Sharad Pawar-Ajit Pawar-Shashikant Shinde Sarkarnama
विश्लेषण

NCP Leadership : ‘विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व अजितदादांकडे देण्याचा निर्णय पवारांसह सर्व नेत्यांनी घेतला होता’

Shashikant Shinde Article : शशिकांत शिंदे यांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत. अजित पवारांकडे नेतृत्व सोपविण्याबाबत सर्वानुमते संमती होती, या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 13 February : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात येणार होते, त्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पक्षातील सर्व नेत्यांची संमती होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

शशिकांत शिंदे (Shashikant Shinde ) यांनी राष्ट्रवादीच्या मासिकात विलिनीकरणाबाबत लेख लिहिन आपल्या भावना मांडल्या आहेत. त्यात त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण हे १२ फेब्रुवारी रोजी होणार होते, हे पुन्हा एकदा आधोरेखित केले आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी पुढाकार घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर विलिनीकरणाचा विषय ठप्प झाला आहे.

शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या आणि खोटेनाटे षडयंत्र यांना कंटाळून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. याची राज्यातील सर्व जनतेला माहिती आहे. पण गेल्या चार ते पाच महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अजितदादा हे कामाला लागले होते.

दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रिकरण करायचे, असा निर्धार करून ते ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील आणि आमच्याशी चर्चा करायचे. त्यातूनच त्यांनी प्रथम पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढवतील, असा निर्णय घेतला होता.

त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही राष्ट्रवादीची युती घडवून आणली होती आणि दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा प्रचारही ते करत होते, असेही शिंदेंनी लेखात म्हटले आहे.

दोन्ही राष्ट्रवादीचे १२ फेब्रुवारी रोजी विलिनीकरण करायचे, असा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. दोन्ही पक्षाचे एकत्रिकरण झाल्यानंतर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडे सोपवायचे, असा निर्णय स्वतः पवारसाहेब यांच्यासह आमच्या पक्षातील सर्व नेत्यांनी घेतला होता. पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही तीच इच्छा होती. त्यासाठी ते आग्रही होते. पण तत्पूर्वीच काळाने घाला घातला आणि अजितदादांची स्वप्न अधुरे राहिले, ते स्वप्न पूर्ण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही शिंदेंनी म्हटले आहे.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात बोलताना कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी विलिनीकरणाचा निर्णय आणि अधिकार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत, असे स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मात्र शशिकांत शिंदे यांचा लेख वाचल्यानंतर प्रतिक्रिया देईन, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT