Raju Shetti Politics : लोकसभा निवडणुकीत केलेली मनमानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात अंगलट आली. महाविकास आघाडी सोबत हरकत घेतल्याने त्यांना या निवडणुकीत फटका बसला. एकेकाळी शेतकऱ्यांचा नेता म्हणून मिरवणाऱ्या राजू शेट्टी (Raju Shetti) यांनाच शेतकऱ्यांनी डावलले. ते राजकीय नेते झाले, पण चळवळ हरवली
विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत सहकारी, सोबती आणि कार्यकर्त्यांना डावलून उपऱ्या उमेदवारांना म्हणजेच माजी आमदार सुजित मिंचेकर यांना संधी दिल्याने संघटनेत फूट पडली. कार्यकर्त्यांनी संघटना सोडून त्यांचा रोष पत्करावा लागला. पण आता बाहेरून आलेल्या उपऱ्या उमेदवारांनी आता स्वतःचे राजकीय भवितव्य शोधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित केला आहे. संघटना सोडून मिंचेकर यांनी हातात भगवा घेणार असतील तर राजू शेट्टी यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून काय मिळवले. असा सवाल उपस्थित होत आहे.
शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर 2003 नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatna) राज्यात नाव कमवले. उसाला भाव मिळाला, दुधाला दर मिळाला. कडधान्याला हमीभाव आणि भाजीपाल्याला शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळाला. त्यामुळे केवळ जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे पाहिले जात होते.
झपाट्याने वाढत गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतले. 2005 ला शेतकऱ्यांनी शेट्टी यांना फळ दिले. विधानसभा निवडणुकीत आमदार केले. कालावधी संपायच्या आधीच लोकांनी खासदार केले. 2009 आणि 2014 ला खासदार राहिले. या पंधरा वर्षाच्या कालावधीत राज्यातील लाखो शेतकरी स्वाभिमानी सोबत राहिले.
2014 ला भाजपसोबत केलेली हात मिळवणी, 2017 साली भाजपसोबत घेतलेली फारकत, 2019 साली आघाडीशी केलेली दोस्ती, या सर्वांचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला. 2019 व 2024 अशा दोन वेळा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला पराभवाचा फटका बसला. ज्या स्वाभिमानीने वेगाने राज्यात नाव कमावले, त्याच दुप्पट वेगाने स्वाभिमानी शेतकरी संघटना तोंडावर आपटली.
मध्यंतरीच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख बुरुज असलेले सध्याचे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार देवेंद्र भुयार, रविकांत तुपकर यांनी देखील शेट्टी यांच्या एकला चलोच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत संघटना सोडली.
उरल्या सुरल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत राजू शेट्टी यांनी चळवळ टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपलेच खरे, ही भूमिका ठेवून शेट्टी यांनी सहकारी कार्यकर्त्यांना आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना दुखावले. संघटनेच्या स्थापनेपासून जे कार्यकर्ते हातात दगड आणि काठी घेऊन रस्त्यावर उतरले होते. त्याच कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीत डावलले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले वैभव कांबळे यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली. पण संघटनेला बळ मिळेल म्हणून शेट्टी यांनी वैभव कांबळे यांना कात्रजचा घाट दाखवून ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेले सुजित मिनचेकर यांना संधी दिली. त्यामुळे पंचवीस वर्ष शेट्टी यांच्यासोबत असलेले वैभव कांबळे यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. केवळ सुजित मिंचेकर नाही तर यापूर्वी भारत भालके, संजय घाटगे, दत्ता घाटगे, मनोज घोरपडे, अमर पाटील, खासदार विशाल पाटील, प्रमोद पाटील यांनी देखील केवळ निवडणुकीपुरता स्वाभिमानीचा बिल्ला वापरला. पण निवडणुकीनंतर काहींनी काँग्रेस तर काहींनी शिवसेना सोबत केली.
जे कार्यकर्ते सोबत होते त्यांचा विचार राजू शेट्टी कधीच करत नाहीत अशी भावना सध्या निर्माण झाली आहे. केवळ स्वतःच्याच राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिल्याने अनेकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडली. प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, वैभव कांबळे, जनार्दन पाटील यांनी राम राम केला. तर जवळच्या कार्यकर्त्यांनी संघटना न सोडता चार हात लांब राहण्याचा निर्णयच अघोषितपणे केला आहे. त्यामुळे शेट्टी यांच्यासोबत आता कोण आहे? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हातात दगड घेऊन सत्ताधाऱ्यांना जाब विचारायची वेळ आणली होती. अशा सत्ताधाऱ्यांकडून आता फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे संघटनेकडे आता निष्ठावंत कार्यकर्ता शोधण्याची वेळ आली आहे. याचे उत्तर राजू शेट्टी यांनाच द्यावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यकाळात शेतकऱ्यांची चळवळ टिकवणार कोण? वाढवणार कोण? पुढे नेणार कोण? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.