमुख क्षेत्रांत आम्ही ठोस पावले उचलत आहोत.

आगामी पाच वर्षांच्या काळात सत्तेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. त्यासाठी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी आर्थिक मदत ही महिलांच्या आर्थिक विकासासाठी पूरक ठरावी, यासाठी पक्ष प्रयत्न करणारा आहे. या पैशातून महिलांनी उद्योग सुरू करून कायमस्वरूपी आर्थिक सक्षम व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. त्यासाठी पक्ष पाठपुरावा करणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सहानुभूती बाळगून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले कृषी क्षेत्र अधिक सक्षम व्हावे यासाठी पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा मानस आहे.

त्यासाठी शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतमालाची अधिकाधिक निर्यात व्हावी यासाठी पक्ष सत्तेच्या माध्यमातून सुयोग्य धोरणांचा अवलंब करणार आहे. त्याचबरोबर निर्यातीची प्रक्रिया सुकर आणि सर्वसमावेशक व्हावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून धोरण सुलभता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यसेवा अधिक चांगल्या पद्धतीने पुरविणे यासाठी नवीन योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यावर आगामी काळात भर राहणार आहे. त्यासाठी सुसज्ज ग्रामीण रुग्णालये, तज्ञ डॉक्टर आणि औषधांचा व्यवस्थित पुरवठा या गोष्टी करताना शेतकऱ्यांना आरोग्य सुविधांबरोबरच विमा सुरक्षा कशी देता येईल, याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत.

शेती-उद्योगाला प्राधान्य देणार

शेतकऱ्यांना मोफत वीज देताना, दिवसा वीज देण्याचा प्रयत्न सुरु आहे. जेणे करून शेतकऱ्याला रात्री अपरात्री पिकाला पाणी देण्याची वेळ येऊ नये. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करून वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यावर भर राहणार आहे.

जेणेकरून शेतमाल वेळेत बाजारात पोहचणे शक्य होईल. त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला वेळीच बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होणे शक्य होईल. उद्योगांच्या बाबतीत आपले राज्य नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. ते यापुढेही राहावे, यासाठी विशेष प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून पक्ष करणार आहे.

नवीन उद्योग राज्यात यावेत यासाठी उद्योगांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत. त्याचबरोबर छोट्या उद्योगांना चालना मिळावी, सुशिक्षित तरुणांकडून अधिकाधिक स्टार्टअप राज्यात सुरु व्हावेत, यासाठी त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न आगामी काळात करण्यात येणार आहेत.

राज्यातील तरुणांना रोजगार मिळाले पाहिजेत, उद्योग वाढले तर रोजगार उपलब्ध होणार आहेत.त्यासाठी काही जिल्ह्यामध्ये ओद्योगिक नागरी विकास करता येणे शक्य आहे, त्याठिकाणी तास प्रयत्न राहणार आहे.

सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका

अल्पसंख्याक समाजाच्या भावना विचारात घेता त्यांच्यावर केवळ संख्येने कमी असल्याने अन्याय होऊ नये, यासाठी पक्षाचा कटाक्ष राहणार आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा सांगताना आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी वाटचाल करताना पक्षप्रमुख अजित पवार यांनी वेळोवेळी हे दाखवून दिले आहे.

मुस्लिम समाजाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट असल्यानेच पक्षाने या समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर महायुतीमध्ये राहताना मित्रपक्षांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला विरोध केला नसला, तरी मुस्लिमावरील अन्यायाबाबत अजित पवार यांनी तत्काळ नाराजी व्यक्त करत आपली सर्वसमावेशक भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यामुळे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची सर्वसमावेशक भूमिका यापुढेही पक्ष कायम राखणार आहे. पक्षाने गेल्यावर्षी काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व पक्षाच्या लतीफ तांबोळी या मुस्लिम कार्यकर्त्यांकडे दिले होते. त्यामुळे आमच्या पक्षाच्या भूमिकेबाबत आम्ही ठाम राहणार आहोत.

सामाजिक-सांस्कृतिक योगदान

महाराष्ट्र हा संत, समाजसुधारक आणि क्रांतिकारकांचा देश आहे. संत ज्ञानेश्वर, तुकोबा, नामदेव यांच्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले, संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत या भूमीने देशाला नेहमीच दिशा दाखवली आहे.

महाराष्ट्राने सामाजिक समतेसाठी आणि शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, तर डॉ. आंबेडकरांनी दलित आणि वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले आयुष्य वाहिले. मराठी साहित्यानेही जगभरात आपली छाप पाडली आहे.

आर्थिक व औद्योगिक प्रगती..!

महाराष्ट्र हे भारताच्या आर्थिक प्रगतीचा मेरुदंड आहे. मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, ही जागतिक व्यापार आणि आर्थिक चळवळीचे केंद्र आहे. गेल्या ६५ वर्षांत, महाराष्ट्राने औद्योगिक, कृषी आणि सेवा क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर यांसारख्या शहरांनी आयटी, ऑटोमोबाईल आणि उत्पादन क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्राने स्टार्टअप्स आणि नवउद्योजकतेलाही प्रोत्साहन दिले आहे, ज्यामुळे तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.

कृषी क्षेत्रातही महाराष्ट्राने आपली ताकद दाखवली आहे. ऊस, कापूस, द्राक्षे आणि संत्री यांसारख्या पिकांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. सहकारी चळवळीने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सहकारी बँकिंग आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना दिली. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ..!’ हे सहकाराचं ब्रीद घराघरात पोहचले असून, ‘विना सहकार नाही उध्दार’ ही भावना रूजल्याने संयुक्त महाराष्ट्र एकोप्याने आर्थिक प्रगती करत आहे.

राजकीय नेतृत्व आणि प्रशासन..!

महाराष्ट्राने देशाला नेहमीच सक्षम नेतृत्व दिले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बॅ.ए.आर.अंतुले, शरद पवार यांसारख्या नेत्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याची स्थापना १९९९ मध्ये झाली हा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. पक्षाने शेतकरी, कामगार आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे.

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेला सर्वोच्च मानत आमचे नेते अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. सामाजिक सलोखा आणि सामाजिक बंधुभावाने ‘महाराष्ट्र धर्म’ ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया आहे. महाराष्ट्राचे प्रशासनही देशात अग्रेसर आहे. सामान्य प्रशासन विभागाने पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासनासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत. ई-गव्हर्नन्स, डिजिटलायझेशन आणि नागरिक केंद्रित सेवांमुळे महाराष्ट्राने प्रशासकीय सुधारणांमध्ये आघाडी घेतली आहे.

एकता आणि प्रेरणेचा उत्सव

महाराष्ट्र दिन हा केवळ इतिहासाची आठवण करून देणारा दिवस नाही, तर भविष्याकडे पाहण्याचा आणि नव्या संकल्प करण्याचा प्रसंग आहे. शिवाजी पार्कवरील परेड, राजकीय भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमुळे हा दिवस मराठी माणसाच्या हृदयात विशेष स्थान राखतो. १९६० मध्ये पहिल्या महाराष्ट्र दिनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राच्या नव्या नकाशाची झलक दाखवली होती, आणि लता मंगेशकर यांच्या स्वरांनी ‘‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’’ हे गीत गायले होते. तीच प्रेरणा आजही आम्हाला पुढे नेणारी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच मराठी माणसाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. आमचा पक्ष सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत. युवकांना रोजगार, महिलांना सक्षमीकरण आणि वंचितांना मुख्य प्रवाहात आणणे ही आमची ध्येय आहेत.

थोडक्यात काय तर, महाराष्ट्र हा केवळ एक भौगोलिक प्रदेश नाही, तर एक विचार आहे, एक संस्कृती आहे, एक स्वप्न आहे. गेल्या ६५ वर्षांत महाराष्ट्राने आपल्या कर्तृत्वाने देशाला दिशा दाखवली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून आजच्या आधुनिक महाराष्ट्रापर्यंत, हा प्रवास प्रेरणादायी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रवासाचा एक अभिन्न भाग आहे आणि पुढील काळातही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध राहू. १ मे २०२५ हा ६५ वा महाराष्ट्र दिन आम्हाला नव्या संकल्पाची प्रेरणा देतो. मराठी माणसाच्या स्वप्नांना नवे पंख देऊन, एक समृद्ध, समतावादी आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा आमचा संकल्प आहे. ‘‘गर्जा महाराष्ट्र माझा!’’ ही घोषणा आजही आमच्या हृदयात नवचैतन्य निर्माण करते.

६५ वर्षांचा गौरवशाली प्रवास

एक मे हा दिवस महाराष्ट्रासाठी विशेष असतो. हा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, एकतेचा आणि गौरवशाली इतिहासाचा उत्सव आहे. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नाला मूर्त रूप मिळाले आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यंदा महाराष्ट्राच्या स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण होत असताना या गौरवशाली प्रवासाचा अभिमान वाटतो.

एक मे १९६० रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने आपल्या विकासाचा पाया रचला. मुंबई ही केवळ आर्थिक राजधानीच नव्हे तर मराठी अस्मितेचे प्रतीक बनली. हा दिवस मराठी माणसाच्या एकतेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा उत्सव आहे. याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक मे ते चार मे दरम्यान ‘‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५’’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास नव्या पिढीपुढे मांडणारा हा महोत्सव असून महाराष्ट्राची परंपरा, विचारधारा, संस्कार, संस्कृती आणि देशपातळीवर महाराष्ट्राचा अभिमान उंचावणारे महापुरूष, संत विभूतींसह भारतरत्न, ज्ञानपीठ विजेते, भारतरत्न, महाराष्ट्र भूषण अशा महाराष्ट्रातील रत्नांचा गौरव करणारा हा सोहळा आहे. महाराष्ट्र ६५ वर्षाचा होत असताना नव्या पिढाला हा वारसा आणि वाटचाल कळावी, त्यांच्यात प्रेरणा निर्माण व्हावी हा हेतू आमच्या पक्षाचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT