Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणूका होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला आहे. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ केला होता. या निवडणुकीत भाजपने काँग्रेसवर एकतर्फी विजय मिळवला होता. या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या पराभवाचा धक्का काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतील तीनही पक्षातून मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये नेतेमंडळींचे इनकमिंग होत असतानाच आता या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवण्यासाठी 'मॅच-फिक्सिंग' केली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी करून नव्या वादालाच तोंड फोडले आहे.
जोपर्यंत राहुल गांधी जमिनीवर येऊन वस्तुस्थिती समजून घेत नाहीत, लोकांना खोटे बोलत नाहीत आणि स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला खोट्या आशा देत नाहीत, तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही जिंकू शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी राहुल गांधींनी मांडलेल्या पाचही मुद्द्याची चिरफाड लेख लिहूनच केली आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी गांधींच्या सर्व प्रश्नाला या लेखातूनच सडेतोड उत्तरे दिली आहेत.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राज्यातील लोकशाही प्रक्रियेत गडबड करण्यासाठी पाच-सूत्री मॉडेलचा वापर केला असल्याचा दावा करीत निवडणूक आयोगाच्या कारभारावरच शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे दोन दिवसापासून काँग्रेस व भाजपच्या नेतेमंडळीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्या लेखाची सध्या जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्राची विधानसभा भाजपने चोरली असा थेट आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे भाजपचे नेते या आरोपामुळे काहीसे अस्वस्थ झाले आहेत. गांधी यांनी ही निवडणूक फिक्स असल्याचा केलेला दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढला आहे. पराभवाच्या मानसिकतेतून राहुल गांधी अजूनही बाहेर येत नाही, त्यांनी आत्मपरीक्षण करायला, हवे असा सल्ला देखील बावनकुळे यांनी दिला आहे. त्यासोबतच 2009 च्या निवडणुकीत 30 लाख मतदार वाढले होते. त्या निवडणुकीत घोटाळा झाला होता का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप बावनकुळे यांनी मुद्देसूदपणे खोडून काढले आहेत. विशेषता त्यांनी कामठी विधानसभा मतदरासंघाच्या बाबतीत करण्यात आलेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यासाठी गेल्या तीन निवडणुकीचा जरी अभ्यास केला तरी त्यांना काँग्रेस का पराभूत झाली ? हे लक्षात येईल असे बावनकुळे यांनी स्पष्ट करीत राहुल गांधींच्या आरोपातील हवाच काढली आहे.
आपल्या कामठी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत सुमारे 30 हजार मतांनी वाढ होत आहे. त्यासोबतच पनवेल विधानसभा मतदारसंघात साडेसहा लाख मतदार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये साडेपाच लाखांवर मतदार गेले आहेत. अशा पंधरा विधानसभा मतदारसंघात सातत्याने मतदारांची वाढ होत आहे. 2009 च्या लोकसभेच्या निवडणुकीत महाष्ट्रात 7 कोटी 29 लाख मतदार होते. तेव्हा देशात काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर ३० लाख मते वाढली आहेत. निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन नोंदणी केली होती. याद्या दुरुस्त केल्या आहेत, असेही तयांनी स्पष्ट केले आहे. त्यांनतर 2014 ते 2019 या काळात 63 लाख नवीन मतदार वाढले तर 2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार वाढले तर 2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार वाढले आहेत. त्यामुळे ही आकडेवारी पहिली तर राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपात तथ्य जाणवत नाही.
कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आपल्या बुथवार 17 हजार मतदारांची नोंदणी केली आहे. निवडणूक आयोगाने घरोघरी फिरून सगळ्या भागात नोंदणी केली आहे. मतदार नोंदणी निरंतर होत असते. त्यामुळे मतदार वाढतच असतात. राहुल गांधी यांनी लेख लिहण्यापूर्वी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या होत्या. महायुती 17 जागांवर थांबली होती. जिंकल्याच्या नादात काँग्रेस सरकारही विसरून गेली. महायुती कामाला लागली. जनसंवादाचे काम केले. मोदींच्या नेतृत्वार मतदारांनी विश्वास ठेवला असल्याचे बावनकुळे यांनी स्प्ष्ट केले.
विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने तीन कोटी 17 लाख मते आम्ही महायुतीकडे वळवण्यात यशस्वी झालो. काँग्रेस आघाडी दोन कोटी 17 लाखांवर येऊन थांबली. ती कमी का झाली याचे आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
राहुल गांधी अजूनही पराभवाच्या छायेत आहेत. तो जोपर्यंत यातून बाहेर निघत नाही तोपर्यंत काँग्रेसचे काही खरे नाही. केवळ आरोप करून व दुसऱ्याला दोष देऊन निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे. फक्त कामठी विधानसभा मतदारसंघाचा पंधरा वर्षांचा इतिहास आणि मागील निवडणुकीतील ट्रेंड बघितला तरी त्यांना त्यांच्या पराभवामागचे कारण समजेल असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांनी टीका करताना त्यांनी 2004 व 2009 च्या आकडेवारीचा संदर्भ घेतला असल्यास, हे उलट त्यांच्याच पक्षाच्या अडचणीत कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे भाजपची नव्हे तर काँग्रेसची अडचण होणार आहे. त्यामुळे या बाबत आता काँग्रेसकडून काय स्पष्टीकरण दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.