
NCP-Shiv Sena Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांवरच टीका केली असून त्यांच्या भाषणातील काही मुद्द्यांवरही नाराजी व्यक्त केली आहे. काय म्हणाले होते, शरद पवार आपल्या भाषणात?
शरद पवारांनी आपल्या भाषणादरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केले होते. ठाण्याचे राजकारण, सातारचे मुख्यमंत्री यांसह काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला होता. पवारांनी हे संपूर्ण भाषण सोशल मीडियामध्ये पोस्ट केले आहे. याच भाषणातील काही मुद्यांवरून राऊत भडकले आहेत.
राजधानी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात आज सर्व मान्यवर मंडळींसह उपस्थिती लावली. या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या कुटुंबाचं प्रचंड योगदान आहे ते ज्योतिरादित्य सिंधिया (शिंदे), केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला ते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे, राम सुतार, संजय नहार, व्यासपीठावरचे अन्य सहकाऱ्यांसह सर्वांशी संवादही साधला. दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
एक आनंदाची गोष्ट अशी आहे की, यंदाच्या वर्षीचं मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये होतंय. अनेक वर्षांनंतर हा योग आलाय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झालं, ज्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते आणि त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. इतका काळ लोटल्यानंतर मराठी भाषिकांना देशाच्या राजधानीमध्ये ही संधी मिळते. त्याच्यामध्ये सरहद आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, साहित्य परिषदेने पुढाकार घेतला व कष्ट केले त्याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन केले.
या अधिवेशनाला इतिहास आहे. मला आठवतंय की, देशाचे जाट समाजाचे एक प्रधानमंत्री होते. चंद्रशेखर यांच्यानंतर त्यांनी ही सूत्र हातात घेतली होती. कधी माझी भेट झाली की नेहमी ते टीकाटिप्पणी करायचे. ते नेहमी सांगायचे तुम्ही लोकांनी आणखी इतिहास घडवायला पाऊलं टाकायला हवी होती. मी त्यांना विचारलं तुमची तक्रार काय आहे? त्यांनी सांगितलं सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठे दिल्लीपर्यंत आले. त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि दिल्ली सोडून तालकटोरामध्ये गेले व तिथे राहिले. सदाशिवराव भाऊंनी सांगितलं की आम्हाला गंगेत स्नान करण्यासाठी जायचं आहे, आता इथे थांबायची आवश्यकता नाही. त्यावेळी सुरजमल जाट हा दिल्लीचा राज्यकर्ता होता. त्यांनी सांगितलं की, मराठ्यांनी आयुष्यात केलेली ही चूक आहे. गंगेमध्ये स्नान कधीही करता आलं असतं. पण दिल्ली हातात असताना ती दिल्ली सोडून भलतीकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, हा काही योग्य नव्हता. असं सुरजमल जाटने सांगितलं, मी काही इतिहास तज्ज्ञ नाही.
आज या ठिकाणी एकनाथरावांचा सन्मान आहे. त्यांनी सांगितलं की, आम्ही सगळे सातारकर आहोत. माझी गंमतीची गोष्ट आहे, दोन ठिकाणी मला अडचणी होतात. एक ठाणे महानगर पालिकेमध्ये सन्माननीय सभासद होते, अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था चालू होती. माझा आणि त्या संस्थेचा कधी संबंध आला नाही. एकदा वेगळ्या अशा प्रकारचं व्यासपीठ होतं, अनेक मोठे नेते होते. मला आठवतंय, हेगडे यांचं नेतृत्व होतं व प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू त्याठिकाणी होते. मराठीतले एक महत्वाचे कवी जे सातारकर होते त्यांचं नाव पी. सावळाराम. त्यांची काही गाणी ही खेड्यापाड्यात सुद्धा लोकांच्या मुखात होती. एक काळ असा होता की, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मुला- मुलींचं लग्न लागलं की सनईवर किंवा रेकॉर्डवर एक गाणं यायचं 'जा मुली जा, तु दिल्या घरी सुखी रहा' वगैरे.. त्याचे कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष आणि सातारकर होते.
मला याची आठवण झाली त्याला एक कारण आहे. मी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी होतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, ग. दि. माडगूळकर आमदार होते आणि ठाण्याला निवडणूक होती. माडगूळकरांनी नाईक साहेबांना सांगितलं की, आमच्या सावळाराम पाटलाला अध्यक्ष करा. पक्षाचा सचिव म्हणून मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की ठाण्याला जायचं, दोन- तीन दिवस बसायचं आणि काहीही झालं तरी सावळाराम पाटील अध्यक्ष होतील हे बघायचं. आता मी काँग्रेसवालाच होतो, काय उद्योग करायचे ते माहित होते. ते उद्योग केले आणि त्यांना त्याठिकाणी अध्यक्ष केलं. मी नाईक साहेबांना फोन केला की तुमचं काम झालंय. ते म्हटले त्यांना घेऊन या. कारण ही सूचना माडगूळकरांची होती आणि सुदैवाने माडगूळकर आज माझ्या घरी आहेत.
मी सावळाराम पाटलांना बरोबर घेतलं आणि नाईक साहेबांच्या घरी 'वर्षा'वर गेलो. माडगूळकर यांनी त्यांना मिठी मारली आणि माझ्या पाठीवर थाप मारली. 'गड्या, मोठं काम केलं तु'.. 'येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला'..! सावळाराम पाटील यांच्या गावाचे नाव येडं मच्छिंद्र. त्यामुळे येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम तू केलं, म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं होतं. त्या ठाण्याच्या महानगर पालिकेमध्ये हे सावळाराम होते, शिंदे साहेब होते, रांगणेकर होते. ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा मोठा वाटेकरी किंवा जबाबदारी ही एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती, हे याठिकाणी सांगायला हरकत नाही.
मला आनंद आहे की, त्यांचा सत्कार याठिकाणी आहे. सांगताना त्यांनी सांगितलं की, सातारचं आहे. एकनाथराव, साताऱ्याने बरेच मुख्यमंत्री दिले. अनेकांना माहित नसेल मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीभाई कूपर. साताऱ्यात कूपर नावाची एक कंपनी होती. त्याचे मालक जे आता नाहीत ते मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण झाले व त्यानंतर एकनाथराव झाले. मला त्यांना आठवण करून द्यायचीये, तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव राहिलं. त्या गावाचे नाव नांदवळ आणि त्या गावच्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे शरद पवार! त्यामुळे मला आनंद आहे की, आज महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली. नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल? याप्रकारची काळजी त्यांनी घेतली.
ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा सगळा नागरी भाग आहे. अलीकडच्या 50 वर्षांमध्ये नागरी प्रश्नांसंबंधित जाण असलेला नेता कोण? याची जर माहिती घेतली तर कटाक्षाने एकनाथ शिंदे यांचं नाव घ्यावं लागेल. मग ते ठाणे असेल, ठाणे नगरपालिका असेल, नवी मुंबई असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील. म्हणून एक योग्य दिशा देण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. हे करत असताना कुठलाही पक्षीय अभिनिवेश न ठेवता विविध क्षेत्रातील लोकांशी सुसंवाद ठेऊन राज्य आणि विशेषत: हा नागरी परिसर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल? यामध्ये लक्षकेंद्रित करण्याचं काम त्यांनी केलं, याची नोंद ही महाराष्ट्राच्या सार्वजनिक इतिहासामध्ये निश्चितपणाने राहिल. त्यामुळे त्यांचा सन्मान होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. तो सन्मान कसा होतोय? शिंदे यांचा पुरस्कार! शिंदेंना शिंद्यांचा पुरस्कार! तो ही जावई असलेल्या शिंदेंच्या हातून.. आनंद आहे.
सरहदने हा कार्यक्रम घेतला. माझी खात्री आहे की, ज्या अगत्याने आज आपण याठिकाणी उपस्थित राहिलो त्याचं महत्वाचं कारण मी गेले काही दिवस दिल्लीमध्ये बघतोय, इथलं वातावरण बदललंय. दिल्लीमध्ये आम्हा लोकांना स्थानिक लोक भेटायला येत असत. अलीकडे जो येतो तो प्रत्येकजण साहित्य संमेलनासंबंधी काही ना काहीतरी सांगायला येतोय. आज दिल्लीकर आणि दिल्लीचे मराठी भाषिक अतिशय खुशीत आहेत. ते वाट बघतायत की २१, २२, २३ कधी येते? प्रधानमंत्र्यांचं भाषण कधी होतंय? अन्य कार्यक्रम कधी होतील? गेले काही दिवस बघतोय दिल्लीची रोजची संध्याकाळ सरहद असो, साहित्य परिषद असो व अन्य संस्था असो त्या सगळ्यांनी विविध प्रकारचे उपक्रम याठिकाणी आयोजित करून दिल्लीकरांना एक प्रकारचं मानसिक समाधान देण्याचं काम सुरु केलं. माझी खात्री आहे की, हे साहित्य संमेलन अतिशय यशस्वी होईल व लोकांच्या लक्षात राहिल. दिल्लीकरांनी त्याच्या पाठीशी जी शक्ती उभी केली त्याची नोंद सबंध देशातील मराठी भाषिकांच्यात घेतली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करून माझ्या संवादाला पूर्णविराम दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.