Dharashiv Political News : धाराशिव जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून दिले. मात्र, शिवसेनेने या जिल्ह्याची सातत्याने उपेक्षा केली. उमरगा-लोहारा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार ज्ञानराज चौगुले हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात दाखल झाले. तरीही ना त्यांना मंत्रिपद मिळाले, ना एखादे वैधानिक पद. उलट भूम-परंडा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आलेले, जिल्ह्याच्या बाहेरचे प्रा. तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रिपद, पालकमंत्रिपदही मिळाले. देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारमध्येही प्रा. सावंत मंत्री होते. (Latest Political News)
१९९५ मध्ये उमरगा, कळंब आणि भूम-परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे अनुक्रमे प्रा. रवींद्र गायकवाड, कल्पनाताई नरहिरे आणि ज्ञानेश्वर पाटील निवडून आले होते. त्यावेळी राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले. मात्र, या तिघांपैकी एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही. उलट सुरेश नवले (बीड) आणि अर्जुन खोतकर (जालना) यांना धाराशिवचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. त्यानंतर कल्पनाताई नरहिरे एकदा खासदार झाल्या. शिवसेनेचे शिवाजीबापू कांबळे दोनदा खासदार झाले होते. प्रा. रवींद्र गायकवाड यांनी पक्ष विस्तारात मोठी भूमिका बजावली होती. शेजारच्या लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांत पक्षवाढीत त्यांचा वाटा राहिला. (Maharashtra Political News)
ज्ञानेश्वर पाटील सलग दोनदा आमदार झाले, पण दुसऱ्यावेळी राज्यात शिवसेनेचे सरकार आले नाही. कल्पनाताई नरहिरे याही सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या. उमरगा मतदारसंघात प्रा. गायकवाड यांचा १९९९ मध्ये पराभव झाला आणि काँग्रेसचे बसवराज पाटील विजयी झाले. पहिल्यांदा आमदार झालेल्या बसवराज पाटील यांना काँग्रेसने मत्रिमंडळात स्थान दिले. यानंतर थेट २०१४ मध्येच राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. त्यावेळी जिल्ह्यातून ज्ञानराज चौगुले हे शिवसेनेचे एकमेव आमदार होते. ही त्यांची दुसरी टर्म होती, पण त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. पालकमंत्री बाहेरचे लादण्यात आले.
२०१९ मध्ये धाराशिव मतदारसंघातून कैलास पाटील आणि उमरग्यातून ज्ञानराज चौगुले विजयी झाले. शिवसेनेने भाजपसोबतचा घरोबा संपवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. या वेळी तरी चौगुले यांना मंत्रिपद मिळेल, असे वाटत होते. मात्र (Shivsena) शिवसेनेने पुन्हा त्यांना डावलले आणि प्रा. सावंत यांना मंत्रिपद दिले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये चौगुले यांचाही समावेश होता.
या सरकारमध्ये चौगुले यांना मंत्रिपद निश्चितपणे मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना डावलून पुन्हा प्रा. सावंत यांना संधी देण्यात आली. त्यांना पालकमंत्रिपदही बहाल करण्यात आले. २०१४ मध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून प्रा. रवींद्र गायकवाड विजयी झाले. त्यावेळी केंद्रातील सरकारमध्ये शिवसेना सहभागी होती. मात्र, प्रा. गायकवाड यांना काहीही मिळाले नाही. २०१९ मध्ये ओम राजेनिंबाळकर (Om RajeNimbalkar) धाराशिवचे खासदार झाले. त्यापूर्वी २००९ मध्ये राजेनिंबाळकर हे धाराशिव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.
शिवसेनेची सातत्याने झोळी भरूनही धाराशिव जिल्ह्याला फार काही मिळाले नाही. सातत्याने निराशा झाली. स्थानिक नेतृत्वाला डावलून बाहेरची माणसे बसवण्यात आली. उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंबरोबर जाऊनही आमदार चौगुले यांना वैधानिक पद मिळाले नाही. आता राजकीय परिस्थिती विचित्र झाली आहे. युती आणि आघाडीत तीन-तीन महत्त्वाचे पक्ष आहेत. दीर्घ कालावधीसाठी शिवसेनेला मंत्रिपद न मिळाल्याने पक्ष संघटना म्हणावी तितकी मजबूत झालेली नाही. त्या तुलनेत भाजपने चांगले पाय रोवले आहेत. काँग्रेसही चांगल्या स्थितीत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील बाहेर पडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी झाली आहे.
पालकमंत्री कधी येतात आणि कधी जातात, हे जिल्ह्यातील नागरिकांना कळत नाही. ते ठरावीक कायर्क्रमांना हजेरी लावतात. विद्यामानच नव्हे तर सर्वच पालकमंत्र्यांबाबत जिल्ह्याने असा अनुभव घेतला आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार होईल का, याबाबत साशंकताच आहे. झालाच तर सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी राहिलेल्या उमरगा-लोहारा मतदारसंघाला काही मिळेल का, याबाबतही साशंकताच आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.