
Nashik News, 14 Feb : राज्यात महायुतीचं (Mahayuti) बहुमताचं सरकार स्थापन झालं असलं तरी सरकारमधील मंत्र्यांमध्ये धुसफूस असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुरूवातीली मंत्रिपदावरून आणि आता पालकमंत्रिपदावरून युतीतील तिन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. तर दुसरीकडे सरकारच्या शपथविधीपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा अद्याप सुरूच आहेत.
त्या होण्यामागे कारणे देखील तशीच आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकमध्ये भरणाऱ्या कुंभमेळा संदर्भातील आयोजनाची बैठक मुंबईमध्ये घेतली होती. मात्र, या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिले आणि आता ते नाशिकमध्ये जाऊन स्वतंत्र कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत, त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये धुसफूस असल्याचं बोललं जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजनाची बैठक घेतली. या बैठकीचं आमंत्रण देखील एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) होतं. मात्र, तरीही ते गैरहजर राहिले. शिंदे नगर विकास मंत्री आहेत. तर या बैठकीत महानगरपालिकचे अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्या विभागाची आढावा बैठक असतानाही त्यांनी या बैठकीला येणं टाळलं.
त्याच दिवशी त्यांनी मलंगगडच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर आज शिंदे स्वतंत्रपणे नाशिक मध्ये जाऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असल्यामुळे शिंदेंनी या नाशिकला एकटं येण्याचा निर्णय घेतला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदे गैरहजर असल्याचं दिसत आहे. अशातच आता ते नाशिकमध्ये जाऊन आढावा बैठक घेत आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून भाजप सेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
दोन्ही पक्षातील नेत्यांनी या पदावर दावा केला आहे. त्यामुळे शिंदेंच्या या स्वतंत्र आढावा बैठकीला पालकमंत्रिपदाच्या वादाची किनार असल्याचंही बोललं जात आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या आजच्या बैठकांना भाजपचे नेते उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.