Uttam Jankar Politics : लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीच्या विरोधात पहिला डाव टाकला होता तो अकलूजमधून. भाजपमध्ये गेलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची घरवापसी करून पवार यांनी भाजपला धोबीपछाड दिली.
त्या डावपेचामुळे राज्यभरात महाविकास आघाडीच्या बाजूने सकारात्मक संदेश गेला होता. मोहिते पाटील यांच्यासह पवार यांनी त्यावेळी आणखी एक मोहरा गळाला लावला होता. ते म्हणजे उत्तम जानकर (Uttam Jankar).
मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक असलेले उत्तम जानकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. मोहिते पाटलांना सोबत घेत शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.
धैर्यशील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रणजतिसिंह निंबाळकर यांचा पराभव केला. निंबाळकरांचा पराभव भाजपसह फडणवीस यांच्यासाठीही मोठा धक्का होता. आता विधानसभेच्या निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर यांना उमेदवारी देऊन भाजपला आणखी एक धक्का देण्याची तयारी पवार यांनी केली आहे.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (VijaySinh Mohite Patil) यांच्या विरोधावरच जानकर यांचे राजकारण उभे राहिले. ग्रामपंचायत ते विधानसभा, लोकसभा आदी सर्व निवडणुकांत जानकर हे मोहिते पाटील यांच्या विरोधातच राहिले होते.
जानकर यांचा मोहिते पाटील कुटुंबीयांशी अनेकवेळा संघर्ष झाला. मात्र राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, ही उक्ती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.
मोहिते पाटील आणि जानकर यांच्यातील गेल्या 30 वर्षांपासूनचे राजकीय वैर अखेर संपुष्टात आले. जानकर सोबत आल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय सोपा झाला. आता त्याची परतफेड करण्याची वेळ मोहिते पाटील कुटुंबीयांवर आहे.
अकलूजच्या राजकारणात मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा भूतकाळ राजकीय संघर्षाचा आहे. 2003 मध्ये जानकर यांना रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याविरोधात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री होते. जानकर यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला होता.
मोहिते पाटील यांनीच हा अर्ज बाद करायला लावला, अशी चर्चा त्यावेळी झाली होती. प्रकरण न्यायालयात गेले. तेथेही जानकर यांच्या पदरी निराशा पडली होती. जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. मोहिते पाटील यांच्याविरोधातील संघर्षात धनगर समाज आणि समाजातील कार्यकर्ते उत्तम जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.
मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यामध्ये असे संघर्षाचे प्रसंग अनेकदा उद्भवले, मात्र जानकर यांनी शस्त्रे टाकली नव्हती. 2024 मध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात केला. त्यावेळी ते अजितदादा पवार यांच्यासोबत होते. देवेंद्र फडणवीस यांनी खास हेलिकॉप्टर पाठवून जानकर यांना बोलावून घेतले, त्यांना आमदार करण्याचा शब्द दिला होता.
मात्र, जानकर निर्णयावर ठाम राहिले. फडणवीस यांना भेटून परत येताच त्यांनी आपली भूमिका जाहीर केली होती. अनेकवर्षे ज्यांना विरोध केला, त्या मोहिते पाटील यांच्यासोबत गेल्यामुळे धनगर समाजात उत्तम जानकर यांच्याबाबतीत नाराजी असल्याची चर्चा आहे. ही नाराजी जानकर कशी दूर करतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
शरद पवार यांची साथ सोडून मोहिते पाटील 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले. त्यामुळे भाजपमध्ये असलेले उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत जानकर यांनी भाजपचे राम सातपुते यांना कडवी झुंज दिली होती. त्यांचा केवळ 2590 मतांनी पराभव झाला होता.
मोहिते पाटील घराणे विरोधात असतानाही उत्तम जानकर यांना 100917 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 5530 मते मिळाली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जानकर हे अजितदादा पवार यांच्यासोबत गेले होते. बदललेलल्या समीकरणांमुळे ते लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या पक्षात दाखल झाले.
माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. त्यांना शरद पवार पाठिंबा देणार, हेही जवळपास निश्चित झाले होते. मात्र, फडणवीस यांनी ऐनवेळी खेळी करून महादेव जानकर यांना परभणी मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी दिली.
जानकर परभणीतून त्यांच्या पक्षाच्या, म्हणजे रासपच्या चिन्हावरच लढले. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणी येथे जाहीर सभा घेतली, मात्र, त्यामुळे महादेव जानकर यांना विजय मिळू शकला नाही. तिकडे, माढा मतदारसंघात महादेव जानकर यांना पर्याय म्हणून शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडले होते.
उत्तम जानकर यांना सोबत घेणे माढा लोकसभा मतदारसंघात विजय सोपा करण्यासाठी क्रमप्राप्त होते. भाजपचे राम सातपुते हे माळशिरसचे आमदार आहेत. ते मोहिते पाटील यांच्यामुळेच विजयी झाले होते. सातपुते यांनी सोलापूरमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला.
विधानसभा निवडणुकीतही शरद पवार आणि मोहिते पाटील यांची उत्तम जानकर यांच्या माध्यमातून भाजपला मात देण्याची रणनिती आहे. सातुपते हे बीडचे आहेत. विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव करणार, असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला होता.
मोहिते पाटील- उत्तम जानकर एकेकाळचे कट्टर विरोधक एकत्र आले, मात्र यामुळे नाराज धनगर समाजातील काही कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचे आव्हान मोहिते पाटील आणि जानकर यांच्यासमोर आहे. निवडणूक जिंकायची असेल तर सर्व दगड उलटेपालटे करावे लागतात. किंचिंतही कसर राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
उत्तम जानकर यांच्या विजयासाठी मोहिते पाटील यांना अशा प्रकारचे सर्व प्रयत्न करावे लागणार आहेत. मोहिते पाटील यांना गरज होती त्यावेळी, म्हणजे लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकर त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्यभरातील धनगर समाजाचे लक्ष राहणार आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.