Eknath Shinde, Uddhav Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray News: सत्ता,पदं उपभोगल्यानंतर ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांना धडा मिळालाच...!

अय्यूब कादरी

Shivsena 58th Anniversary : सत्तेच्या सर्व पदांचे लाभ घेऊन शिवसेना सोडणाऱ्यांचा उल्लेख नेते, शिवसैनिकांकडून गद्दार असा केला जातो. अशा गद्दारांना मग शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय सोडत नाही, असा इतिहास आहे. याला नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारखे दिग्गज नेतेही अपवाद राहिले नाहीत. असा धडा शिकवणारे शिवसैनिक निष्ठावंत, कट्टर होते. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर त्यांचे अतोनात प्रेम होते.

अगदी रस्त्यावरच्या तरुणांना उचलून बाळासाहेबांनी त्यांना राजकारणात आणले. आमदार, खासदार, मंत्री केले. शिवसेना नसती तर सामान्य कुटुंबातील तरुणांना राजकारणात इतक्या मोठ्या प्रमाणात संधी मिळाली नसती. सत्तेच्या पदांवर गेल्यानंतर, सत्ता उपभोगल्यानंतर नेत्यांमधील महत्वाकांक्षेला पंख फुटतात. शिवसेनाच नव्हे, सर्वच पक्षांच्या बाबतीत असे घडते. छगन भुजबळ यांनी राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरू केली.

1973 मध्ये शिवसेनेकडून ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले. पुढे 1984 पर्यंत ते महापालिकेचे विरोधी पक्षनेते राहिले. 1985 आणि 1991 असे दोनवेळा ते मुंबईचे महापौर झाले. त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी मतभेद झाल्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांच्यासोबत 13 आमदारही बाहेर पडले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकाचा अपवाद वगळता भुजबळ आणि अन्य आमदारांचा पराभव झाला होता.

1995 मध्ये राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली होती. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्याच टर्मच्या शेवटी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले होते. अंतर्गत मतभेदामुळे राणे यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये ते कॅबिनेटमंत्री बनले. 2007 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्यासोबत शिवसेनेतून 11 आमदार बाहेर पडले. त्यापैकी अद्यापही काहीजण राजकारणात टिकून आहेत. राणे यांनी नंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या टर्ममध्ये ते केंद्रीय मंत्री होते. आता त्यांना संधी मिळालेली नाही. कोकणच्या राजकारणावर राणे यांनी पकड कायम ठेवली असली तरी ते आणि त्यांच्या मुलांकडून विरौधकांवर मर्यादा सोडून केल्या जाणाऱ्या टीकेमुळे त्यांची नाचक्की होत आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, पण त्यांनी अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही. 2006 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. राज ठाकरे यांची भाषणशैली हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी आहे. त्यामुळे लोकांमध्ये त्याच्याबद्दल आकर्षण होते. केवळ भाषणाच्या जोरावर सभेसाठी गर्दी जमा करू शकणारे राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. त्यानंतर नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली. राज ठाकरे यांची मजल याच्यापुढे जाऊ शकली नाही. त्यानंतर त्यांचे एक किंवा दोन आमदार निवडून येत गेले. नाशिक महापालिकेतही नंतर त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांत वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला ओहोटी लागल्याचे चित्र आहे.

सुरुवातीला महाराष्ट्राच्या विकासावर बोलणारे राज ठाकरे आता हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाची भाषा सातत्याने बोलत आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीत यासाठी त्यांचा वापर करून घेतला. महाराष्ट्रातील नेत्यांवर डाफरणारे राज ठाकरे यांनी मध्यंतरी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष, उत्तर प्रदेशातील भाजपचे नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासमोर मात्र चुप्पी साधली होती.

उत्तर भारतीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अनेकवेळा मारहाण करण्यात आली आहे. त्याबद्दल उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला होता. राज ठाकरे हे ध्रुवीकरणाच्या खेळात अडकलेले असताना त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी राजकीय गरज ओळखून सर्वसमावेशक राजकारणाची वाट धरली आहे.

काळ पुढे सरकत गेला तसा शिवसेना आणि कार्यकर्त्यांमध्येही बदल होत गेला. एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांनी शिवसेना सोडली. छगन भुजबळ, नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर शिवसैनिक ज्याप्रमाणे आक्रमक झाले होते, तसे यावेळीही झाले. मात्र शिंदे यांच्यासोबत 40 आमदारही गेले होते. त्यामुळे निष्ठावंतांची संख्या कमी झाली का, असा प्रश्न निर्माण होत आहे. लोकसभा निवडणुकीत बाजू सावरून घेण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. आता विधानसभा निवडणुकीत काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT