Mumbai News : राज्याच्या राजकारणात गेल्या तीन वर्षांपासून अनेक मोठे भूकंप पाहवयास मिळाले. सुरुवातीला एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजितदादाने महायुती सरकारसोबत जुळवून घेत उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. तर काँग्रेसमधील अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्ग्ज नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला.
गेल्या तीन वर्षांतील या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली असतानाच आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारण गेल्या 15 दिवसापासून नव्या वळणावर आले आहे. एका मुलाखतीप्रसंगी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याचे संकेत दिल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी तासाभरातच तयारी दर्शवल्याने ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता दोन्ही पक्षातील वादाचे मुद्दे सोडले तर पुन्हा नव्याने एकत्र येण्यावर चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे (Raj thackeray) विदेश दौऱ्यावरून परतले आहेत तर उद्धव ठाकरे ४ मे ला मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. विदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वीच राज ठाकरे यांनी मनसेतील नेत्यांना शिवसेनेसोबतच्या युतीच्या चर्चेवर भाष्य करू नका, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे यावर कोणीच काही बोलले नाही. त्यामुळे या युतीवर चर्चा करण्याचे संपूर्ण अधिकार दोन्ही भावाकडे असणार हे त्यामधून सिद्ध झाले आहे.
दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपल्या मित्रपक्षांना दूर ठेवावे हा पहिला निकष असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला दूर ठेवणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी चर्चा सुरु होण्यापूर्वीच भाजप, शिंदे गटाला दूर ठेवण्याची मागणी मनसेकडे केली होती. त्यामुळे आता येत्या काळात हे दोन पक्ष एकत्र येण्यासाठी कोणत्या अटी व शर्थी एकमेकांना घालणार याची चर्चा रंगली आहे.
ठाकरे बंधू एकत्र येत असताना त्यावर अनेक नेतेमंडळीनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर चांगेलच आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या दोन भावाच्या युतीला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे मात्र महायुतीमधील नेत्यांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेत सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ठाकरे बंधू आगामी काळात एकत्र आले तर दुसरे महाविकास आघाडीचे काय होणार हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. काही जणांना वाटते की येत्या काळात शिवसेना, मनसे जर एकत्र आली तर दोन्ही पक्ष महाविकास आघाडीसोबत येतील, असे काही जणांना वाटते. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, याबाबतचा निर्णय मनसे व शिवेसना घेणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या प्रतिक्रिया पाहता येत्या काळात मनसे आघाडीसोबत येईल अशाच प्रतिक्रिया या नेतेमंडळींच्या होत्या.
त्यातच गेल्या दोन दिवसापासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया पहिल्या तर ते महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे जाणवत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून देशातील वातावरण तापलेले असताना त्यांनी शरद पवार यांच्या विरोधातील भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा का मागितला नाही, असा थेट सवाल करीत पवार यांना अडचणीत आणले आहे. त्यामुळे आता राऊतांच्या या विधानामुळे राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार? का असा सवाल उपस्थित होत आहे.
येत्या काळात पुन्हा एकदा राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष दोन भाऊ एकत्र येण्यासाठी कोणत्या अटी व शर्थी घालणार याकडे लागले आहे. राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरेंच्या डोक्यात वेगळीच गणित शिजत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसच्या पोटात गोळाच आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.