Vaishnavi Hagawane Case Sarkarnama
विश्लेषण

Vaishnavi Hagawane Case : वडिलांना मुलगी जड झाली होती काय? समाज, प्रतिष्ठेपायी नको ते घडलं...

The Role of Family and Societal Expectations : लग्नात वारेमाप खर्च करणे प्रतिष्ठेचे मानले जाते आणि हे असे मानले जात असल्यामुळे बिकट सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. सासरच्या मंडळींना एकदा घ्यायची सवय लागली की थांबत नाही. यातूनच वैष्णवी हगवणे यांचा जीव गेला. नाकाने कांदे सोलणारा समाज कधी बदलणार, कधी जागरूक होणार, हा खरा प्रश्न आहे.

अय्यूब कादरी

Understanding the Vaishnavi Hagawane Case : तरुण मुलीचे किंवा मुलीचे आई-वडील असणे हे आपल्या समाजात संकट असल्यासारखे असते. ही बाब आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती असलेल्याच नव्हे तर गडगंज श्रीमंत असलेल्या पालकांच्या वाट्यालाही येते, हे पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातून समोर आले आहे. समाजात खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रेमविवाह असूनही वैष्णवीच्या वडिलांना वारेमाप पैसा खर्च करावा लागला. वैष्णवीच्या आत्महत्येमागे तिच्या पालकांचीही चूक आहे, असा एक सूर उमटत आहे, मात्र समाज कधी बदलणार? महिलांचे दुय्यम स्थान कधी दूर होणार, याचे उत्तर समाजाला द्यावे लागणार आहे.

राजकीय क्षेत्रात दबदबा असलेल्या कुटुंबातील शशांक हगवणे याच्यासोबत वैष्णवी यांचा प्रेमविवाह झाला होता. विवाह सोहळ्यात वैष्णवी यांच्या वडिलांनी पाण्यासारखा पैसा ओतला होता, हे समोर आले आहे. प्रेमविवाह असूनही इतके करण्याची गरज होती का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मुलीच्या पालकांची दुहेरी कोंडी होत असते. वैष्णवी यांच्या वडिलांनी पैसा खर्च केला नसता तर त्यांना नावे ठेवणाराही एक वर्ग समोर आलाच असता. अर्थात, अशा खोट्या प्रतिष्ठेपायी, लोक काय म्हणतील, या भावनेतून हे केले जाते. ही परंपरा ठामपणे नाकारण्याची वृत्ती समाजात कोण रुजवणार, असा प्रश्न आहे.

वैष्णवी यांच्या वडिलांनी लग्नात भरभरून दिल्यामुळे सासरच्या मंडळींचा हावरटपणा वाढतच गेला. मुलीच्या माहेरकडून मिळालेले सोने, पैसे वापरताना, उंची एसयूव्ही वापरताना खरेतर हगवणे कुटुंबीयांना लाज वाटायला हवी होती. विवाह सोहळ्यांत मुलींकडून हुंडा, कार, सोने घेणाऱ्या प्रत्येकाला अशी लाज वाटायला हवी. लाज वाटणे दूरच राहिले, अशा लोकांना समाजात प्रतिष्ठा मिळून जाते. त्यातूनच वैष्णवी यांच्या वडिलांनी हगवणे कुटुंबीयांच्या अवास्तव मागण्या लग्नानंतरही मान्य केल्या. हगवणेंचा हावरटपणा थांबलाच नाही. त्यामुळे वैष्णवी एकदा नव्हे, तर दोनदा सासर सोडून माहेरी आल्या होत्या.

आजच्या समाजात मुलगी होणे आणि मुलीचे पालक होणे, किती अवघड असते ते आता लक्षात येईल. दोनदा माहेरी आलेल्या वैष्णवी यांनी त्यांच्या आई-वडिलांनी पुन्हा सासरी पाठवले. याचे कारण, समाजातील प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल?, याची भीती. छत्रपती संभाजीगर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनीताताई तगारे सांगतात, ''सासर सोडून माहेरी आलेल्या मुलीवर 'टाकून दिलेली बाई' असा डाग समाजाकडून लावला जातो. यात गरीब आणि श्रीमंत असा भेद नसतो. सासर सोडून आलेल्या महिलेला लहान बहीण असेल किंवा लहान भाऊ असेल तर त्यांची लग्न होणे अत्यंत अवघड होऊन बसते.''

सुनीताताई पुढे सांगतात, माहेरी आलेली मुलगी पुन्हा सासरी नाही गेली तर काही ब्रह्मांड कोसळत नाही, हे पालकांच्या लक्षात येत नाही. कोर्ट - कचेरी करण्यासाठी बहुतांश पालक तयार नसतात, कारण पोलिसांकडे गेलो तर न्याय मिळेल का, याबाबतही शंकाच असते. जलदगतीने कारवाई होईल, याचीही शाश्वती नसते. अनेकवर्षे न्यायालयाचे खेटे मारावे लागतात. त्यामुळेच वैष्णवीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नसेल. यातून मग माहेरी आलेली मुलगी पालकांना जड वाटू लागते. समाजात जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न होणे गरजेचे आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांच्या वाट्याला दुय्यम स्थान आलेले आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वैष्णवी यांच्या वडिलांकडून खोऱ्याने पैसा ओढूनही हगवणे कुटुंब वरचढ राहिले, याला पुरुषसत्ताक पद्धती कारणीभूत समजली पाहिजे. सासर सोडून माहेरी येऊन राहणाऱ्या मुलींना हिणवले जाते, त्यांना घालून-पाडून बोलले जाते. समाज नको त्या वाईट प्रथा, समजांमध्ये अडकला आहे. वैष्णवीच्या आत्महत्येला तिचे पालक जबाबदार आहेत, असा सूर उमटत आहे, तो काहीअंशी खरा आहे. मात्र ज्या कोपऱ्यातून हा सूर उमटतोय त्या कोपऱ्याने मूळ समस्येकडेही दुर्लक्ष करू नये. लग्नात अवाजवी खर्च करणे, छळामुळे माहेरी आलेल्या मुलींची अप्रतिष्ठा करणे आदी बाबींचे करायचे काय? असे प्रकार कोण आणि कसे बंद करणार? याचा विचार झाला पाहिजे.

लग्नात वारेमाप खर्च करणे, श्रीमंतीचे किळसवाणे प्रदर्शन करणे हे प्रतिष्ठेचे मानले जाते. मात्र यामुळे मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. आर्थिक कुवत नसलेल्या पालकांनाही कर्ज काढून मुलींच्या विवाहात मोठा खर्च करावा लागत आहे. या आणि अशा अन्य कारणांमुळे मुलींचे पालक होणे म्हणजे संकट, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रेमविवाह करावा की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी प्रेमविवाहानंतरही आत्महत्यांचे प्रकार घडत असतील, संसार तुटण्याचे प्रकार घडत असतील तर मुलींनी या विषयावर गंभीर होण्याची गरज आहे.

कोणत्याही पालकांना आपली मुलगी जड नसते. मुलांवर पालक जीवापाड प्रेम करतात. मात्र समाजातील अनिष्ट रूढींमुळे मुली पालकांसाठी जड होऊन बसतात. विवाहित मुलगी माहेरी येऊन राहिली तर समाज काय म्हणेल, ही भावना त्याला कारणीभूत असते. त्यामुळे नको त्या बाबींमध्ये नाक खुपसणे समाजाने बंद केले पाहिजे. वारेमाप पैसा खर्च केला तरच प्रतिष्ठा वाढेल, ही भावना श्रीमंत लोकांनी आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. सुनीताताई म्हणतात, ''अशा वारेमाप खर्चाला कात्री लावून त्या रकमेतून गरीब, गरजू मला-मुलींचे विवाह लावून देता येतील का, असा विचार श्रीमंतांनी केला पाहिजे.'' सुनीताताईंची ही हाक बड्या मंडळींपर्यंत पोहोचेव का? यावर खूप काही अवलंबून आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT