Ulhasnagar Municipal Corporation corporators during the Guwahati tour. sarkarnama
विश्लेषण

Ulhasnagar News : महासभेत आक्षेपार्ह वक्तव्य, खुर्चीवर कब्जा अन् हाणामारी; ६५ लाखांचा गुवाहाटी अभ्यास दौरा ठरला निष्फळ!

Ulhasnagar Corporators : नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे धडे देण्यासाठी गुवाहाटीत आयोजित करण्यात आलेल्या ६५ लाखांच्या प्रशिक्षण दौरा वाया गेल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

नवनीत बऱ्हाटे

Ulhasnagar News : सभागृहातील शिस्त, प्रशासकीय कामकाज आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी शिकण्यासाठी गुवाहाटीत तब्बल ६५ लाख रुपये खर्चून प्रशिक्षण घेतले; मात्र उल्हासनगर महापालिकेत परतल्यानंतर महापौर अश्विनी निकम यांच्याबद्दल महासभेत आक्षेपार्ह वक्तव्य करणे, महापौरांच्या खुर्चीवर उपमहापौरांकडून कब्जा, सत्ताधाऱ्यांतील संघर्ष आणि दालनातील हाणामारी सुरूच आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशांतून झालेला हा प्रशिक्षणाचा अभ्यास दौरा व्यर्थ गेला की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

उल्हासनगर महापालिकेतील शिवसेना - भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रशासकीय कामकाज, सभागृहाची शिस्त आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे धडे देण्यासाठी गुवाहाटीत आयोजित करण्यात आलेल्या ६५ लाखांच्या प्रशिक्षण दौऱ्याचे वास्तव आता उघडे पडले आहे. शहरातील ७६ पैकी ६१ नगरसेवकांनी या दौऱ्यात सहभाग घेतला होता. बहुतांश नगरसेवक प्रथमच निवडून आल्याने त्यांना महापालिकेच्या कामकाजाची दिशा मिळावी, यासाठी हा दौरा आवश्यक होता, अशी भूमिका महापौर अश्विनी निकम यांनी मांडली.

महापालिकेने केवळ नगरसेवकांचा खर्च केला आणि नातेवाईक स्वखर्चाने आले, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौरांना सभागृह चालवणे, सदस्यांना हाताळणे आणि वादांवर तोडगा काढण्याचे स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात आले होते.

मात्र, त्यानंतरच्या महासभेतील प्रकारांनी या प्रशिक्षणाची लक्तरेच वेशीवर टांगली आहेत. भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी महापौरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाला. महासभा भोजनासाठी स्थगित होताच उपमहापौर अमर लुंड यांनी महापौरांच्या खुर्चीचा ताबा घेतला. तसेच यापूर्वी प्रधान पाटील आणि विपुल मयेकर यांच्या समर्थकांमध्ये महापालिकेतच सभापतींच्या दालनात बेदम हाणामारी झाली आणि महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाले.

६५ लाख रुपये पाण्यात

सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजपा आणि शिवसेना सभागृहात मात्र सातत्याने एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे शिस्त आणि लोकशाहीचे धडे शिकवणाऱ्या दौऱ्यावर खर्च झालेले ६५ लाख रुपये अक्षरशः पाण्यात गेले का, असा सवाल करदाते विचारत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT