
Ratnagiri : मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा 5 जुलै रोजी निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या. तब्बल 20 वर्षांनी मराठीच्या मुद्यावर उद्धव आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. फक्त एकत्र दिसण्यासाठी नाही तर एकत्र होण्यासाठीच एकत्र आल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात केला होता. त्यामुळे येत्या काही दिवसात या दोघांमध्ये युतीची घोषणा होईल हे जवळपास निश्चित झाले आहे. या युतीचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या युतीमुळे एकनाथ शिंदे आणि शिवसेना चिंचेत आली आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यांना हादरे बसण्याची शक्यता आहे. यातही सेनेचा हक्काचा भाग असलेल्या तळ कोकणात मोठा फटका बसणार आहे. हा फटका जास्तीत जास्त कसा बसेल याचे नियोजनही सध्या स्थानिक पातळीवरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. रत्नागिरीतील 2 मतदारसंघात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गुप्त बैठका घेताना दिसत आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत, बंधू किरण सामंत, रामदास कदम, योगेश कदम, भरत गोगावले या शिलेदारांच्या साथीने कोकण ठाकरेंच्या हातून हिसकावून घेतला. या सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि नेते निवडणुकीच्या दरम्यान पळवले. यामुळे सध्याच्या घडीला सैन्य आहे पण लढायला म्होरक्या नसल्याची स्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची झाली आहे.
मात्र ठाकरे बंधूंची युती झाल्यास चित्र बदलू शकते, या युतीचे स्थानिक राजकारणात पडसाद पाहायला मिळतील. रत्नागिरी जिल्ह्यात माजी खासदार विनायक राऊत, विद्यमान खासदार भास्कर जाधव शिवसेनेची कमान सांभाळत आहेत. सध्या पक्षबांधणीकडे दोन्ही नेत्यांचे लक्ष असून बैठका आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यावर भर दिला जात आहे. खेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे मनसेला ताकद देताना दिसत आहेत. यामुळे मनसे-शिवसेना युती झाल्यास महायुतीला प्रामुख्याने दापोली आणि गुहागर मतदारसंघात आव्हान निर्माण होऊ शकते.
रत्नागिरीमध्ये दापोली मतदारसंघ आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी साडेतीन जिल्हा परिषद गट येतो. गुहागर विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यामान आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा असून भास्कर जाधव यांचा येथे वरचष्मा आहे. पण दापोली मतदार संघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वर्चस्व निर्माण केलं आहे. मात्र या मतदार संघातील खेड नगर पालिका (शहर) क्षेत्र आणि ग्रामीण भागात मनसेची ताकद आहे. येथे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मनसे वाढवली आणि टिकवली आहे. आताही स्थानिकच्या पार्श्वभूमिवर ते काम करताना दिसत आहेत.
अशातच ठाकरे बंधूंची युती झाल्यास आगामी स्थानिकमध्ये महायुतीला मोठा धक्का बसू शकतो. हीच शक्यता लक्षात घेऊन तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गुप्त बैठकांना जोर वाढला आहे. या बैठकांमधून आगामी निवडणुकांची रणनीती बनवली जात आहे. आता केवळ वरून आदेश येण्याची वाट हे कार्यकर्ते बघत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.