Shivsena Foundation Day : शिवसेनेचे आमदार, खासदार 'स्वस्त' झाले अन् प्रस्थापितांचे बालेकिल्ले ढासळले!

Shivsena Anniversary : मराठवाड्यात काँग्रेसविरोधाची मोठी स्पेस होती. ती शिवसेनेने बळकावली. शिवसेनेचे आमदार कुठेही उपलब्ध व्हायचे, कारण मुळात ते सर्वसामान्यच होते.
Shivsena
Shivsena Sarkarnama

Shivsena 58th Anniversary : मुंबईत घट्ट पाय रोवल्यानंतर शिवसेनेने मराठवाड्याकडे मोर्चा वळवला. साधारण 1985 हे वर्ष असेल. त्यावेळी मराठवाड्यात काँग्रेसची चलती होती. विरोधी पक्ष नावालाच होते. विरोधी पक्षाला मोठी स्पेस होती, पण ती कोण घेणार असा प्रश्न होता. प्रस्थापित राजकारण्यांची मराठवाड्यावर पकड होती. शिवसेनेच्या आगमनामुळे ती सैल होत गेली.

मराठवाडा निझामाच्या राजवटीखाली होता. त्यामुळे नंतरही हिंदुत्वाच्या राजकारणाला स्पेस मिळत नव्हती. शिवसेनेच्या आगमनाने काँग्रेसला तगडा विरोधक निर्माण झाला.

काँग्रेसमधील पुढारी प्रस्थापित झाले होते. सरंजामी पद्धतीने त्यांचे राजकारण चालत असे. आपल्या एखाद्या कामासाठी आमदारासोबत मुंबईला जायचे असेल तर सर्व व्यवस्था ज्याचे काम आहे त्यालाच करावी लागायची.

आताचे आमदार आपल्याच गाडीतून लोकांना, कार्यकर्त्यांना घेऊन जातात. प्रस्थापित नेत्यांना भेटण्यासाठी लोकांना त्यांच्या घरांच्या ढेळजेत तासनतास प्रतीक्षा करावी लागायची. ठरावीक कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळायचा. व्यासपीठ उपलब्ध नसल्यामुळे काँग्रेसविरोधी कार्यकर्त्यांना हे सर्व सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

Shivsena
Shivsena Foundation Day 2024 : शिवसेना पक्षसंघटनेत शाखाप्रमुखच ताकदवान; नगरसेवक ते मंत्रिपदापर्यंत वाटचाल

मराठवाड्यात 8 जून 1985 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये (त्यावेळचे औरंगाबाद) शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली. प्रमोद नवलकर, विलास भानुशाली, मधुकर सरपोतदार आदी नेते मुंबईतून मराठवाड्यात वारंवार यायचे. प्रत्येक जिल्ह्यासाठी शिवसेनेने(Shivsena) संपर्कप्रमुख नेमले होते. या संपर्कप्रमुखांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने शिवसेनेचा विस्तार केला. तरुणांमध्ये शिवसेनेबाबत मोठे आकर्षण असण्याचा तो काळ होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा तरुणांवर मोठा पगडा होता. राजकारणात आपल्यालाही स्पेस मिळाली पाहिजे, ही तरुणांची इच्छा शिवसेनेमुळे पूर्णत्वाला गेली. प्रशासकीय यंत्रणेच्या समोर ब्र काढण्याचीही हिंमत नसलेल्या तरुणांच्या गळ्यात भगवा पाहिला की यंत्रणा हलू लागली. त्यामुळे शिवसेनेची क्रेझ वाढत गेली. ती इतकी वाढली की काळीपिवळी जीपमधून प्रवाशांची वाहतूक करणारे ज्ञानेश्वर पाटील (भूम-परंडा) यांच्यासारखे तरुण आमदार झाले.

प्रस्थापितांच्या राजकारणाला शिवसेनेमुळे मोठा धक्का बसला होता. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिवंगत नरसिंग जाधव (कळंब) यांच्यासारख्या नेत्यांनी धाराशिव जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांतही शिवसेनेचा विस्तार केला. शिवसेना नसती तर ज्ञानेश्वर पाटील, प्रा. रवींद्र गायकवाड यांना आमदार होण्याची संधी त्यांच्या हयातीत कधीच मिळाली नसती.

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होतकरू तरुणांची अशी फळी निर्माण झाली. प्रस्थापितांना बाजूला सारून शिवसेनेमुळे आपल्याला संधी मिळू शकते, हे लक्षात आल्यानंतर ही तरुणी पिढी झपाटून कामाला लागली आणि काही अपवाद वगळता प्रस्थापितांचे बालेकिल्ले ढासळले. सक्षम नेतृत्व न मिळाल्यामुळे लातूरसारख्या जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार होऊ शकला नाही.

Shivsena
Shiv Sena Foundation Day : शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा उजवे!

मराठवाडा निझाम राजवटीच्या अंमलाखाली होता. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांना राजकारणात फारसा वाव मिळाला नव्हता. स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे या भागात काँग्रेसचे(Congress) वर्चस्व राहिले. विरोधी पक्षांचे फारसे अस्तित्व नव्हते. शिवसेनेमुळे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांना व्यासपीठ मिळाले. शिवसेनेने हिंदुत्वाचे राजकारण केले असले तरी धाराशिवसारख्या जिल्ह्यात नेत्यांनी सामाजिक सलोखा कधीही बिघडू दिला नाही.

शिवसेनेच्या नेत्यांनी सर्व समाजांना सोबत घेऊन राजकारण केले. काही अपवाद वगळता मराठवाड्यात अशीच परिस्थिती होती. शिवसेनेचे बोट धरून नंतर भाजपने मराठवाड्यात हातपाय पसरले, मात्र धाराशिव जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्व विकसित होऊ शकले नाही. अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांवरच त्यांची भिस्त राहिली.

मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही मराठवाड्याने उद्धव ठाकरे यांनाच साथ दिली. मराठवाड्यातील आठपैकी उस्मानाबाद (धाराशिव), परभणी आणि हिंगोली मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विजयी झाले. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांचा उमेदवार विजयी झाला. जालना, लातूर आणि नांदेडला काँग्रेस तर बीडला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.

संकटकाळतही मराठवाड्याने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली नाही. आमदार, खासदार हे बाळासाहेबांमुळे स्वस्त झाले, हे त्याचे मुख्य कारण आहे. स्वस्त अशा अर्थाने की शिवसेनेचे आमदार, खासदार लोकांना कुठेही उपलब्ध होतात, लोकांच्या खांद्यावर होत ठेवून बोलतात.

त्यांच्या सुख,-दुःखात सहभागी होतात. त्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर सर्वात आधी त्यांनीच बोलायला, रस्त्यावर उतरायला सुरुवात केली होती. यामुळेच मराठवाड्यात शिवसेना रुजली, फोफावलीही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com