Mahadev Jankar-Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Madha Lok Sabha Constituency : पवारांनी अर्धी लढाई जिंकली...अर्धी लढाई जानकरांना जिंकायचीय!

Mahavikas Aghadi News : एकीकडे भाजप उमेदवाराविषयी असणारी नाराजी आणि मतदारसंघातील सामाजिक समीकरण साधले गेल्यास जानकर यांच्यासाठी दिल्ली दूर नसणार आहे. पण, त्यासाठी जानकरांना मोहिते पाटील यांच्याशी यशस्वी शिष्टाई करावी लागणार आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 23 March : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे लोकसभेचे उमेदवार निश्चित झाले असून, माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासाठी सोडून पवारांनी आर्धी लढाई जिंकल्याचे मानले जात आहे. एकीकडे भाजप उमेदवाराविषयी असणारी नाराजी आणि मतदारसंघातील सामाजिक समीकरण साधले गेल्यास जानकर यांच्यासाठी दिल्ली दूर नसणार आहे. पण, त्यासाठी जानकरांना मोहिते पाटील यांच्याशी यशस्वी शिष्टाई करावी लागणार आहे. जानकरांना आपल्या बाजूने वळवून पवारांनी एकाच वेळी तीन मतदारसंघांसाठी बेरजेचे राजकारण केल्याचे मानले जाते. शिवाय, जानकरांच्या पक्षाची राज्यभरातील ताकदही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या कामी येणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ हा 2009 मध्ये अस्तित्वात आला. माढ्याची पहिली निवडणूक ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लढवली आणि ते तब्बल 3 लाख 14 हजार 459 मताधिक्यांनी निवडून आले होते. या निवडणुकीत पवार यांच्या विरोधात भाजपचे सुभाष देशमुख आणि रासपचे महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती. जानकर त्यावेळी राजकारणात नवखे होते, तरीही त्यांनी माढ्यातून तब्बल 98 हजार 946 मते घेतली होती. भाजप उमेदवार देशमुख यांची ताकद, पक्षसंघटनेचे बळ लक्षात घेता जानकरांची मते उल्लेखनीय होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुढच्या 2014 च्या निवडणुकीत पवारांनी (Sharad Pawar) माघार घेतल्यानंतर माढ्यातून (Madha) माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले. विजयदादांनी मोदी लाटेतही विजयाचा गुलाल उधळला होता. मात्र, त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्याशी निकराची लढाई लढावी लागली होती. त्या निवडणुकीत विजयदादांना 4 लाख 89 हजार 989, तर खोत यांना 4 लाख 64 हजार 645 मते मिळाली होती. याच निवडणुकीत मोहिते पाटील हे 25 हजार 344 मतांनी निवडून आले होत. म्हणजे 2009 च्या तुलनेत राष्ट्रवादी मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटले होते.

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत संपूर्ण राज्याप्रमाणे माढ्यातही उलटफेर झाला होता. ज्या भाजपच्या विरोधात दोन हात केलेले विजयसिंह मोहिते पाटील (Vijayshinh Mohite Patil) आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह यांनी भाजपशी घरोबा केला होता. त्यावेळी हक्काच्या मतदारसंघात मोहिते पाटील यांना डावलण्यात आले. त्या निवडणुकीत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांच्यात तुल्यबळ लढत झाली. पण मोदी लाटेचा फायदा घेत निंबाळकर हे 85 हजार 764 मताधिक्यांनी निवडून आले.

अकलूजकर बंड करणार का?

सध्या माढ्याच्या उमेदवारीवरून भाजप आणि महायुतीमध्ये खडाखडी सुरू आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या फलटणच्या निंबाळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण जवळपास फडकवल्यात जमा कारण खासदारकीसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील हे गाठीभेटीच्या माध्यमातून प्रचारात गुंतले आहेत.

महायुती कागदावर बलाढ्य; पण...

माढ्यात तसं पाहिलं तर महायुतीचे सर्व आमदार आहेत. माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार बबनराव शिंदे, करमाळ्यात राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे, सांगोल्यात शिवसेनेचे शहाजी पाटील, माळशिरसमध्ये राम सातपुते, फलटणमध्ये राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण, माण-खटावमध्ये जयकुमार गोरे हे आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे पारडे कागदावर जड वाटते. मात्र, प्रत्यक्षात मोहिते पाटील आणि रामराजे यांच्याकडून निंबाळकरांना कडाडून विरोध होत आहे आणि ‘ग्राउंड रियालटी’ही वेगळी आहे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला माढ्याचे रणांगण सोपे नाही.

मोहिते पाटील-रामराजेंची ताकद लक्षणीय

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नेमके हेच हेरले आणि मतदारसंघातील सामाजिक समीकरण, सद्यःस्थितीत जानकरांच्या रूपाने ‘माइंड गेम’ खेळला आहे. जानकर (Mahadev Jankar) यांनी पवारांच्या विरोधात तब्बल लाखभर मते घेतली होती. आता निंबाळकर यांच्याविषयी असलेली नाराजी, मोदी सरकारच्या धोरणांवर नाराज असलेले शेतकरी आणि मतदारसंघातील धनगर समाजाची मते ही जानकर यांची जमेची बाजू आहे. दुसरीकडे खुद्द मोहिते पाटील आणि समर्थकांची मते या मतदारसंघात लक्षणीय आहेत. त्यामुळे मोहिते पाटील यांनी माघार घेऊन शांत राहण्याचे धोरण स्वीकारले तरी ते जानकर यांच्या पथ्यावर पडणारे आहे. फलटणच्या रामराजेंची ताकदही भाजपला दुर्लक्षून चालणार नाही.

बारामती-साताऱ्याला होणार फायदा

माढ्यात धनगर समाजचे नेते महादेव जानकर यांना तिकीट देऊन पवारांनी बारामती आणि सातारा लोकसभेचे गणित बऱ्यापैकी जुळवून आणले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर, दौंड आणि बारामती या तीन विधानसभा मतदारसंघांत धनगर समाजाची मतसंख्या मोठी आहे. त्यामुळे माढ्यातील मदतीची परतफेड सातारा आणि बारामतीत रासपकडून होऊ शकते.

ती भेट फलदायी ठरणार

आमदार महादेव जानकर यांनी दोनच दिवसांपूर्वी अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर जाऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती. त्या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात साहजिकच चर्चा झाली असणार. जानकर यांना मोहिते पाटील यांचे मन वळविण्यात यश आले, तर जानकर यांच्यासाठी ती मोठी जमेची बाजू असू शकते. पण, मोहिते पाटील थांबवणार आणि माढ्यातून लढणार का, याची उत्सुकता असणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT