Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Thackeray brothers Politics : युतीच्या चर्चेने राजकारणात धमाल, मात्र ठाकरे बंधू ताकही फुंकून पित आहेत

Thackeray brothers Maharashtra politics 2025 : मु्ंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार, अशी चर्चा दोन महिन्यांपासून सुरू आहे. यावेळी युती होणार, असे वाटत असतानाच राज ठाकरे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने कार्यकर्ते निराश झाले. युतीची चर्चा अद्यापही सुरू आहे, मात्र काही पूर्वानुभव पाहता ठाकरे बंधू ताकही फुंकून पित आहेत, असे दिसत आहे.

अय्यूब कादरी

उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येणार, अशी चर्चा सुरू झाली आणि राज्याच्या राजकारणात एकच धमाल उडाली. अशा चर्चा यापूर्वीही झाल्या होत्या, मात्र त्या फारशा पुढे सरकल्या नव्हत्या. यावेळी मात्र ही चर्चा 'लॉजिकल एंड'ला जाणार, अशी शक्यता निर्माण झाली. लोकांचीही उत्सुकता वाढली. दोन्ही पक्षांच्या काही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना हे दोन भाऊ कधी एकत्र येतील, याची घाई झाली, मात्र युती किंवा आघाडी अशी घाईत होत नसते. कुठेतरी दूध पोळलेले असते, म्हणून ताक फुंकून पिले जाते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांमध्ये सध्या असेच सुरू आहे.

सध्याच्या घडीला महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे. विधानसभा निवडणुकीत ते दिसून आले होते. आघाडीच्या दारूण पराभवाचे हेही एक कारण होते. विधानसभा निवडणुकीनंतर तर परिस्थिती आणखी बिकट झालेली आहे. तिन्ही पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना आहेत. अशा परिस्थितीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मित्रपक्षांवर अवलबूंन राहणे उद्धव ठाकरे यांना परवडणारे नाही. मनसेची अवस्थाही बिकट झाली आहे. राज ठाकरे यांची क्रेझ कायम आहे, त्यांच्या सभांना गर्दी होते, मात्र त्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होत नाही, ही वस्तुस्थिती मनसेसाठी अडचणीची आहे.

दोघेही भाऊ एका अर्थाने संकटात आहेत. मुंबईत राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. दोघे भाऊ एकत्र आले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किमया होईल, असे काही जणांना वाटत आहे. मात्र भावांचे एकत्र येणे तितके सोपे राहिलेले नाही. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर मनसोक्त टीका केलेली आहे, एकमेकांची खिल्ली उडवलेली आहे. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले म्हणून टीका करणाऱ्यांत मनसेचाही समावेश होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची ही महाविकास आघाडी अनैसर्गिक होती, त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना बसला.

शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसने एकमेकांना कायम विरोध केलेला आहे. काँग्रेसला विरोध हा शिवसेनेच्या अस्तित्वासाठी, यशासाठी जबाबदार असलेला मोठा घटक म्हणावा लागेल. भाजपसोबतची युती तुटली आणि उद्धव ठाकरे यांनी घाईघाईत महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. आगदी काही दिवस आधीच एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढलेले, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलेले पक्ष मांडीला मांडी लावून बसले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि कोरोनाचे आगमन झाले. जयंत पाटील, अजितदादा पवार, बाळासाहेब थोरात आदी दिग्गज नेते महाविकास आघाडीत होते. असे सांगितले जाते की मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांनाच देण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार होता, मात्र मित्रपक्षांतील हे दिग्गज नेते त्यांच्या हाताखाली काम कसे करणार, असा मुद्दा पुढे करण्यात आला आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हावे लागले. बाळासाहेब ठाकरे यांनी सरकारमधील कोणतेही पद स्वीकारले नव्हते. त्यामुळे ठाकरेंना 'किंगमेकर'च्या भूमिकेत पाहण्याची लोकांना सवय आहे. ते पाहता मुख्यमंत्री होणे ही उद्धव ठाकरे यांची चूक ठरली.

यावरून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असंतोष होता. त्यात अर्थमंत्री असलेले अजितदादा शिवसेनेला निधी देत नाहीत, असेही आरोप होऊ लागले. भाजपने या सर्व बाबी हेरून काम सुरू करत एकनाथ शिंदे यांना हाताशी धरले होते. कोरोना काळात उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत, मात्र महाराष्ट्राचे पालक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. अखेर एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी बंड केले. शिवसेना फुटली. फार विचार न करता, घाईत केलेल्या या अनैसर्गिक आघाडीचा उद्धव ठाकरे यांना जबर फटका बसला.

मनसेसोबत युतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सकारात्मक आहे. पहिल्यांदाच असे घडत आहे. मनसेचे काही नेते मात्र पहिल्या दिवसापासन नकारात्मक भाषा करत आहेत. त्यामुळे या विषयावर बोलू नये, अशी तंबी राज ठाकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना दिली होती. मध्यंतरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची एका हॉटेलात भेट झाली. त्यामुळे युतीसाठी इच्छुक दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली. अशा परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांचा पक्ष आशावादी आहे. मनसेचे काही पदाधिकारी मात्र नकारात्मक भाषा बोलतच आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युतीचे संकेत दिले होते, मात्र ती युती अस्तित्वात आली नाही. युती करण्यापूर्वी बारकाईने विचार करावा लागतो. कार्यकर्त्यांची चाचपणी करावी लागते. मनसेसोबत युतीची चर्चा सुरू असताना उद्धव यांनी तशी चाचपणी केल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सकारात्मक दिसत आहेत. ही युती नैसर्गिक आहे. दोन्ही पक्षांच्या अस्तित्चाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, म्हणून घाईघाईत युतीचा निर्णय होईल, असे वाटत नाही. कार्यकर्त्यांना कितीही घाई झालेली असली तरी दोन्ही ठाकरे ताक फुंकूनच पिणार आहेत.

SCROLL FOR NEXT