Shankarrao Patil-Harshvardhan Patil-Supriya Sule-Sharad Pawar 
विश्लेषण

Indapur Politic's : पवारांचा 2029 साठी 'मास्टर स्ट्रोक'; हर्षवर्धन पाटलांचाही विधानसभेचा मार्ग मोकळा...!

सरकारनामा ब्यूरो

रविकिरण सासवडे

Pawar-Patil Political News : माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशामुळे या दोन घराण्यांतील संघर्षाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ही खेळी केवळ विधानसभा डोळ्यासमोर ठेवून नाही, तर २०२९ च्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघ खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अधिकाधिक सुरक्षित करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांचे चुलते, माजी खासदार (स्व.) शंकरराव पाटील यांच्यापासून सुरू असणारा हा संघर्ष संपवत हर्षवर्धन पाटील यांनी अखेर विधानसभेतील दोन पराभवानंतर वाट मोकळी करून घेतली आहे. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पाटील-पवार संघर्षाला सुमारे ४० वर्षांचा इतिहास आहे.

लोकसभेच्या आठव्या आणि अकराव्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे चुलते शंकरराव पाटील आणि शरद पवार यांच्यात थेट लढत झाली होती. या दोन्ही लढतीत शरद पवार विजयी झाले होते. इंदापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे. बारामती तालुक्याच्या जवळचा मतदारसंघ म्हणून या तालुक्यातील मतदारांवर पवार घराण्याचा प्रभाव आहे.

समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर १९८४ मध्ये शरद पवार यांनी तत्कालीन खासदार शंकरराव पाटील यांचा पराभव केला होता. मात्र १९८५ मध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसकडून शंकरराव पाटील आणि जनता पक्षाच्या वतीने संभाजीराव काकडे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही पवार-पाटील घराण्यात सुप्त संघर्ष दिसून आला होता.

जनता पक्षाच्या संभाजीराव काकडे यांनी शंकरराव पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत शरद पवार यांनी शंकरराव पाटील यांच्याविरोधात काकडे यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जाते. दरम्यान, १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेस (आय) पक्षात प्रवेश झाला. लोकसभेसाठी काँग्रेसकडून पुन्हा शंकरराव पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांनी भाजपच्या संभाजीराव काकडे यांचा पराभव केला.

त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९१ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पुतणे अजित पवार यांच्यासाठी राजकीय खेळी खेळली. विद्यमान खासदार शंकरराव पाटील यांना डावलून अजित पवार यांच्यासाठी काँग्रेसकडून तिकीट मिळविण्यात शरद पवार यशस्वी झाले. अजित पवार यांनी ही निवडणूक जिंकली.

त्यानंतर १९९६ मध्ये लोकसभेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसकडून शरद पवार, तर काँग्रेसने डावलल्यामुळे अपक्ष म्हणून शंकरराव पाटील यांनी पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला. पवार यांनी अपक्ष उमेदवार शंकरराव पाटील यांच्या विरोधात ४ लाख २७ हजार ५५९ मते मिळवली आणि विजयी झाले.

त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरमधून सलग चार वेळा हर्षवर्धन पाटील आमदार झाले. पवार-पाटील घराण्यातील संघर्ष कमी करीत २०१४ चा अपवाद वगळता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सांगता सभा घेतल्या. मात्र, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्षाची धग कायम राहिली.

काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला हर्षवर्धन पाटलांनीच लावला सुरुंग

केंद्रात १९९१ ते १९९६ मंत्री असलेल्या शरद पवारांची महाराष्ट्र काँग्रेसवर चांगली पकड होती. मात्र, १९९५ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान इंदापूरचे काँग्रेसचे तत्कालीन आमदार गणपतराव पाटील यांच्याविरोधात हर्षवर्धन पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवले. हर्षवर्धन पाटील यांनी घड्याळाच्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली. आतापर्यंत काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकणाऱ्या येथील मतदारांनी प्रथमच काँग्रेसच्या विद्यमान आमदारास पराभूत करून बंडखोर हर्षवर्धन पाटील यांना निवडून दिले होते.

त्यानंतरच्या १९९९ मधील निवडणुकीत काँग्रेसचे किसन नरुटे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुरलीधर निंबाळकर यांच्यासोबत अपक्ष हर्षवर्धन पाटील यांचा सामना झाला. त्याही निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करीत हर्षवर्धन पाटील आमदार झाले. पाटील यांनी २००४ मध्येही अपक्ष राहूनच विजय मिळवला होता. काँग्रेसपासून १९९६ मध्ये दुरावलेल्या पाटील घराण्याने २००९ आणि २०१४ मध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला.

पुलोद प्रयोगावेळी शंकरराव पाटील चव्हाणांसोबत

रेड्डी काँग्रेस व इंदिरा कॉंग्रेस यांच्यातील संघर्षामुळे जुलै १९७८ मध्ये शरद पवार यांनी चाळीस आमदारांचा आपला वेगळा गट स्थापन केला. वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून बाहेर पडलेल्या या ४० आमदारांमुळे तत्कालीन वसंतदादांचे सरकार पडले. त्यावेळी आमदार असणाऱ्या शंकरराव पाटील यांनी मात्र काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री असणाऱ्या शंकरराव चव्हाण यांच्या गटासोबत राहणे पसंत केले होते. काँग्रेसमध्येच शंकरराव चव्हाण यांचा एक वेगळा गट होता. राज्यपातळीवर त्यावेळी शरद पवार आणि शंकरराव चव्हाण यांच्या गटातही एक सुप्त संघर्ष होता.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT