Dharavi Redevelopment Project Sarkarnama
विश्लेषण

Dharavi Redevelopment Project : अदानीला भस्म्या रोग झालाय का? गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही असे होऊ नये एवढीच अपेक्षा

सरकारनामा ब्यूरो

अ‍ॅड. हर्षल प्रधान

Dharavi Redevelopment Project : धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे घर मिळाले पाहिजे. ते घरही धारावीतच मिळाले पाहिजे. प्रत्येकाला 500 फुटांचे घर त्याच ठिकाणी मिळाले नाही, तर अदानी यांचा प्रकल्प मुंबईत होऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि पुन्हा एकदा अदानी आणि धारावी पुनर्वसन हा मुद्दा चर्चेत आला.

धारावी पुनर्वसन प्रकल्पानिमित्ताने फुटीर सेना आणि दगाबाज राष्ट्रवादी पक्षाचे नेते शिंदे आणि अजीत पवार भाजपा सोबत सत्तेत असल्याचा गैरफायदा घेऊन मोदींच्या परममित्रवर सवलतीची खैरात करत आहेत. आधीच कर्जबाजारी असणारे महाराष्ट्र राज्य या शिंदे फडणवीस सरकारमुळे आणखी अडचणीत येऊन गाढव गेले आणि ब्राह्मचर्यही अशा अवस्थेपर्यंत येऊ नये एवढीच अपेक्षा...

एक ब्रह्मचारी गाढव झोंबता| हांनोनिया लाता पळाले ते||

गाढव ही गेले | ब्रह्मचर्य गेले ||

तोंड काळे झाले जगामाजी| हे ना तैसे झाले ||

तुका म्हणे गेले वायाची ते ||

तुकाराम महाराजांच्या गाथेतील हा एक अभंग आहे. एखाद्या मोहात अडकून माणूस आपले अस्तित्व समाजात कसे हरवून बसतो अशा आशयाची ही ओवी आहे आणि यात मतितार्थ अनेक आहेत. विनाकारण एखाद्याला आपल्या आवाक्या बाहेर जाऊन काही द्यायला जाऊ नये नाहीतर आपल्याकडील असले नसलेले सगळे गमावते आणि जगामध्ये आपलेच हसे होते.

त्यामुळे गाढव ही गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले, हातात काहीच राहत नाही असे म्हणतात. थोडक्यात माणसाचे पाय मातीचे असतात असे तुकोबांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. सध्या अदानीवर राज्य सरकारची चाललेली खैरात पाहता महाराष्ट्रावर अशी वेळ येऊ नये एवढेच सांगण्याची वेळ आली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे एकूण क्षेत्र आहे, 550 एकर जमिनीचे आणि या प्रकल्पाकरिता अदानीची धारावी बाहेरील खालीलप्रमाणे जमीन मागणी आहे.

१. रेल्वे : 45 एकर

२. मुलुंड जकात नाका: 18 एकर

३. मुलुंड कचरापट्टी: (DUMPING GROUND) 46 एकर

४. मिठागरे: 283 एकर

५. मानखुर्द कचरापट्टी: (DUMPING GROUND) 823 एकर

६. G ब्लॉक BKC: 17 एकर

७. मदर डेअरी कुर्ला: 21 एकर

एकूण: 1253 एकर

अदानीला झालेला हा भस्म्या रोगाची भूक भागवण्याचे काम शिंदे-फडणवीस-पवारांचे महायुतीचे सरकार बिनदिक्कत करीत असून, रोज नवनवीन आदेश काढून अदानीवर सवलतीची लयलूट करीत आहे. जी जमीन सरकारची, ती जमीन अदानीची हे सरकारचे धोरण झाले आहे.

त्यामुळे आतातरी मुंबईकरांनी आवाज उठवा. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे आडून अदानी अख्खी मुंबईच गिळंकृत करायला पाहतोय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ShivsenaUBT) पक्ष हे अजिबात होऊ देणार नाही . मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे आणि तो या चंद्र दिवाकरो कायम राहणार

महाराष्ट्र सरकारवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. त्यांनी लाडकी बहीण योजनेवर उपाहासात्मक टीका करून आता ‘लाडका कॉन्ट्रक्टर’ ही योजना सरकारने आणली आहे. असे म्हणत सरकारच्या आंधळ्या वृत्तीवर आणि अदानीच्या भस्म्या रोगावर बोट ठेवले.

मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी-शाहांचा डाव आहे. परंतु हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला . मोदी शहा यांनी मोदींची गिफ्ट सिटी पळवून नेली आहे. ते उद्या मुंबईचे नाव गिफ्ट सिटू करु शकतात. मोदी-शाह यांनी मुंबईचा इतिहास विसरु नये.

बेसुमार टीडीआर काढून अदानी यांना देण्याचा डाव हे सरकार खेळत आहे त्यामुळे संपूर्ण मुंबईच्या पुनर्वसन प्रकल्पांवर अदानी कंपनीचे वर्चस्व राहणार आहे आणि ते मुंबईकर कधीच सहन करणार नाही आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ते यशस्वी होऊ देणार नाही.

मुंबईतील सर्व टीडीआर अदानी यांना घेऊ देणार नाही. उद्या ते मुंबईचं नाव बदलून अदानी सिटी असेही करतील. मुंबईची तिजोरी खाली करण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे टेंडरमध्ये नसलेल्या गोष्टी ते अदानी यांना देऊ करत आहे. टेंडरमध्ये उल्लेख नसलेला टीडीआर ते देत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या विविध घोषणा आहे.

धारावी 550 एकरची आहे. पात्र, अपात्रच्या निकष लावून धारावी रिकामी कारायची आहे. मुंबईतील नागरी संतुलन बिघडण्याचा हा डाव आहे. काही जणांच्या मानसिकतेला बुरशी आली आहे. कुर्लाची मदर डेअर, दहिसरचा टोल नका, मुंबईतील मिठाग्रहासह 20 जागा घेण्याचा प्रयत्न अदानी करत आहे.

अनेक ठिकाणी ही माहिती उपलब्धही नाही, असे दिसत आहे. मुंबईतील इतर प्रकल्पांना हात कशासाठी लावला जातोय. नेमके अदानीच्या आडून मोदी शाह यांना करायचे काय आहे . मुंबईवर (Mumbai) मराठी माणसाचा अधिकार आहे आणि तो या चंद्र दिवाकरो कायम राहणार आहे हे मोदी- शाह यांनी कायम लक्षात ठेवायला हवे.

मुंबईचे सगळे प्रकल्प अदानीला का ?

अदानी रियल्टीने वांद्रे रिक्लेमेशन लँड पार्सलचा पुनर्विकास करण्यासाठी निविदा जिंकली. अदानीला महावितरणची यंत्रणा दिली गेली. अदानीला मुंबईच्या विमानतळाचे सर्व अधिकार दिले गेले.

अदानीला धारावी पुनर्वसन प्रकल्पही दिला अशा एकाहून एक महत्वाच्या प्रकल्पांना केवळ अदानीच्याच पदरात टाकले जात आहे, असे का याचा कोणी विचार करत नाही. अदानी रियल्टीने वांद्रे रिक्लेमेशन लँड पार्सलचा पुनर्विकास करण्यासाठी 30,000 कोटी रुपयांची बोली लावून हे कंत्राट जिंकले आहे.

महसूल वाटणी मॉडेलवर आधारित हा करार आहे. अदानी समूहाच्या कंपनीने 22.79% महसूल देऊ करून हा करार जिंकला. मात्र, त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एमएसआरडीसी) मंजुरी मिळणे बाकी आहे. त्याच्या अंतिम मंजुरीबाबत एमएसआरडीसीच्या पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल.

बोर्डाच्या मान्यतेनंतर, अदानी रियल्टी MSRDC ला या प्रकल्पासाठी निधी, परवानगी आणि मंजुरी आणण्यासाठी बेंचमार्क रक्कम म्हणून ₹ 8,000 कोटी प्रदान करेल. हे क्षेत्र सुमारे 45 लाख स्क्वेअर फूट पसरले आहे.

कंपनी त्याचा वापर व्यावसायिक किंवा निवासी मालमत्ता म्हणून करू शकते. एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि एमडी अनिल कुमार गायकवाड यांच्या मते, या करारासाठी 18 कंपन्यांनी बोली लावली होती.

यामध्ये अदानी रियल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज, जेएसडब्ल्यू, के रहेजा कॉर्प, एल अँड टी रियल्टी यांचा समावेश आहे. लार्सन अँड टुब्रोने या करारासाठी 18% महसूल सामायिक करण्यासाठी बोली लावली होती. L&T ची एकूण संपत्ती 84,000 कोटी रुपये आहे. तर अदानी रियल्टीची एकूण संपत्ती 48,000 कोटी रुपये आहे. तरीही हा प्रकल्प अदानी यांच्या पारड्यात टाकण्यात आला आहे.

मुंबईतील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचाही पुनर्विकास अदानी समूहाची कंपनी 'अदानी प्रॉपर्टीज' करत आहे. 29 नोव्हेंबर 2022 रोजी, अदानी प्रॉपर्टीजने झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याच्या प्रकल्पाची बोली जिंकली. कंपनीने यासाठी 5,069 कोटी रुपयांची बोली लावली होती.

अदानी समूहाची कंपनी धारावीत सर्वेक्षण करून 2000 पूर्वी इथे राहणाऱ्या लोकांना मोफत घरे देणार आहे . 10 लाख लोक झोपडपट्टीत राहतात मात्र त्या सगळ्यांना अदानी जागा खरंच देणार का आणि असेल तर त्यांची जागा नेमकी किती याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत .

मुंबईतील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये पुनर्विकासाअंतर्गत लोकांना फ्लॅट देण्यासाठी अदानी ग्रुप कंपनी डेटा आणि बायोमेट्रिक्स गोळा करत आहेत . यामध्ये सुमारे 10 लाख लोकांचा तपशील गोळा केला जाणार आहे.

मात्र धारावीत त्यापेक्षाही अधिक लोक राहतात आणि प्रत्येकाच्या जागा वेगवेगळ्या आहेत . त्यांना न्याय कसा मिळणार याबाबत अनेक प्रश्न आहेत . याबाबतची स्पष्टता होणे गरजेचे आहे इतकंच नव्हे तर याबदल्यात अदानीला झालेल्या भस्माचा रोग आवरण्याची आवश्यकता आहे अन्यथा महाराष्ट्र सरकारला कायम पश्चाताप करण्याची वेळ येईल.

अ‍ॅड हर्षल प्रधान

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत .)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT