Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू लवकरच राजकीय दृष्टया एकत्र येणार का याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर आगामी काळात लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांची उत्सुकता ताणली गेली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसापासून उद्धव ठाकरेंनी सामानाला दिलेल्या मुलाखतीतून सर्वसामान्य नागरिकांना पडलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे भविष्यात जर मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली तर महाविकास आघाडीचे काय होणार? याबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्टच केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शीत झाला. यामध्ये उद्धव ठाकरेंनी यांनी विविध विषयावर भाष्य केले आहे. त्याच वेळी त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. त्याचे उत्तर देखील दिले आहे.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील काय? दोघांची राजकीय युती होईल काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे काय? त्यांच्या पोटदुख्या त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. मी तर स्पष्टच सांगतो की, अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करतायत. गुजराती आणि हिंदी वगैरे इतर भाषिकसुद्धा म्हणाले, 'अच्छा किया आपने', त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यासोबतच येत्या काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना व मनसे (MNS) एकत्र येणार असतील तर मविआचे काय होणार? असा सवाल त्यांनी विचारला होता त्यावर मी मुंबई महाराष्ट्रापासून राजकीयदृष्ट्याही कदापिसुद्धा वेगळी समजत नाही. कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचा वेगळा आणि महाराष्ट्राचा वेगळा विचार करून चालणार नाही. राज्य म्हणून प्रत्येक महापालिकेची स्वायत्तता आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी जसे शिवसेनेचं युनिट आहे तसं इतर पक्षांचंही आहे. त्यांना राजकीयदृष्ट्या जे योग्य वाटत असेल तसेच करू. लढायचं तर नक्कीच आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल असे सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
त्या सोबतच येत्या काळात मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे-जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे. याबाबत राज ठाकरेंसोबत चर्चाही होईल. पण त्याआधी आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय, हे खूप मोठे आहे. म्हणून मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटले की, आज आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.