Uddhav Thackeray, Devendra Fadanvis & Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray: ठाकरेंचा जनता न्यायालयाचा डाव 'महाशक्ती'च्या जिव्हारी; तपास यंत्रणा 'अ‍ॅक्टिव्ह'

Sachin Waghmare

Mumbai News : शिवसेनेत उभी फूट पाडत एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले अन मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमध्ये सहभागी झाला. यामागे ईडीच असल्याचे आरोपही त्यावेळी झाले होते. पक्ष फोडण्यासाठी, सरकारे पाडण्यासाठी ईडीचा वापर केल्याचे आरोप आजही होतात. मात्र, या वर्षभरापूर्वीच्या या सर्व घटनाक्रमाची आठवण करून देण्याचे कारणही तसेच आहे.

यानंतर शिवसेनेतून एकनाथ शिंदेसोबत ४० आमदार सुरुवातीला गेले. त्यानंतर १३ खासदार गेले. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण व पक्षही दिला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदार पात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्यास सांगितला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटाचे सर्व आमदार पात्र या निर्णयाने कोणाचेच समाधान झाले नाही. त्यानंतर शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा कोर्टात गेले. उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय कसा चुकीचा आहे,हे थेट जनतेच्या न्यायालय घेऊन दाखवून दिले.त्याची जोरदार राजकीय चर्चा झाल्याचे लक्षात येताच आता 'महाशक्ती'कडून ठाकरे सेनेला धक्का देताना केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर पुन्हा ठाकरे सेना आहे. युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना झालेली अटक व आमदार राजन साळवी यांच्यावर ईडीकडून केलेल्या कारवाईनंतर पुन्हा जाणवत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

आगामी काळात ठाकरे सेनेने भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे मनापासून ठरवल्याचे दिसत आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली असली तरी त्या ठिकाणी त्यांना न्याय कधी मिळणार याची वाट न पाहता उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या दरबारात जाणे पसंत केले आहे.भाजपला शिंगावर घेत ते ठाकरे स्टाइलने तुटून पडले आहेत.कुठल्याही कारवाईची तमा ना बाळगता येत्या काळात भाजपविरोधात दंड थोपटल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे शिवसेनेच्या आक्रमकतेची धार कमी करण्याच्या उद्देशाने माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय व युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी झालेली अटक व आमदार राजन साळवी यांच्यावर ईडीकडून केलेल्या कारवाईमुळे अडचणीत आणले असले तरी येत्या काळात ठाकरे गटाला आणखी सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

आमदार राजन साळवी यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापेमारी केल्यानंतर साडे तीन कोटींची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस ताब्यातही घेऊ शकतात. त्यामुळे ठाकरे गटासाठी यापुढचा मार्ग हा खडतर असणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडांनंतर ठाकरेंना सहानभूती मिळू नये म्हणून राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली आहे. त्यामधून भाजपने मतदार महायुतीकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा ठाकरे गट जनतेच्या न्यायालयात गेला आहे.जनता न्यायालयाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे (Uddhv Thackrey ) सहानभूती आपल्या बाजूने वळवत आहेत.सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट न पाहता उद्धव ठाकरे येत्या काळात गावोगावी जाऊन या निर्णयाविरोधात रान पेटविणार आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही लाभत आहे.

जनता न्यायालयासाठी त्यांनी मोठी फळी रिंगणात उतरवली आहे. विशेषतः अनिल परब,असीम सरोदे व राहुल शर्मांसारखे वकील त्यांची कायदेशीर बाजू जनतेसमोर मांडत आहेत. त्याचा मोठा फायदा होईल असे त्यांना वाटत आहे. येत्या काळात कोण खरे, कोण खोटे याचा निकाल जनताच करणार आहे. त्यामुळे त्यासाठी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीची वाट सर्वांना पाहावी लागणार आहे.

भाजप नेत्यांची वेगवेगळी मते

जनता न्यायालयानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून भाजप नेत्यांची वेगवेगळी मते असली तरी निकाल देणारा न्यायाधीश कधीच निकाल समजावून सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेत नसतो. उलट एखाद्या संघटनेतील नेत्यांनी पत्रकार परिषद घेण्याची गरज होती,अशी चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या नेत्यांवर केली पूर्वीच कारवाई

शिवसेनेतील फुटीनंतर अनेक हादरे बसले. केंद्रीय तपास यंत्रणेकडून राज्यातील तब्बल 21 नेत्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये ठाकरे गटाच्या १२ जणांचा समावेश आहे.ईडीने प्रताप सरनाईक यांच्यवर ‘टॉप्स सेक्युरिटी ग्रुप’शी संबंधित कारवाई केली होती.त्यानंतर ईडीच्या भीतीनेच प्रताप सरनाईक हे शिंदे गटासोबत गेले अशी चर्चा जोरात आहे.त्यानंतर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले होते.त्यानंतर कारवाईने वैतागलेल्या खोतकर यांनी ठाकरे गट सोडताना डोळ्यात पाणी आणले होते.मात्र,ते शिंदे गटासोबत गेल्याने चौकशी थांबली.

खासदार संजय राऊत यांची ईडीने चौकशी केली.त्यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.याशिवाय ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी झाली.माजी मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट खरेदीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप आहे.त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.

शिंदेसोबत गेलेल्यांची कारवाई टळली

दीड वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकारपाडून काही जण एकनाथ शिंदे (Ekanath shinde ) यांच्यासोबत गेले. त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने अनेक खासदार व आमदारांवर ईडीची चौकशी पुढे झाली नाही. त्यामध्ये प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, यशवंत जाधव, यामिनी जाधव अशा अनेक नेत्यांवर आता ईडीकडून कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील काही मंडळींना नोटीस प्राप्त होताच गुपचुप भाजपची वाट धरल्याची चर्चा आहे.

SCROLL FOR NEXT