Rahul Gandhi - Harshwardhan Sapkal- Congress .jpg  Sarkarnama
विश्लेषण

Rahul Gandhi Politics: ...म्हणून राहुल गांधींनी दिग्गज नेत्यांच्या नावावर फुली मारत सपकाळांना प्रदेशाध्यक्ष बनवलं!

Harshwardhan Sapkal New Maharashtra State President Of Congress : राहुल गांधींनी पक्षाच्या पायंडा मोडत नवी सुरुवात करताना महाराष्ट्र काँग्रेसच्या हिताचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर करतानाच त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना थेट काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष बनवलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत सगळ्या दिग्गज नेत्यांना डावलून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याच गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली आहे.

Deepak Kulkarni

Maharashtra Congress : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदासाठी दहाच्यावर नेतेमंडळी शर्यतीत होते. पण प्रदेशाध्यक्षपदासाठी कुणीही पुढं यायला तयार नव्हतं.कारणांचा सपाटा लावत एकएका नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदासारखं कष्टाचं पद घेण्यासाठी नापसंती दर्शवली. त्यामुळे प्रचंड बहुमतासह सत्तेत असलेल्या महायुतीसमोर निभाव लागण्यासाठी काँग्रेसला सक्षम नेता शोधण्याची वेळ आली. पण याचवेळी काँग्रेसच्या (Congress) नेतृत्वानं पहिल्यांदाच चौकटीबाहेरचा निर्णय घेत एका निष्ठावान कार्यकर्त्याला मोठी संधी देतानाच थेट प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवलं.

लोकसभेला अनपेक्षित यश मिळालं अन् महाराष्ट्रातलं सरकार गमावल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडी आणि त्यांतील घटक पक्षांचे नेतेमंडळी महायुतीला वाकुले दाखवू लागले. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा थोडी सरस कामगिरी करत लोकसभा गाजवली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना आघाडीत खच्चून भरलेला ओव्हर कॉन्फिडन्स दिसून येत होता.तीच आघाडीसाठी धोक्याची घंटा होती. पण शरद पवार. उद्धव ठाकरे अन् नाना पटोले (Nana Patole) यांच्यासारख्या अनुभवी कसलेल्या नेत्यांनाही ओळखता आली नाही.

महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारा जागांचा आकडाही निवडून आणता आला नाही. शंभरच्यावर जागा लढवलेल्या काँग्रेसला जेमतेम 16 जागा जिंकता आल्या.त्यानंतर या दारुण पराभवामुळे खचलेल्या काँग्रेसला सावरण्याऐवजी पटोलेंनी तत्काळ राजीनामा देणं पसंत केलं. त्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा नैराश्यात गेली. संकटात सापडलेल्या काँग्रेसला पटोलेंनंतरचा सक्षम असा नवा प्रदेशाध्यक्ष शोधण्यासाठी मोठा कालावधी लागला. त्यामुळे पक्षावर मोठी टीका-टिप्पणीही झाली. पण पराभवानंतर खचलेल्या काँग्रेसला दयनीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी अखेर आता हर्षवर्धन सपकाळांच्या रुपानं तळागळातला निष्ठावंत असा नवा 'कॅप्टन' मिळाला आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांच्यासारख्या इतकी वर्ष संघटनेत मोठ्या जबाबदार्‍या पार पाडलेल्या,कामाचा मोठा आवाका असलेल्या, दांडगा जनसंपर्क,शैक्षणिक क्षेत्रात अभिनव प्रयोग राबविणार्‍या,आदिवासी बहुल भागांत कुपोषणाच्या समस्येवर मुळापासून काम करणारा,ग्रामीण भागातील स्वच्छता मोहिमेचा दूत आणि काँग्रेसचा सगळ्यात मोठा विक पाँईट राहिलेल्या पक्षसंघटनेवर भक्कम पकड ठेवणारा तळागळातला नेता म्हणून ते काम करत राहिले.इतकी वर्ष काँग्रेससारख्या पक्षात काम करत असूनही प्रसिध्दीपासून कोसो दूर राहिलेल्यामुळेच त्यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.कोण हर्षवर्धन सपकाळ असाच भाव मीडियापासून ते सर्वसामान्य लोकांच्या मनात उमटला होता.

महाराष्ट्र काँगेस म्हणजे पृथ्वीराज चव्हाण,सुशीलकुमार शिंदे,नाना पटोले,बाळासाहेब थोरात, सतेज पाटील,विजय वडेट्टीवार यांसारखी पहिल्या फळीतील नेतेमंडळींपुरतीच मर्यादित लक्षात राहिली. सतत मीडियामध्ये ही मंडळी राहिल्यामुळेच त्यांच्याभोवतीच काँग्रेसचं राजकारण फिरत राहिलं. आणि काँगेसच्या हायकमांडने पण याच दिग्गज नेत्यांनाच एकापाठोपाठ एक मोठ्या पदांवर काम करण्याची संधी देण्यात आली.

प्रसिध्दीझोतापासून दूर राहत निमूटपणे काम करत राहणारा कार्यकर्ता नेहमीच काँग्रेसच्या चौकटीबाहेरच राहिला. पण इतकी वर्ष महाराष्ट्रात सत्तेत राहूनही काँग्रेस पक्षावरही ही वेळ का आली,तर ज्या ज्यावेळी काँग्रेस पक्ष सत्तेत आला तेव्हा मंत्रीपदं राहणारी नेतेमंडळी मोठी होत गेली, अन् पक्षसंघटन कमकुवत होत गेलं. किंवा त्या त्या नेत्यांच्या मतदारसंघापुरतं -जिल्ह्यापुरतं मर्यादित होत गेलं.याचाच फटका काँग्रेसला सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बसतो आहे.

राहुल गांधींनी पक्षाच्या पायंडा मोडत नवी सुरुवात करताना महाराष्ट्र काँग्रेसच्या हिताचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर करतानाच त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना थेट काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष बनवलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत सगळ्या दिग्गज नेत्यांना डावलून काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याच गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली आहे. सपकाळ यांच्या काही प्लस पाँईटमुळेच त्यांना काँग्रेसनं मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली.

हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.तसेच गांधी परिवाराचे अत्यंत जवळचेसहकारी ते मानले जातात. 2014 ला देशभरात मोदी लाट असूनही आणि चौरंगी लढत असतानाही हा कॉमन मॅन बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आला. स्वच्छ प्रतिमा, रोखठोक कार्यशैली, विकासाचं राजकारण,जातीधर्मांच्या पलीकडचं राजकारण, ग्रामपंचायत पातळीपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंतच्या कार्याचा पाठीशी असलेला अनुभव यामुळेच त्यांनी काँग्रेसलाही विश्वास नसलेली ही जागा अगदी सहजपणे निवडून आणली.

काँग्रेसचे 2014 ते 2019 ते बुलढाण्याचे आमदार होते.पण त्यांना 2019 मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.सपकाळ यांनी आमदारकीच्या काळात ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळ,जलसंधारण व्यवस्थापन प्रकल्प,बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी, आणि आदिवासी गावांचे सबलीकरण यांसाठी गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील राहिले.

जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण नैदानिक चाचण्या घेण्याचा प्रयोग केला.त्यांच्यामुळेच राज्यात शिक्षण विभागानं देखील गुणवत्तावाढीचे असे अनेक प्रयोग राज्यात राबवले.

बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे संग्रामपूर आणि जळगाव जामोद हे दोन तालुकेही आदिवासीबहुल भागातील दळणवळण,कुपोषण,पिण्याचं शुद्ध पाणी,आरोग्यसुविधा यांवर काम केलं.1999 ते 2002 या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते14-15 वर्षे राहुल गांधी यांच्या कोअर टीममध्ये काम केले.राज्यातलं काम पाहून राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं.

सपकाळ हे दिल्लीत वजन असलेल्या मुकुल वासनिक यांच्या तालमीत तयार झाले होते.वासनिक यांच्या आग्रहापोटीच त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. अवघ्या 28 व्या वर्षी बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.राज्यातला सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष बनले. ते सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत सपकाळ यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.त्यांना ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभागाचा अनुभव गाठीशी आहे.

त्यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागाळातून पुढे आली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत कोअर टीममध्ये काम करण्याचा त्यांना जवळपास 14 -15 वर्षांचा अनुभव आहे.त्यांचं राज्यातलं पक्षसंघटनेतलं काम पाहूनच राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं.त्यांच्यावर भाजपनेही गळ टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी काँग्रेस विचाराच्या सोबत राहण्याचा विचार ठेवल्याचा निर्णय घेतला.

तगडं महायुती सरकार समोर असताना सपकाळ यांना आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे. त्याच्या आधी त्यांना पक्षसंघटनेवर काम करण्यासोबतच पक्षातील दिग्गज नेत्यांनाही सोबत घ्यावे लागण्याचं कसब दाखवावं लागणार आहे.तसेच निवडणुकांसाठी आर्थिक जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे नव्या संकटांना भिडत काँग्रेसला अच्छे दिन आणण्याचंं आव्हान सपकाळांसमोर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT