Narendra Modi, Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray News : भाजपच्या भळभळत्या जखमेवर उद्धव ठाकरेंनी पुन्हा मीठ चोळले

Shivsena UBT Vs BJP : नाशिकच्या अधिवेशनात डागली तोफ, 50 खोक्यांचा मुद्दा पुन्हा गाजवणार, शामाप्रसाद मुखर्जींचा उल्लेख करीत भाजपची न फुटणारी कोंडी केली...

अय्यूब कादरी

Shivsena Political News : कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा न करताही जिव्हारी लागणारी टीका करता येऊ शकते, हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील अधिवेशनात दाखवून दिले. भाजपला कसे उघडे पाडता येते, हे किरीट सोमय्या यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करीत त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता, यांसह शामाप्रसाद मुखर्जी आणि चले जाव चळवळीचा उल्लेख करीत त्यांनी भाजपच्या भळभळणाऱ्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळले. आगामी निवडणुकांमध्ये 50 खोक्यांचा प्रचार जोरात होईल, याचे संकेतही दिले. भाषणादरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी शब्दांची पेरणी करून कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता, माझे हिंदूत्व शेंडी-जानव्याचे नाही तर सर्वसमावेशक आहे, अन्य धर्मांचा द्वेष करणे म्हणजे हिंदूत्व नाही, असे उद्धव ठाकरे यापूर्वी अनेकदा बोलले आहेत. या माध्यमातून त्यांनी भाजपची कोंडी केली होती. ती कोंडी फोडणे शक्य नव्हते, म्हणून भाजपने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनाच फोडली.

त्यानंतर उद्धव ठाकरे आपली भूमिका बदलतील किंवा खचून जातील, असा भाजपचा कयास असावा. मात्र तसे काही झालेले नाही, असे उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या अधिवेशनातून दाखवून दिले आहे. भाजपसोबतच त्यांनी फुटीरांनाही गंभीर इशारा देत आगामी निवडणुकांच्या प्रचारात 50 खोके एकदम ओके या घराघरांत पोहोचलेल्या घोषणेचा वापर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काँग्रेससोबत जाऊनही आपण हिंदूत्व सोडलेले नाही, हे ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. हे करताना त्यांनी भाजपच्या मुळावरच घाव घातला आहे. जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांच्या विरोधात चले जाव चळवळ सुरू केली होती. या चळवळीत जनसंघाचा सहभाग तर नव्हताच, उलट शामाप्रसाद मुखर्जी यांनी गव्हर्नरला पत्र लिहून चले जाव चळवळ कशी चिरडता येईल, हे सांगितले होते, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुरते घेरले आहे.

बाबरी पाडण्यात शिवसेनेचे योगदान काय, हे विचारणारे आता हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय, असे विचारत असल्याचे सांगत भाजपला त्यांच्याच मैदानावर घेरले आहे. भाजपमध्ये (BJP) आज भ्रष्टाचाऱ्यांना मान आहे, पण शंकराचार्यांना मान नाही, असे म्हणत ठाकरे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. याद्वारे त्यांनी अजित पवारांवर तर निशाणा साधलाच, शिवाय आयात नेत्यांमुळे नाराज असलेल्या भाजपच्या पारंपरिक मतदारांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल नुकताच लागला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना हा निकाल देणारे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याविरोधात रान पेटवले आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबईत जनता न्यायालय आयोजित करून त्या निकालाची चिरफाड केली. त्यानंतर नार्वेकर यांनी समोर येऊन याबाबत आपली बाजू मांडली होती, त्यावेळीच हे लक्षात आले होते, की ठाकरे यांचा तो बाण भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि नार्वेकरांच्या जिव्हारी लागला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता त्यांनी पुण्यातही असे न्यायालय आयोजित करणार असल्याची घोषणा केली आहे. नाशिकच्या अधिवेशनातही ठाकरे यांनी नार्वेकरांवर शेलक्या शब्दांत टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचाही त्यांनी समाचार घेत या सर्वांचा राजकीय वध करणार असल्याची गर्जना केली आहे.

...म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट!

शिवसेना फुटल्यानंतर त्याचा आपल्याला फायदा होईल, असे भाजपला वाटले असेल. पण तशी चिन्हे दिसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पाडण्यात आली. अजित पवार आमदारांसह सरकारमध्ये सहभागी झाले. त्याच्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील 72 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख एका जाहीर सभेत केला होता. एवढे सर्व घडवून आणल्यानंतरही ईडीने शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते, आमदारांविरुद्ध चौकशीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचीही एसीबीने अनेक वेळा चौकशी केली आहे. काहीही झाले तरी आता घाबरणार नाही, असा संदेश ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपलाही दिला आहे.

कोरोनाच्या काळात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या कारणावरून आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी सुरू आहे. यावरून ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपशासित राज्यांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर उपचार केल्याचे दाखवून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला. कॅगने याचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांवरही त्यांनी कटाक्ष टाकला. भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात एखादी बातमी सुरू झाली की वरून आदेश येतात आणि ती बातमी थांबवली जाते, असे त्यांनी सांगितले. सामान्य लोकांच्या मनात हा जो समज किंवा गैरसमज आहे, त्याला ठाकरे यांनी याद्वारे बळकटी दिली आहे.

भाजपला इशारा...

आता थांबणार नाही, असा निर्धार या अधिवेशनातून ठाकरे यांनी केला आहे. त्यांची देहबोली आक्रमक आणि निश्चयी वाटत होती. 30 वर्षे भाजपसोबत राहून आम्ही त्यांच्यासारखे झालो नाही, तर काँग्रेससोबतच राहून त्यांच्यासारखे कसे होणार, असे सांगत ठाकरे यांनी हिंदूत्व सोडले या त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला निकाली काढले आहे.

शामाप्रसाद मुखर्जी, मुस्लिम लीग आणि चले जाव चळवळीचा उल्लेख करीत त्यांनी भाजपला इशारा दिला आहे. त्यामुळे ठाकरे यांनी काँग्रेसच्या नादी लागून हिंदूत्व सोडले, असे म्हणण्यापूर्वी भाजप आणि शिंदे गटाला यापुढे विचार करावा लागणार आहे. उद्धव ठाकरे असेच फिरत राहिले, असेच आक्रमक बोलत राहिले तर महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT