Pune BJP News Sarkarnama
विश्लेषण

Pune BJP News : 'कसबा ते कोथरूड'; पुणे भाजपचे बदलते सत्ताकेंद्र...'

Chaitanya Machale

Pune News : भारतीय जनता पक्षाने गेल्या दोन अडीच दशकांपासून बांधून ठेवलेला मतदारसंघ अशी ओळख कसबा विधानसभा मतदारसंघाची होती. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसब्यामधील मतदार आता वेगवेगळ्या कारणाने कोथरूड भागात स्थायिक झाला आहे. परिणामी भाजपचे सत्ताकेंद्रदेखील आता कसबाऐवजी कोथरूड होऊ लागले आहे. (Latest Marathi News)

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागात भाजपला मानणारा वर्ग मोठा असल्याने 'कसबा म्हणजेच भाजप' असे जणू समीकरणच तयार झाले होते. मात्र, कसबाच्या आमदार राहिलेल्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर कसबा मतदारसंघातून विजयी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी अनेक वर्षे कसबा विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत या भागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. भाजपला मानणारा मतदार अशी ओळख कसबा विधानसभा मतदारसंघाची होती. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या याच मतदारसंघातून भाजपचे संपूर्ण काम चालायचे. तांबडी जोगेश्वरीजवळ भाजपचे पक्ष कार्यालय होते. अनेक वर्षे याच शहर कार्यालयातून पक्षाचा कारभार होत होता. महापालिकेच्या कारभारात याच मतदारसंघाचा वाटा मोठा होता. आमदार महापौर स्थायी समिती अध्यक्ष सभागृह नेते अशी अनेक पदे या मतदारसंघातील व्यक्तींनी भूषवली. भाजपचे सत्ताकेंद्र म्हणून कसब्याकडे पाहिले जात होते.

शहराच्या मध्यवर्ती भागात होत असलेली गर्दी आणि कोथरूड भागात वाढत असलेले व्यापारीकरण यामुळे मध्यवर्ती भागातील अनेक नागरिक कोथरूडमध्ये स्थलांतरित झाले. दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका लढविण्यात आल्या. या काळात कसब्यातील भाजपचे शहर कार्यालय शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात नेण्यात आले. कसबामध्ये असलेली पक्ष कार्यालयाची जागा कमी पडत असल्याचे कारण देत हे कार्यालय शिवाजीनगरमध्ये नेण्यात आले आणि तिथूनच हळूहळू बदल होण्यास सुरुवात झाली.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अनिल शिरोळे हे 2014 मध्ये लोकसभेला उमेदवार ठरले. मोदी लाटेत ते विजयी झाले. मात्र, विधानसभेवर आमदार गिरीश बापट हे प्रतिनिधित्व करत होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्याने बापट यांना मंत्रिपद मिळाले. तसेच पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारीदेखील त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याने भाजपचा कारभार हा कसबा विधानसभा मतदारसंघातूनच चालत होता.

2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने कमाल करत तब्बल 100 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातील मुक्ता टिळक यांना महापौरपदासाठी, तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मुरलीधर मोहोळ यांना स्थायी समिती अध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली. 2019 मध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून कोथरूडमधून विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. तेथूनच भाजपचे सत्ताकेंद्र बदलण्याची बिजे रोवली गेली.

या विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा शब्द न पाळण्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देत सत्ता स्थापन केली. शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार बाहेर पडल्यानंतर भाजपने शिंदे यांना पाठिंबा जाहीर करत त्यांना मुख्यमंत्री बनवले, तर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आता अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या आजारपणामुळे त्यांना पक्षाच्या कामकाजात लक्ष देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे साहजिकच पुण्यातील भाजपने आपले सत्ताकेंद्र कसब्यातून कोथरूडला हलवले. गेल्या वर्षीच्या शेवटी, भाजपच्या विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभेची जागा राखण्यात भाजपला अपयश आले. टिळक यांच्या निधनानंतर पक्षाने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला न दिलेली उमेदवारी आणि कसब्यामध्ये ब्राह्मण समाजाची नाराजी यामुळे हा पराभव झाल्याचे बोलले जात असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये कसब्याचे मतदार कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेले आहेत. याचाही फटका या पोटनिवडणुकीत भाजपला बसला असावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

कोथरूड विधानसभा परिसरात नव्या ठिकाणी आता भाजपने (BJP) आपले शहर कार्यालय सुरू केले आहे. त्यातच भाजपने कोथरूडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी दिली आहे. आता पुणे लोकसभा मतदारसंघासाठी कोथरूड भागातील रहिवाशी असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मोहोळ हे पुण्याचे महापौरही होते. पक्षाने दिलेल्या संधीचा फायदा करून घेत त्यांनी शहरभर आपले नेटवर्किंग पसरवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विविध कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनदेखील त्यांच्याकडे जबाबदारी आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील व्यक्तींना पक्षाच्या वतीने देण्यात आलेली जबाबदारी लक्षात घेता या पुढील काळात कसबाऐवजी आता कोथरूडच भाजपचे सत्ताकेंद्र राहील हे निश्चित झाले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT