Raosaheb Danve News : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. या मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून आलेले दानवे या धक्क्यातून पुढील काही काळ तरी सावरणार नाहीत, असे दिसत आहे. राज्याचे कॅबिनेटमंत्री असलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांना मदत केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दानवे यांना त्यांच्याच मतदारसंघातील सिल्लोडमध्ये आता पाकिस्तान दिसू लागला आहे.
जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे (Raosaheb Thackeray) हे सलग पाचवेळा निवडून आले आहेत. यावेळीही ते विजयी होतील, असे वातावरण सुरुवातीला होते, मात्र ते नंतर बदलत गेले. जालना लोकसभा मतदारसंघातील एकाही विधानसभा मतदारसंघात दानवे यांना आघाडी मिळाली नाही. त्यांचे पुत्र संतोष दानवे हे भोकरदनचे आमदार आहेत. तेथूनही त्यांना आघाडी मिळू शकली नाही. सहापैकी पाच मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत.
केवळ जालना येथे कैलास गोरंट्याल हे काँग्रेसचे आमदार आमदार असून, तेथून काळे यांना 10,590 मतांची आघाडी मिळाली. बदनापूरमधून (आमदार नारायणराव कुचे, भाजप) 21,472, भोकरदनमधून (आमदार संतोष दानवे, भाजप) 962, सिल्लोडमधून (आमदार अब्दुल सत्तार, शिंदे गट) 27,759, फुलंब्रीतून (हरिभाऊ बागडे, भाजप) 29,856, पैठणमधून (आमदार संदीपान भुमरे, शिंदे गट) 27,856 असे मताधिक्य काळे यांना मिळाले.
भोकरदन वगळता काँग्रेसपेक्षा भाजप आणि शिंदे गटाचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांतून काळे यांना अधिक मताधिक्य मिळाले. राज्याचे वादग्रस्त मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, आपले कार्यकर्ते दानवे यांच्यावर नाराज होते. मी दानवेंच्या विरोधात काम केले नाही, मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात काम केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अर्थातच दानवे यांचा पारा चढला. असे असले तरी जनतेनेच माझा पराभव केला, असे दानवे सांगू लागले, कारण त्यांच्या मुलाच्या भोकरदन मतदारसंघातूनही त्यांना आघाडी मिळाली नव्हती.
भाजप, शिंदे गटाच्या दिग्गज आमदारांनाही त्यांना आघाडी मिळवून दिली नव्हती. भाजपच्या पराभवाच्या कारणांची चर्चा अनेकदा झाली आहे. तीच कारणे जालना मतदारसंघालाही लागू होतात. सत्तार आणि दानवे मित्र असल्याचे सांगितले जाते. मित्राने विरोधकाला मदत केल्याची कबुली दिली आणि दानवेंना सिल्लोडमध्ये पाकिस्तान असल्याचा दृष्टांत झाला.
भाजपचे काही नेते ध्रुवीकरण केल्याशिवाय राजकारण करूच शकत नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दानवे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही त्याची बाधा होणे, हे दुर्दैवी आहे. सत्तार यांनी कबुली दिली नसती तरी दानवेंची भूमिका कशी राहिली असती? तशीच राहिली असती जशी आता आहे, म्हणजे- जनतेनेच माझा पराभव केला. सिल्लोडमधून ते जवळपास 28 हजारांनी मागे आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघातून ते सिल्लोडपेक्षा अधिक पिछाडीवर राहिले आहेत.
सत्तारांनी काळे यांना मदत केली नसती तरी दानवे यांना सिल्लोडमधून आघाडी मिळाली असती का, या प्रश्नाचे उत्तर काय आहे, हे दानवे यांनाही माहीत आहे, कारण त्यांना स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघातूनही आघाडी मिळालेली नाही. असे असतानाही दानवे यांनी सिल्लोडमध्ये पाकिस्तान आहे, असे वक्तव्य केले आहे. त्याला कारण आहे सत्तार यांचे मुस्लिम असणे.
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हेही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. महायुती सरकारच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी उच्छाद मांडला होता. सिल्लोड महोत्सवातील त्यांचे वागणे शरमेने मान खाली घालायला लावणारे होते. याच्यावर जरूर टीका केली जाऊ शकते. मात्र सिल्लोडमध्ये पाकिस्तान आहे, असे म्हणणे कितपत योग्य आहे? अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोड पाकिस्तान बनले आहे, त्यांनी जमिनी हडप केल्या. नगरपालिकेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना त्रास दिला जात आहे, अशी टीका दानवे यांनी केली.
सत्तारांनी जमिनी हडपल्या हे लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दानवे यांना माहीत नव्हते का, या प्रश्नाचे उत्तर रावसाहेब दानवे यांनी द्यायला हवे. सिल्लोड पाकिस्तान बनले आहे, असे सांगत दानवे हे एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत आहेत. पराभव का झाला, याची कारणमीमांसा करण्याऐवजी दानवे यांनी ध्रुवीकरणाचा बाजार मांडला आहे. अशाच प्रकारांमुळे भाजपला देशभरात फटका बसला, मात्र त्यापासून आम्ही काहीही शिकणार नाही, अशी भूमिका दानवेंसारख्या नेत्यांनी घेतल्याचे दिसत आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.