थोडक्यात बातमी:
1. शशिकांत शिंदेंची नियुक्ती: शरद पवारांच्या गटाकडून शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा अनुभव, कार्यकर्त्यांशी संपर्क आणि माथाडी कामगार चळवळीतला प्रभाव हे निर्णायक ठरले.
2. राजकीय डावपेच: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीच्या तयारीला उत्तर देण्यासाठी, पवारांनी मुंबईतील माथाडी कामगारांमध्ये असलेल्या पकडीतून शिंदेंना पुढे करून मोठी रणनीती राबवली आहे.
3. साताऱ्यातून उदयनराजेंना आव्हान: राजघराण्यातील नेत्यांना टक्कर देण्यासाठी आणि साताऱ्यात राष्ट्रवादीचा गड पुन्हा मजबूत करण्यासाठी शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.
Shashikant Shinde News: शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या एका अनुभवी,मुत्सद्दी,कार्यकर्त्यांशी थेट कनेक्ट,सामाजिक संघटनांचं नेतृत्व केलेल्या आणि सातारा जिल्ह्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाला थेट आव्हान देणार्या शशिकांत शिंदेंची (Shashikant Shinde) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवलं आहे. पण शिंदेंची नियुक्ती केल्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.
जावळीसारख्या दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यातून उपजिविकेसाठी मुंबई गाठलेल्या जयवंतराव शिंदे या माथाडी कामगाराच्या घरात जन्मलेल्या शशिकांत शिंदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतली. त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत सातारा जिल्ह्यासह नवी मुंबईतही आपलं चांगलं राजकीय बस्तान बसवलं. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अडचणीत असताना प्रदेशाध्यक्षपद पदरात पडलेले शिंदे पवारांसाठी आगामी काळात लकी ठरतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवार यांनी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि त्यातही मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनला कामगार क्षेत्र व राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे. तेच ओळखून शशिकांत शिंदेंच्या रुपानं पवारांनी माथाडी कामगारांच्या चळवळीतलं मुरलेलं नेतृत्व पुढं आणलं आहे.
एकीकडे महायुतीकडून पुढील काळात होत असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच शरद पवारांनी (Sharad Pawar) दुसरीकडे माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या नेत्याला संधी देत मोठा डाव टाकला आहे.
सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मागे माथाडी कामगारांची मोठी फौज आहे. नवी मुंबई आणि मुंबई परिसरात शिंदे यांचं कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क उभं केलं आहे. त्यांच्या बोलण्यात प्रचंड आक्रमकपणा आहे. कोणाच्याही अंगावर जाण्याची त्यांच्यात धमक आहे. या साऱ्या बाबी शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादीसाठी अनुकूल आहेत.
शशिकांत शिंदेंनी राजकीय क्षेत्रात वाटचाल करतानाच सामाजिक चळवळीतलं लक्ष कमी होऊ दिलं नाही. त्यांनी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन,महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल मजदूर संघ, ,मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती,राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम,पाटबंधारे कामगार संघ यांसारख्या संघटनांच्या विविध जबाबदार्याही सांभाळल्या आहेत.ही त्यांची जमेची बाजू आहे.
मुंबई आणि नवी मुंबई हेच नेटवर्क आगामी काळात मुंबईत निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची भूमिका निभावू शकते. मुंबईचं राजकारण जसं मराठी माणसाशी जोडलं गेलं आहे, तसेच कामगार संघटनांचंही मुंबईच्या राजकारणावर मोठा पगडा आहे. हीच बाब हेरुन पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यावर थेट प्रदेशाध्यक्ष सोपविण्याचा निर्णय घेतला.
लोकसभेला जबरदस्त स्ट्राईक रेटनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीची पार पीछेहाट झाली.पक्षाचे अवघे दहाच आमदार निवडून आले.निकालानंतर अनेक नेतेमंडळींनी सत्तेची पावले जवळ करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आधार घेतला. येत्या काळातही पवारांना आणखी धक्के बसण्याची शक्यता असल्यामुळे पवारांनी कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत करण्याच्या उद्देशानं शिंदेंचं नेतृत्वाला संधी दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी राष्ट्रवादीत अखेर भाकरी फिरवली. आता पक्षाला उभारी देण्यासाठी पवारांनी त्यांच्यासोबत शशिकांत शिंदेंना घेतले आहे. शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करत राष्ट्रवादीने मराठा समाजातील आक्रमक नेत्याकडे सूत्रे सोपवत मोठी खेळी खेळली आहेत. मराठा आरक्षणाचा आगामी निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.
सातारा ही छत्रपतींची राजधानी असल्यानं मागच्या काही वर्षांचा अपवाद वगळता राजघराण्यातील ताकद इतक्या दिवस शरद पवारांच्या बाजूनं राहिली होती.पण आता ही ताकद भाजपच्या सोबतीला आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले असो वा शिवेंद्रराजे भोसले या राजघराण्यातील मातब्बर नेत्यांशी झुंजण्याची ताकद आमदार शशिकांत शिंदे दाखवू शकतात. तसेच भोसलेंसह भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील वाढत्या राजकारणाला सुरुंग लावण्यासाठीच पवारांनी त्याच मातीत कसलेल्या शिंदेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
शरद पवारांनी 1999 साली केलेल्या राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पुणे,पिंपरी-चिंचवड,नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, परभणी, उल्हासनगर,अमरावती व काही प्रमाणात ठाणे या महानगरपालिकांमध्ये सत्ता वा बऱ्यापैकी यश मिळवत पकड घेतली आहे. नाहीतर,पक्षाचा नगरपालिका आणि जिल्हा परिषदांसह ग्रामपंचायतीतच दबदबा राहिला असता.
यंदाही शरद पवार गटाला ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. शिंदेंकडे सातारा जिल्ह्यातील पक्षसंघटना बळकट करण्यासह आणि वाढविण्याचा चांगला अनुभव आहे. कोयना,कांदाटी आणि सोळशी खोऱ्यांसह सातारा शहरानजीकचा भाग,शहरी आणि ग्रामीण वस्तीचा संगम,जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यांतील डोंगर कपारीतील गावे त्यांनी पिंजून काढत गावोगावी प्रत्येक मतदारांपर्यंत राष्ट्रवादी पोहचवली आहेत.
प्रश्न: शशिकांत शिंदे कोण आहेत?
उत्तर: शिंदे हे माथाडी कामगार चळवळीतले अनुभवी नेते आणि साताऱ्याचे आमदार आहेत.
प्रश्न: शरद पवारांनी त्यांची निवड का केली?
उत्तर: त्यांच्या संघटनात्मक ताकदीमुळे आणि कामगारांतील प्रभावामुळे ही निवड झाली.
प्रश्न: शिंदे यांची नेमणूक कशासाठी महत्त्वाची आहे?
उत्तर: आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये पवार गटासाठी नेतृत्व व जनसंपर्क मजबूत करण्यासाठी.
प्रश्न: ही नियुक्ती साताऱ्याच्या राजकारणावर काय परिणाम करू शकते?
उत्तर: शिंदेंच्या नेतृत्वामुळे उदयनराजेंना थेट आव्हान दिलं जाऊ शकतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.