महाराष्ट्राला समृद्ध राजकीय परंपरा आहे. राजकारण, कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप एकीकडे तर दुसरीकडे त्याच नेत्यांमध्ये राजकीय सौहार्दही महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या या राजकीय संस्कृतीला जणू दृष्टच लागली. या समृद्ध राजकीय संस्कृतीचा सातत्याने दाखला देणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचाही जेव्हा तोल सुटतो, तो क्षण थक्क करणारा असतो. ही संस्कृती जपणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरच राऊत यांनी आता निशाणा साधला आहे.
शिवसेना फुटली त्याला एकनाथ शिंदे कारणीभूत ठरले. शिवसेना फुटल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी अत्यंत हीन पातळी गाठली होती. असे आरोप-प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी अद्यापही सुरू आहेत. शिवसेनेतून फुटणाऱ्यांना गद्दार असे संबोधण्याची जुनीच परंपरा आहे. असे संबोधन ठाकरे गटाच्या वतीने शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वारंवार लावण्यात आले. शिवसेना फुटली, नंतर निवडणूक झाली, शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाऊन ते उपमुख्यमंत्री झाले तरीही हा वाद सुरूच आहे. शिंदे यांना पुरस्कार मिळाला, तो शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावरून संजय राऊत यांचा तिळपापड झाला आहे.
शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशा प्रसंगी एकमेकांवर टीका केली जात नाही, ही साधी गोष्ट राऊत यांच्या लक्षात आलेली नाही. पुरस्कार प्रदान केल्यानंतर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. ते साहजिकच होते. अशा प्रसंगी शरद पवार यांनी शिंदे यांच्यावर टीका करावी किंवा त्या सोहळ्यालाच उपस्थित राहू नये, अशी संजय राऊत यांची अपेक्षा असेल तर अर्थातच ती अत्ंयत चुकीची आहे. शिवसेना का फोडली, असा प्रश्न पवारांनी या कार्यक्रमात शिंदेंना विचारायला हवा होता का, हे राऊत यांनी स्पष्ट केले पाहिजे.
शिवसेना-भाजपची युती 2019 मध्ये तुटली. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. शरद पवार यांनी प्रयत्न केले नसते तर महाविकास आघाडी स्थापन झाली नसती, हे राऊत यांनाही माहित आहे. शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळेच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते शरद पवार यांच्यामुळेच. शरद पवार यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना शांत केले असते, त्यांची समजूत काढली असती तर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, हेही राऊत यांना माहिती आहे.
शरद पवार यांना राजकारणातील वस्ताद म्हणून ओळखले जाते. सरकार कोणाचेही असो, शरद पवार यांच्यासोबत कितीही आमदार, खासदार असो, त्यांना डावलणे कोणत्याही पक्षाला, नेत्याला शक्य होत नाही. त्यांचा 'रेलेव्हन्स' कायम असतो. शरद पवार कधी काय करतील हे सांगता येत नाही, असे त्यांच्याबद्दल नेहमीच बोलले जाते. त्यात मोठ्या प्रमाणात तथ्य आहे. सध्या महायुतीत उपमुख्यमंत्री शिंदे काहीसे बाजूला पडल्यासारखे वाटत आहेत. त्यांच्या पक्षाच्या अतंर्गतही काही वेगळ्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे.
शिंदे यांचे सहकारी, उद्योगमंत्री उदय सामंत हे 20 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली होती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केमिस्ट्री सध्या जबरदस्त जुळलेली दिसत आहे. अजितदादा पवार यांनीही काकांची म्हणजे शरद पवारांची साथ सोडली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे, हे राऊत यांनी लक्षात घेतले पाहिजे. गद्दारांचा सन्मान पवारांनी करायला नको होता, असे राऊत यांचे म्हणणे आहे, मात्र त्यांचेच नेते मुख्यमंत्री फडणवीस यांची वारंवार भेट घेतात, याला काय म्हणायचे?
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्याची खूप चर्चा झाली. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची अनेकवेळा भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनीही फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली आहे. यावर राऊत यांनी थयथयाट का केला नाही? राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे राऊत यांनाही माहित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर त्यांनी आक्षेप घेतला नसेल.
पुरस्कार वितरण सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनीही शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. पवारांनी माझ्यावर कधीही गुगली टाकली नाही, असे ते म्हणाले. त्याचाच जास्त राग राऊत यांना आला असेल. शिंदेंनी शिवसेना फोडली वगैरे ठिक आहे, मात्र त्याचा भार शरद पवार यांनी वाहावा, असे राऊत यांना वाटत असेल तर ते निरर्थक आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. त्याचा निकाल सर्वांना माहित आहे. आता नव्याने वाटचाल सुरू करण्याशिवाय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर पर्याय रहिलेला नाही. शरद पवार यांनी तशी वाटचाल सुरू केलेली आहे.
पक्ष फोडल्याचा राग साहजिक आहे, मात्र आता वेळ आहे रस्त्यावर उतरून काम करण्याची. याचा विसर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनाही पडला आहे. पक्षाची नव्याने उभारणी करण्याऐवजी शिंदेंना डिवचण्यासाठी ठाकरे यांनी मध्यंतरी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. असे असताना संजय राऊत हे कोणत्या अधिकाराने शरद पवार यांना सल्ले देत असतील? महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्युमुळे सरकारची कोंडी झाली आहे.
हे दोन्ही मुद्दे सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनीच हायजॅक केले आहेत. त्यावेळी संजय राऊत आणि त्यांचा पक्ष काय करत होता? आमदार धस यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून पोलिसांना माफ करा, अशी विनंती केली आहे. विरोधकांच्या हाती हा अत्यंत महत्वाचा मुद्दा लागला होता. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यावरून भाजपची कोंडी केली आहे. राऊत आणि त्यांच्या पक्षाने काय केले? गद्दारी वगैरे मुद्दे बाजूला ठेवून संजय राऊत आणि त्यांचा पक्ष लोकांच्या प्रश्नांसाठी लढणार आहे की केवळ थयथयाट आणि भाजपशी जवळीक साधण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार आहे?
शरद पवार यांना सल्ले देण्यापूर्वी संजय राऊत यांनी महाराष्ट्राची समृद्ध राजकीय परंपरा समजून घेतली पाहिजे. शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांचा अभ्यास केला पाहिजे. या दोन्ही बाबी त्यांना माहित नाहीत, असे म्हणता येणार नाही. त्यांच्या थयथयाटाने पवार यांचे काहीही नुकसान होणार नाही. राजकारण वेगळे आणि कौटुंबिक संबंध वेगळे, असे पवार कुटुंबीय नेहमी सांगत आले आहेत. अजितदादा पवार वेगळे झाले म्हणून त्यांनी एकमेकांवर जहाल टीका केली नाही. पक्षफोडी, गद्दारी आदी मुद्द्यांमध्ये किती अडकून पडायचे हा राऊत यांचा प्रश्न आहे, मात्र शरद पवारांवर टीका करणे, सल्ले देणे हे अंगलट येणार, हे निश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.