प्रशांत यादव उद्या (19 ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांचा प्रवेश शेखर निकम आणि उदय सामंतांसाठी धक्का ठरणार आहे.
भाजप 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी विरोधक आणि मित्रपक्षातील नेत्यांना खेचून स्वबळावरची तयारी करत आहे.
या प्रवेशामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
Ratnagiti/Chiplun News : मुझफ्फर खान चिपळूण
आमदार शेखर निकम यांच्या विरोधात लढणारे प्रशांत यादव उद्या (ता. 19) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एकीकडे यादव यांना पक्षात घेवून पालकमंत्री उदय सामंत यांना शह द्यायचा आणि दुसरीकडे आमदार शेखर निकम यांची कोंडी करून 2029 च्या विधानसभा निवडणूकीची तयारी करायची अशी खेळी भाजपकडून सुरू झाली आहे. भाजपकडून विरोधी आणि मित्र पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात खेचून 2029 चा स्वबळावरचा रोडमॅप आखला जात आहे.
महायुती सत्तेत येवून नऊ महिन्यांहून अधिक कालावधी लोटला. या दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत यांनी कोकणात ऑपरेशन टायगर राबवले. ज्या मतदार संघात महायुतीचा आमदार आहे. त्या ठिकाणी विरोधी पक्ष ठेवायचा नाही, या हेतूने पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार किरण सामंत यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना पक्षात घेतले.
पालकमंत्री सामंत, राज्यमंत्री योगेश कदम आणि किरण सामंत यांनी प्रथम आपला मतदार संघ मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पालकमत्र्यांना विश्वासात न घेता राजापूरमध्ये अजित यशवंतराव यांना पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या चिपळूणमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार उचलला आहे.
चिपळूणचा विचार केला तर अजित पवार यांचे आमदार ताकदवाद असताना तेथे भाजपने शरद पवार यांच्या पक्षातील प्रशांत यादव यांना आपल्या पक्षात घेतले आहे. यादव यांना विधानसभा लढवायची आहे. तसेच भाजपचा सुरक्षा कवच घेवून सहकार आणि उद्योग क्षेत्रात प्रगती करायची आहे. भाजपही त्यांना ताकद देणार हे स्पष्ट आहे.
येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती म्हणूनच लढायची आहे. जिथे अडचण असेल तिथे आपण चर्चा करू असे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. विरोधकांमध्ये ताकद नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजापूर, रत्नागिरी, दापोली मतदार संघात उमेदवार ठरवून त्यांना निवडून आणण्यासाठी विद्यमान आमदारांना फार कसरत करावी लागणार नाही.
गुहागरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर भाजप आणि शिवसेनेची लढत होईल. मात्र येथे जिल्हा परिषदेच्या केवळ चारच जागा आहेत. चिपळूणमध्ये प्रशांत यादव यांच्या प्रवेशाने भाजप शक्तीशाली पक्ष झाला आहे. तालुक्यात महायुतीचे तिन्ही पक्ष बलाढ्य झाले आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत आपली ताकद वाढवणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद कमी करण्याची काळजी भाजप घेताना दिसत आहे.
भाजपकडून विरोधी आणि मित्र पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात खेचून 2029 चा स्वबळावरचा रोडमॅप आखला जात आहे. त्यामुळे काही वर्षात महायुतीतील सत्तासंतुलन कायम राहील पण 2029 ची विधानसभा निवडणूक जवळ येताच भाजपकडून शिंदे यांची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गेम झाला तर नवल वाटायला नको.
चिपळूण विधानसभा मतदार संघात प्रशांत यादव यांना जिंकून आणण्यासाठी ठाकरे गटाच्या सेनेने मदत केली होती. यादव भाजपमध्ये जात असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाही सोबत येण्याची विनंती करीत आहेत. ठाकरे गटाला गळती लागू नये म्हणून शिवसेना नेते भास्कर जाधव अॅकशन मोडवर आले आहेत. त्यामुळे 24 ऑगस्टला चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रशांत यादव भाजपमध्ये जात आहेत. ते महायुतीमध्ये आले म्हणून मी नाराज नाही. चिपळूणच्या विकासाला आणखी हातभार लागेल.- शेखर निकम, आमदार चिपळूण
प्रश्न 1: प्रशांत यादव कधी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत?
👉 19 ऑगस्ट रोजी.
प्रश्न 2: या प्रवेशामुळे कोणाला राजकीय धक्का बसणार आहे?
👉 आमदार शेखर निकम आणि पालकमंत्री उदय सामंत.
प्रश्न 3: भाजपची पुढील निवडणुकीसाठी काय रणनीती आहे?
👉 विरोधक व मित्रपक्षातील नेत्यांना खेचून 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळावर रोडमॅप तयार करणे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.