Sanjay Rathod Sarkarnama
विश्लेषण

Sanjay Rathod Exclusive : संजय राठोडांनी गाजावाजा न करता महाराष्ट्राची सीमा ओलांडली; पिक्चर अभी बाकी है...

Sanjay Rathod's Journey in Maharashtra Politics : मतदारसंघातून निवडणूक येण्याची क्षमता आणि बंजारा समाजाचा भक्कम पाठिंबा ही संजय राठोड यांची सर्वात मोठी ताकद आहे.

Rajesh Charpe

Signs of a Shift: Rathod’s National Ambitions : मृदा व जलसंधारण खात्याचे मंत्री संजय राठोड कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच चर्तेत असतात. काही वर्षांपूर्वी एका तरुणीच्या आत्महत्येमुळे ते अडचणीत सापडले होते. काही काळासाठी मंत्रिपद गमवावे लागले होते. मात्र भाजपच्या महायुतीत सहभागी झाल्याने त्यांच्यावर सर्व डाग धुतल्या गेले आहे. मतदारसंघातून निवडणूक येण्याची क्षमता आणि बंजारा समाजाचा भक्कम पाठिंबा ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे.

एकेकाळी यवतमाळ जिल्हा आणि बंजारा समाजावर नाईक कुटुंबीयांचे वर्चस्व होते. त्यांचा शब्द अंतिम मानला जात असे. वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री राज्याला यवतमाळ जिल्ह्याने दिले. माजी मंत्री मनोहराव नाईक वयोनामाने थकले आहेत. याच घरण्यातील इंद्रनिल नाईक राज्यमंत्री असले तरी त्यांचा प्रभाव बंजारा समाजावर फारसा नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या बंजारा समाजाने संजय राठोड यांना आपला नेता मानले आहे. त्यामुळे त्यांची ताकद अधिक बळकट झाली आहे. यातूनच आता राठोड यांना समाजाचा राष्ट्रीय नेता व्हायचे वेध लागले आहेत. त्या दिशेने त्यांनी आपले इंजनिअरिंग सुरू केले आहे.

देशभरातील समाज बांधवांचे मेळावे, सामूहिक विवाह सोहळे व इतर कार्यक्रमांना ते हजेरी लावत आहेत. सोबतच त्यांच्या परंपरागत दारव्हा-दिग्रस विधानसभा मतादारसंघात पत्नी शीतल आणि मुलगी हे अलीकडे ॲक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे. यावरून संजय राठोड राष्ट्रीय राजकारणात जातील आणि तोवर आपल्याच घराण्यातला वारसदार राज्यात तयार करीत असल्याचे बोलले जात आहे.

संजय राठोड यांच्या 2024 च्या निवडणुकीच्या प्रचाराची सर्व सूत्रे त्यांच्या पत्नी शीतल राठोड यांच्याकडे होती. त्या मतदारसंघातील सर्व सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात, समाजातही वावरत असतात. त्यापूर्वी मुलगीसुद्धा राजकारणात सक्रिय होती. त्यांना एक लहान मुलगासुद्धा आहे. संजय राठोड अवघ्या वर्षांचे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात बस्थान बसवायला त्यांच्याकडे पुरेसा वेळही आहे.

बंजारा समाजाचे पहिले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे शरद पवार यांच्यासोबपत घट्ट नाते होते. अनेक वर्षे ते मुख्यमंत्री होते. शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर सुधाकरराव नाईक यांना त्यांनी मुख्यमंत्री केले होते. मात्र ते वर्षभराच या पदावर राहिले. यावेळी त्यांचे आणि शरद पवार यांच्यासोबत मोठे मतभेद निर्माण झाले होते. मुंबईत उसळलेल्या दंगलीनंतर सुधाकरराव नाईक यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नाईकांचे राजकारण संपुष्टात आले. मनोहर नाईक यांनी शरद पवार यांच्यासोबत निष्ठा कायम ठेवली. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची पताका आजही याच घराण्यामुळे फडकत आहे.

याच कुटुंबातील सदस्य नीलय नाईक यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले होते. सहा वर्षे आमदार राहिल्यानंतरही त्यांना आपला जम बसवता आला नसल्याचे दिसून येते. इंद्रनील नाईक यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ते राज्यमंत्री आहेत. नाईकांचे बंजारा समाजात वजन कमी झाल्याने राठोड यांना आपला जम बसवण्याची चांगली संधी मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते होते. एका महिलेचे प्रकरण भाजपच्या नेत्यांनी चांगलेच लावून धरले होते. राजकीय दबावापोटी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात जाण्याचा मार्ग पुन्हा खुला झाला.

बंजारा समाज आपल्याकडे वळवण्याचे भाजपचे प्रयत्न बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. बंजारा समाजाचे पोहरादेवी हे दैवत आहे. समाजाच्या महंत असलेले बाकसिंग महाराजांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले. मात्र ते राजकारणी नाही. राजकराणातील छक्के पंजे त्यांना कळत नाही. त्यामुळे ते आमदार झाले असले तर यवतमाळ जिल्ह्यात भाजपला अद्याप समाज मान्यता मिळवून ते देऊ शकले नाही. आपल्या विरोधात दुसरा समाज बांधव उभा केला जात असल्याची बाब संजय राठोड यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी आपला सर्व मोर्चा बंजारा समाजाचे तीर्थस्थळ असलेल्या पोहरादेवी गडाकडे वळवला.

उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पोहरादेवी गडाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांनी मिळवला. तत्कालीन उद्धव ठाकरे यांना आणून भूमिपजून केले. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असल्याने त्यांच्या काळात गडाच्या विकासाला गती दिली. त्यामुळे सध्या संजय राठोड बंजारा समाजात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. आमचा नेता म्हणून त्यांनी समाजाची मान्यताही मिळवली आहे. आता त्यांनी आपल्या नेतृत्वाचा विस्तार राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

राष्ट्रीय पातळीवर बंजारा समाजाचे नेतृत्व आपल्याकडे यावे यासाठी राठोड प्रयत्न करताना दिसतात. महिनाभरात त्यांनी उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत बंजारांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. उत्तर प्रदेशमध्ये बंजाराच्या सामूहिक विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहिले होते. त्याचबरोबर बंगळूरला बंजारा समाजाच्या मेळाव्यालाही गेले होते. यवतमाळ जिल्ह्यात बंजारा विरुद्ध कुणबी असा राजकीय संघर्ष नेहमीच सुरू असतो. आपला लोकप्रतिनिधी येथे असावा असेच प्रयत्न बंजारा समाजाचे असतात. त्यामुळे राठोड यांचेही चांगलेच फावत आहे.

राजकीय प्रतिस्पर्धी आणि शिवसेनेतील सहकारी भावना गवळी यांना लोकसभेच्या निवडणुकीत डच्चू देण्यात आला होता. विधान परिषदेवर पाठवून त्यांचे एकनाथ शिंदे यांनी राजकीय पुनर्वसन केले असले तरी आता पूर्वीसारखी ताकद त्यांच्या राहिली नाही. भावना गवळी यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवातून हे दिसून येते.

जिल्ह्यातून भाजपने अशोक उइके यांना मंत्री केले आहे. समाजकल्याण सारखे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मात्र उइके हे साधेभोळे आहेत. ते आणि राठोड शक्यतोवर एकमेकांच्या भानगडीत पडत नाही. आरोप-प्रत्यारोप करीत नाहीत. आपण बरे आणि आपले काम बरे असे धोरण उइके यांचे आहे. याशिवाय राठोड यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे जिल्ह्यात स्वतःला अधिक बळकट करण्याचे सर्व साधने त्यांच्याकडे आज उपलब्ध आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT