Raju Shetti, Satyajeet Patil Sarudkar
Raju Shetti, Satyajeet Patil Sarudkar Sarkarnama
विश्लेषण

Raju Shetti : ठाकरेंच्या 'मशाली'ची राजू शेट्टींना धग...; हातकणंगलेत सत्यजीत पाटीलच भारी?

Anil Kadam

Hatkanangle Political News : लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा संपताच अनेक सर्वे कंपन्यांनी एक्झिट पोलनुसार संभाव्य जिंकणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेनेचे सत्यजीत पाटील निवडणूक हे जिंकणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

निकालाला अद्याप 48 तास असले तरी एक्झिट पोलच्या अंदाजाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींची धडधड वाढली आहे. शेट्टीने महाविकास आघाडीकडून लढण्यास विरोध दर्शविल्याने उद्धव ठाकरे यांनी सत्यजित यांच्या रूपाने बाण सोडला. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते शेट्टी यांची अडचण झाल्याचे संभाव्य चित्र दिसत आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटातून माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने निवडणूक चांगलीच रंगली. महाविकास आघाडीत थेट न प्रवेश करता महाविकास आघाडीने आपणास बिनशर्त पाठिंबा द्यावा, या भूमिकेवर राजू शेट्टी ठाम असल्याने निवडणुकीच्या कालावधीत काही दिवस ताणाताणी झाली.

काही भाजपप्रेमी आपल्या पाठिंब्याच्या आड येत असल्याचे सांगून त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता निशाणा साधल्याने गुंता वाढला. मात्र ठाकरेंनी माजी आमदाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकून चर्चाच थांबवली. तेथे चौरंगी लढत झाली.

शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी निवडणूक लढवली. याशिवाय म्हणजे बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषदेत माझे अध्यक्ष डी. सी. पाटील मैदानात होते त्यामुळे स्वाभिमानीचे माजी खासदार शेट्टी यांना स्वतंत्र लढावे लागले.

महविकास आघाडीमध्ये सहभागी होवून स्वाभिमानीने हातकणंगलेची जागा लढवावी, यासाठी काँग्रेस आग्रही राहिले. शेट्टींना आघाडीत घेण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र शेट्टी यांनी महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा, कुणाचेही फोटो वापरणार नसल्याच्या भूमिकेवर अडून बसले.

स्वतः शेट्टी हे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याने ते आपल्याला पाठींबा देतील, असा विश्वास होता. त्यातच आघाडीतील राष्ट्रवादीने शेट्टींना पाठींबा देण्यास छुपा विरोध दर्शविला. या परिस्थितीत ठाकरे यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवत पन्हाळा-शाहुवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यातच शेट्टींच्या अडचणीत भर पडली.

राजू शेट्टींवर नाराज असलेले उद्धव ठाकरे यांना शाहूवाडीची भौगोलिक आणि राजकीय समीकरणे पाहता आघाडीला सत्यजीत पाटील जास्त सोयीचे वाटले. हातकणंगले मतदारसंघात ठाकरे यांचे तीन माजी आमदार आहेत. सत्यजीत पाटील 2004 व 2014 असे दोनदा शिवसेनेचे आमदार होते. तर वडील बाबासाहेब पाटील 1990 ला सेनेतूनच आमदार झाले होते.

याशिवाय इस्लामपूर आणि शिराळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. वाळवा-शिराळ्यावर जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांची चांगली पकड आहे. शिवाय सत्यजीत पाटील यांचे वडील विश्वास साखर कारखान्याचे मागील २५ वर्षांपासून उपाध्यक्ष आहेत. त्यांचा शिराळा आणि वाळवा तालुक्यातही संपर्क आहे. त्यामुळे सत्यजीत पाटलांचा मार्ग सुकर झाला.

2019 च्या निवडणुकीत खासदार माने यांनी खेळलेले ’मराठा कार्ड हे यावेळी सरुडकर यांना उपयोगी पडणार आहे. वंचितने या मतदारसंघातून जैन समाजातील डी. सी. पाटील यांना उमेदवारी मिळाली. पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचा समाजावरही मोठा प्रभाव आहे. या समाजाच्या मतांवर शेट्टी यांचीही भिस्त होती. पण पाटील यांच्या उमेदवारीने या समाजातील मतांची विभागणी होईल, त्याचा फटका शेट्टी यांनाच बसण्याची शक्यता आहे.

महायुतीतील घटक पक्ष असलेले अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी सर्वाधिक मताधिक्य माहितीचे उमेदवार माने यांना देण्याचा अधिक चंग बांधला होता. दुसरीकडे शेट्टी यांनी राजकीय पक्षांचा पाठिंबा न घेता ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनावर मते मागितली. निवडणुकीपूर्वी ऊस दरासाठी शेट्टीने सांगली कॉलगावपुर जिल्ह्यात मोठे आंदोलन छेडले होते. दोन्ही जिल्ह्यातील कारखानदारांना वेठीस धरले.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजारामबापू कारखाना इतिहासात पहिल्यांदाच बंद पाडला. दोन्ही जिल्ह्यातील कारखानदारांना एफआरपी देण्यास भाग पाडल्याने शेतकरी मागे राहतील, असा अंदाज बांधण्यात आला. याशिवाय जैन समाजातील बहुतांशी मते शेट्टींना मिळतील अशी त्यांच्याकडून तयारी केली.

महायुतीचे धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील हे दोन मराठा उमेदवार असल्याने जैन समाजाची मते आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या मतांवर दोन्ही उमेदवारांपेक्षा आपण वरचढ राहू, असा अंदाज राजू शेट्टींना राहिला.

काँग्रेस नेत्यांनी वारंवार प्रयत्न करूनही महाविकास आघाडीकडे सेटिंग पाठ फिरवल्याने काँग्रेसचे मतदारही नाराज झाले. मात्र या सर्वांमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार शेट्टीच्या मार्गातील अडथळा बनलाय, हे मात्र नक्की झाले असल्याचे चित्र दिसून येते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT