Sunil Tatkare Sarkarnama
विश्लेषण

तटकरेंच्या आक्रमक खेळी... रायगड टप्प्यात आणलं; पण ‘ज्ञानदेव पोवारांना’ फोडता आलेलं नाही!

ncp vs shiv sena Raigad Politic's News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये राजकीय वाद आता धुमसायला लागला आहे. याला हवा लागल्यास महायुतीलाच थेट जाण्याची शक्यता आहे.

Aslam Shanedivan

Summary :

  1. सुनील तटकरे यांनी रायगडमध्ये पक्षप्रवेश घडवून आणत शिवसेना विरोधकांना एकत्र केले आहेत.

  2. अनिकेत आणि आदिती तटकरे यांच्या विरोधकांची ताकद कमी करण्यात यश मिळाले आहे.

  3. मात्र दक्षिण रायगडमधील ज्ञानदेव पोवार यांना राष्ट्रवादीत आणण्यात अपयश आले आहे.

Raigad News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे रायगड जिल्ह्यात प्रचंड आक्रमक राजकारण खेळताना दिसत आहेत. मंत्री भरत गोगावले आणि शिवसेनेला घेरताना सुधाकर घारे, स्नेहल जगताप, राजीव साबळे असे पक्षप्रवेश घडवून आणले आहेत. माजी आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधातील प्रतिस्पर्धीच कमी केले. शिवाय गोगावलेंसह कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक असणाऱ्या नेत्यांना ताकद देत पक्षात महत्वाच्या पदावर स्थान दिले आहे. तटकरे यांच्या या राजकारणामुळे रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना अशा शीतयुद्धाच्या दुसऱ्या अंकाला सुरूवात झाली आहे. पण त्यांना अद्यापही दक्षिण रायगडमधील वजनदार नेते ज्ञानदेव पोवार यांना फोडता आलेलं नाही. मध्यंतरी ते राष्ट्रवादीत जातील अशी जोरदार चर्चा होती. पण तटकरे यांना 'पोवार कार्ड' काही खेळता आलेले नाही. (Sunil Tatkare strengthens NCP in Raigad ahead of local elections but fails to bring Gnyandev Powar into the party)

आदिती तटकरे - अनिकेत तटकरे सेफ :

यापूर्वी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश तटकरे यांनी घडवून आणला. त्यांची महाड मतदारसंघात मोठी ताकद असून ते कट्टर गोगावले विरोधक मानले जातात. यातून गोगावले यांना मतदारसंघातच तुल्यबळ प्रतिस्पर्धी उभा केला. आता शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांनाही तटकरे यांनी राष्ट्रवादी आणले आहे. त्यातून त्यांनी माजी आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधातील प्रतिस्पर्धीच कमी केला आहे. आपल्या दोन्ही मुलांच्या भविष्यातील आमदारकी तटकरे यांनी सेफ केली आहे.

साबळेंचा प्रभाव असलेल्या माणगावसह लोणेरे, निजामपूर, गोरेगाव, मोर्वा आणि इंदापूर हे जिल्हा परिषद गट श्रीवर्धन मतदारसंघात येतात. त्यामुळे आदिती तटकरे यांचा मतदारसंघ मजबूत झाला आहे. दुसऱ्या बाजूला 2018 मधील पराभवानंतपर विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात साबळे पुन्हा अॅक्टिव्ह झाले होते. त्यामुळे इथले माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे टेन्शन वाढले होते. पण साबळेंना पक्षाकडून पाठिंबा मिळत नव्हता. त्यामुळे ते नाराज होते. हीच नाराजी तटकरे यांनी हेरली.

गोगावले-थोरवेंविरोधात फिल्डिंग :

गत आठवड्यात तटकरे यांनी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल केले. सुधाकर घारे यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. घारे यांनाही काही दिवसांपूर्वीच तटकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले आहे. तर गोगावले यांचे कट्टर विरोधक महाडच्या हनुमंत जगताप यांच्याकडे प्रदेश सरचिटणिस पदाची जबाबदारी देत त्यांना ताकद देण्याचे काम केलं आहे.

घारे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून त्यांनी कर्जत मतदारसंघातून मागील विधानसभा शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना मागच्या दाराने तटकरे यांनी रसद पुरवल्याचे आजही बोलले जाते. पण त्यानंतरही घारे यांचा फक्त 5 हजार मतांनी पराभव झाला होता. आता थोरवे यांना खिंडीत रोखण्यासाठी तटकरेंनी त्यांच्याच कट्टर विरोधकाच्या हाती जिल्ह्याची सुत्रे सोपवली आहेत.

तसेच हनुमंत जगताप हे महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांचे ते सख्खे भाऊ असून ते महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचे सख्खे काका देखील आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर स्नेहल जगताप आणि हनुमंत जगताप यांनी शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम केला होता. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत अनेकांना धक्का दिला होता.

कोण आहेत ज्ञानदेव पोवार?

ज्ञानदेव पोवार हे माजी सभापती, माणगाव नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 16 (खांदाड) चे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांची ओखळ “ग्रामीण भागाचा शिल्पकार” अशी आहे. रायगडमध्ये काँग्रेसला मोठे करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. संपूर्ण कोकणात काँग्रेसकडून नगराध्यक्ष होणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून इतिहास घडवला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी काँग्रेसला बाजूला करत शिवसेनेत प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या माणगाव नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवणाऱ्या आघाडीचे नेतृत्व केले होते. सुनील तटकरेंविरोधात त्यांच्याच होमग्राऊंडवर राजकीय संघर्ष निर्माण केला होता. त्यामुळे पोवार यांना ‘तटकरेविरोधी’ म्हणून ओखळले जात होते. राष्ट्रवादी पक्षप्रवेशाच्या या लाटेत ते पोवार यांनाही फोडणार अशी चर्चा सुरु होती. पण तटकरेंना हे ऑपरेशन यशस्वी करता आलेलं नाही. पण पिक्चर अभी बाकी है... त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

FAQs :

प्र.१: सुनील तटकरे यांनी कोणत्या नेत्यांना पक्षात घेतले?
उ: सुधाकर घारे, स्नेहल जगताप, राजीव साबळे यांसारखे नेते पक्षात आले आहेत.

प्र.२: पोवार कार्ड म्हणजे काय?
उ: दक्षिण रायगडमधील वजनदार नेते ज्ञानदेव पोवार यांना राष्ट्रवादीत आणण्याचा प्रयत्न म्हणजे 'पोवार कार्ड'.

प्र.३: तटकरे यांचा हा डाव का महत्वाचा आहे?
उ: स्थानिक निवडणुकांपूर्वी शिवसेनेला कमजोर करण्यासाठी ही रणनीती महत्वाची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT