पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर भाजपचा प्रभाव आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला भाजपने फार फायदा होऊ दिलेला नाही. उलट मित्रपक्षांना आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांना त्यांच्या हक्काच्या भागातील एकगठ्ठा मतदान मिळू नये, यासाठी प्रभाग वेगवेगळ्या पद्धतीने तोडले आहेत. त्यामुळे भाजपवगळता अन्य पक्षांतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गेल्या सव्वातीन वर्षांपासून पुणे महापालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने महापालिकेवर आयुक्तांचे ‘प्रशासकराज’ सुरू आहे. याच कालावधीत पायाभूत सुविधांसह प्रशासकीय पातळीवरची शिस्त कमालीची बिघडलेली आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार याची वाट राजकीय पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिक बघत आहेत. पुणे महापालिकेने प्रारूप प्रभागरचना राज्य सरकारला सादर केली. त्यानंतर नगरविकास विभागाने त्यात आवश्यक ते बदल करून राज्य निवडणूक आयोगाकडे ती सादर केली. त्यानंतर २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली.
यामध्ये ४० प्रभाग हे चार सदस्यांचे आहेत तर एक प्रभाग पाच सदस्यांचा आहे. अशा प्रकारे ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक महापालिकेत निवडून द्यावे लागणार आहेत. या प्रभागरचनेवरून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नाराजी व्यक्त केली. आपण सुरेश कलमाडींना कसे रोखले होते, असे सांगून भाजपला सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या दोन नेत्यांमधील आणि पक्षांमधील संघर्ष दिसून येईल.
२०१४ ला राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर २०१७ च्या महापालिकेची प्रभागरचना करताना त्यावर त्यांचाचा वरचष्मा होता. भाजपने दोनऐवजी चार सदस्यांची प्रभागरचना केली. अनेक ठिकाणी नैसर्गिक हद्दी ओलांडून प्रभाग तयार केले. त्यात छोट्या पक्षांचे आणि एका भागापुरते वर्चस्व असलेल्या राजकीय पुढाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आले. त्याचा फायदा भाजपला झाला. पुणे महापालिकेत गेल्या अनेक वर्षांत भाजप नगरसेवकांची दोन आकडी संख्येपुढे भाजपची ताकद जाऊ शकली नव्हती. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत भाजपने १०० नगरसेवकांचा टप्पा गाठला आणि एकहाती सत्ता मिळवली. मार्च २०२२ ला महापालिकेची मुदत संपल्यानंतर त्याच दृष्टीने निवडणुकीची तयारी केली होती. पण या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना तीन सदस्य प्रभागरचना केली आणि नगरसेवकांची संख्या १७३ इतकी निश्चित केली. त्यामुळे पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांनाही त्यातून प्रतिनिधित्व मिळू शकलेले असते. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सत्ता उलटवून टाकून महायुतीने सत्ता काबीज केली.
या सरकारने पुन्हा एकदा चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. तीन सदस्यीय प्रभागरचनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचा प्रभाव होता. ही प्रभागरचना भाजपला काहीशी अडचणी ठरली होती. मध्यवस्तीपेक्षा उपनगरांमधील नगरसेवकांची संख्या वाढेल यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल काय लागेल याची उत्सुकता लागलेली होती. पण न्यायालयात दाखल झालेली ‘ओबीसी’ची याचिका आणि प्रभागरचनेच्या याचिकेमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आणि महायुती सरकारने निवडणुकीची सर्व प्रक्रिया रद्द केली.
पुणे महापालिकेच्या २०२६ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भाजपने आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे असे एकंदरीत दिसते. या प्रभागरचनेवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर यांचे वर्चस्व आहे. प्रभागरचनेमध्ये कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट या पाच विधानसभा मतदारसंघांत फारसे बदल झालेले नाहीत. किरकोळ भाग वगळणे किंवा नव्याने जोडणे असे प्रकार घडले आहेत. याच ठिकाणी भाजपची ताकद जास्त आहे, तर दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांची ताकद मर्यादित आहे. ही मर्यादित असलेली ताकद महापालिकेच्या निवडणुकीत संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. हडपसर विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’चे आमदार चेतन तुपे असतानाही त्यांच्या मनासारखी प्रभागरचना झालेली नाही.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार व ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष सुनील टिंगरे असूनही त्यांची डोकेदुखी वाढलेली आहे. माजी महापौर दत्ता धनकवडे यांचा धनकवडी-बालाजीनगर प्रभाग गायब करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गोखलेनगर भागातील ‘राष्ट्रवादी’चे माजी सभागृहनेते नीलेश निकम, काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांच्या हक्काचा मतदार असलेला भाग औंध बोपोडी या प्रभागाला जोडला आहे. वारजे भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ तोडण्यात आलेला आहे. तेथे भाजपला फायदा होईल अशा प्रकारची प्रभागरचना केली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात समाविष्ट गावांचा बराचसा भाग आहे. त्यामुळे तेथील प्रभागरचनेत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होणार नाही याची दक्षता भाजपने घेतलेली आहे. उपनगरांमधील नव्याने झालेल्या सोसायट्यांमधील मतदार हे भाजपच्या बाजूने कौल देतात. अशा स्थितीत गावठाणमधील मतदार प्रभावशाली ठरणार नाहीत, याची काळजी भाजपने घेतली आहे. लोहगाव, वाघोली, सुस, बावधन, उत्तमनगर, शिवणे, खडकवासला, नऱ्हे, आंबेगाव, कात्रज, पिसोळी, उंड्री, साडेसतरा नळी, मांजरी या सर्व भागांत ही रणनीती आखली आहे. एकंदरीतच ही प्रभाग रचना करताना राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी असणार आहे. त्यामुळे या पक्षाचे खच्चीकरण कसे करता येईल, याकडे लक्ष देण्यात आलेले आहे. २०१७च्या निवडणुकीमध्ये उपनगरांमधील प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक निवडून आलेले होते. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून येणार नाहीत, याचे नियोजन या प्रभागरचनेमध्ये केले असल्याचा आक्षेप घेतला जात आहे.
पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यांची शहराच्या विविध भागात ताकद आहे. त्यामुळे चार सदस्यांचा प्रभाग करताना त्यांना पॅनेल करता येणे शक्य आहे. पण काँग्रेस, दोन्ही शिवसेना, मनसे, आम आदमी पक्ष यांसह अन्य पक्षांची स्थिती मात्र वाईट होण्याची शक्यता आहे. पुण्यात काँग्रेसची ताकद आता मर्यादित झाली आहे. अनेक ठिकाणी त्यांना मतदान केंद्रांवर काम करणारे कार्यकर्ते मिळत नाहीत. तसेच चार सदस्यांचे पॅनेल तयार करतानाही त्यांची दमछाक होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कोथरूड हडपसर, कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी या सर्वच भागांतील ताकद कमी झालेली आहे त्यांचे माजी नगरसेवक फुटून ते भाजपमध्ये गेलेले आहेत. आगामी निवडणुकीत काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, मनसे या पक्षाच्या नगरसेवकांची संख्या एक आकडीच राहण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भाजप सोबत युती झाली नाही तर त्यांचीही स्थिती अन्य पक्षांप्रमाणेच होणार आहे. दोन-चार प्रभागांतील अपवाद वगळता चार सदस्यांचे पॅनेल करताना त्यांना उमेदवारही मिळणार नाहीत. कसेबसे पॅनेल तयार केले तरी त्यांची निवडून येण्याची शक्यता खूप कमी असेल. त्यामुळे या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच दोन प्रमुख प्रतिस्पर्धी असतील. अस्तित्वाच्या लढाईसाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर भाजपपुढे आव्हान निर्माण होऊ शकते.
प्रारूप प्रभागरचना करताना उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारूप प्रभागरचनेत सोमवार पेठ-रास्ता पेठ, सॅलिसबरी पार्क आणि बालाजीनगर हे तीन प्रभाग तीन सदस्यांचे तयार केले होते. तशी प्रभागरचना प्रशासनाने राज्य सरकारकडे सादर केली होती पण नगरविकास विभागाने हे तीन सदस्यांचे तीन प्रभाग रद्द केले आणि त्याऐवजी आंबेगाव-कात्रज हा प्रभाग क्रमांक ३८ पाच सदस्यांचा प्रभाग तयार केला. त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे. तीन सदस्यांचे तीन प्रभाग रद्द करून एक पाच सदस्यांचा प्रभाव केल्याने जवळपास १६ प्रभागांच्या हद्दी बदलल्या आहेत. यामुळे भाजपचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना विभागाचे माजी नगरसेवक संजय भोसले यांच्या हक्काचा आठ हजाराचा मतदार पुणे स्टेशन-जय जवाननगर या प्रभागाला जोडला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता धनकवडे यांचा प्रभाग कागदावरून नष्ट झाला आहे.
पुणे लोकसभेची पहिलीच निवडणूक लढवून खासदार झालेले व त्यानंतर लगेच केंद्रीय राज्यमंत्री मिळाल्याने पुण्यात मुरलीधर मोहोळ यांची हवा होती पण आता पुण्यातील राजकारणात त्यांचे विरोधक वाढू लागल्याने राजकीय हनिमून आता संपलेला आहे. महापालिकेची प्रभाग रचना करताना मोहोळ यांनी केवळ भाजपचाच फायदा बघितला. त्यावरून अजित पवार हे मोहोळांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी मोहोळ यांच्यावर टीका केली. आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला मोहोळ यांचे चांगल्या पद्धतीने काम केले. पण प्रभागरचना करताना आपल्याला विचारात घेतले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेचेही मोहोळ यांनी पालन केले नाही. यापूर्वी पुण्याचे खासदार म्हणून सुरेश कलमाडी यांचे महापालिकेच्या प्रभागरचनेवर लक्ष असायचे. ‘असे असतानाही आम्ही काँग्रेसचा महापौर होऊ दिलेला नव्हता,’ असे सूचक वक्तव्य पवारांनी बैठकीत केले. त्यामुळे पुणे शहरात अजित पवारांविरुद्ध मुरलीधर मोहोळ असा नवीन राजकीय संघर्षाचा अनुभव येण्याची शक्यता आहे. याचे पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्येही उमटण्याची शक्यता आहे.
भाजपने प्रारूप प्रभागरचना करताना विश्वासघात केल्याची सल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे ‘प्रभागरचना मनासारखी झाली म्हणून रडत बसू नका. महायुती होणार की नाही याचाही विचार न करता स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू करा,’ असे आदेश अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाही, हे स्पष्ट झालेले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने मात्र पुण्यात महायुती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. शिवसेनेच्या वाट्याला २०-३० जागा आल्या तरी ती त्यांच्यासाठी संजीवनी ठरेल, हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.