

नवनीत बऱ्हाटे
Ulhasnagar News : शिवसेना महापौर अश्विनी निकम यांच्या पत्राला मिळालेल्या न्यायालयीन दणक्यानंतर उल्हासनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीवरील स्थगितीचे कुलूप अखेर उघडले आहे. शिवसेनेच्या निर्णयाविरोधात भाजपने दिलेल्या कायदेशीर लढ्याला यश आल्यानंतर २४ सप्टेंबरला विशेष महासभा होणार आहे. सत्ताधारी युतीच्या वाट्याला येणाऱ्या सात जागांवर कोणाची वर्णी लागणार, यावरून आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगर महापालिकेतील बहुचर्चित सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महापालिका प्रशासनाने २४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष महासभा आयोजित केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. महापालिका सचिव डॉ. दिपाली चौगले यांनी १७ सप्टेंबर रोजी काढलेल्या नोटिसीनुसार, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ही प्रक्रिया २५ सप्टेंबरपूर्वी पूर्ण करणे प्रशासनाला बंधनकारक आहे.
इच्छुक उमेदवारांना २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत आयुक्तांच्या दालनात अर्ज आणि वैध कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी या निवडणुकीसाठी महासभा बोलावण्यात आली होती.
मात्र, उमेदवारांच्या नावांवरून सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीत मतभेद निर्माण झाल्याने महापौर अश्विनी निकम यांच्या निर्देशानुसार निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. शिवसेनेच्या या निर्णयाविरोधात भाजप शहराध्यक्ष राजेश वधारिया यांच्या नेतृत्वाखाली उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. न्यायालयाने स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर ठरवत १५ दिवसांत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. संख्याबळानुसार सर्व सात जागा सत्ताधारी युतीच्या वाट्याला येणार असल्या, तरी उमेदवारीवरून पुन्हा राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे २४ सप्टेंबरच्या विशेष महासभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
निवडणूक स्थगितीमागे वरवर कायदेशीर कारण देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात शिवसेना-भाजपमधील अंतर्गत वाद आणि उमेदवारांच्या नावांवर एकमत न झाल्यानेच प्रक्रिया लांबणीवर पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दोन सदस्यांचे पद रद्द झाल्याने शिंदे शिवसेनेचे संख्याबळ घटले असून, पक्षाला स्वीकृत सदस्याची एक जागा गमवावी लागणार आहे. त्यामुळे सात पैकी चार जागांवर भाजपचा दावा निश्चित मानला जात असून शिवसेनेच्या वाट्याला केवळ तीन जागा येणार आहेत. शिवसेनेने निवडणूक स्थगित केल्यानंतर मित्रपक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे युतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून या राजकीय लढाईत भाजपचाच वरचष्मा असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.