Samadhan Autade-Ram Satpute-Rajendra Raut  Sarkarnama
विश्लेषण

Solapur BJP: फडणवीसांच्या मनात काय...? विद्यमान तीन आमदारांना वेटिंगवर का ठेवले?

Maharashtra Assembly Election 2024 : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी (ता. 20 ऑक्टोबर) जाहीर केली आहे. या यादीत मातब्बर नेत्यांना संधी देताना जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना मात्र वेटिंगवर ठेवले गेले आहे. पहिल्या यादीत ज्या इच्छुकांची नावे जाहीर झाली नाहीत, त्यांच्यामध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 October : भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील तीन मतदारसंघातून विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. मात्र, पक्षाचे दोन आणि भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या एका अपक्ष आमदाराला पक्षाने वेटिंगवर ठेवले आहे, त्यामुळे या दोन आमदारांचा पत्ता कट होणार की दुसऱ्या यादीत त्यांना संधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे. पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे या तीन आमदारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी (ता. 20 ऑक्टोबर) जाहीर केली आहे. या यादीत सोलापूरमधून विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी या आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. पक्षातील या मातब्बर नेत्यांना संधी देताना जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना मात्र वेटिंगवर ठेवले गेले आहे. पहिल्या यादीत ज्या इच्छुकांची नावे जाहीर झाली नाहीत, त्यांच्यामध्ये अस्वस्थता वाढली आहे.

माढ्याचा धडा

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात (Pandharpur Mangalvedha Constituency) भाजपमध्ये तिकिटासाठी प्रचंड स्पर्धा असून विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे आव्हान असणार आहे. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

त्यावेळी भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर करून मोहिते पाटील यांना बंडखोरीच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून दिला होता. तो धोका लक्षात घेऊन भाजपकडून पंढरपूरची उमेदवारी सर्वात उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, शरद पवार यांनीही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी खास रणनीती आखली आहे. भाजपचा कोणता मासा गळाला लागतो, याकडे यावर मतदारसंघाच्या उमेदवारीचे गणित ठरण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचा धडा लक्षात घेऊन बहुधा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच भाजप या मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करू शकतो.

पवारांच्या डावपेचावर भाजपची रणनीती

भारतीय जनता पक्षाच्या नव्या डावपेचानंतर प्रशांत परिचारक यांना मात्र आता ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण, विद्यमान आमदार या नात्याने समाधान आवताडे यांना पुन्हा संधी दिली, तर परिचारक यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागू शकते, त्यामळे भाजपच्या उमेदवारीचे गणित हे शरद पवार यांचे डावपेच आणि त्यांच्या उमेदवारीवर अवलंबून असणार, हे स्पष्ट आहे.

राम सातपुतेंना का स्थान नाही?

मागील निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून अवघ्या पंधरा दिवसांत आमदार झालेले राम सातपुते यांचेही नाव भाजपच्या पहिल्या यादीत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील सातपुते यांची माळशिरसमधून पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पहिल्या यादीत त्यांना स्थान न मिळाल्याने फडणवीसांच्या मनात माळशिरसबाबत नेमकं काय सुरू आहे, याची उत्सुकता आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या बळावर फडणवीस यांनी आपल्या लाडक्या सातपुते यांना अवघ्या काही दिवसांत आमदार केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांनी साथ सोडल्यामुळे फडणवीस हे राम सातपुते यांना निवडणुकीत पणाला लावायला तयार नाहीत का, अशीही चर्चा आहे. राम सातपुते यांना माळशिरसमधून पुन्हा उमेदवारी मिळणार की दुसऱ्या कोणाला संधी मिळणार, याकडे लक्ष असणार आहे.

बार्शी मतदारसंघ कोणाकडे?

बार्शी मतदारसंघातून मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर राजेंद्र राऊत हे अपक्ष निवडून आले होते. गेली पाच वर्षे ते भाजपसोबत कायम राहिले, त्यामुळे त्यांना महायुती सरकार आल्यावर निधीही मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवण्याची घोषणा राऊत यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचीही उमेदवारी पहिल्या यादीत घोषित होणे अपेक्षित असताना त्यांनाही वेटिंगवर ठेवण्यात आली आहे, त्यामुळे बार्शीतून राऊत यांना उमेदवारी मिळणार की महायुतीमध्ये हा मतदारसंघ दुसऱ्या पक्षाकडे जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT