Narendra Modi, Rahul Gandhi Sarkarnama
विश्लेषण

Vice President Election update : मोदी-शहांनी राजकीय शत्रूचं मन वळवलं, पण काँग्रेसच्या 'मास्टरस्ट्रोक'नं सगळं फिस्कटणार? 'NDA'ची डोकेदुखी वाढली...

NDA candidate CP Radhakrishnan for vice president election : इंडिया आघाडीने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देत एनडीएमधील महत्वाच्या तेलगू देसम पक्षाची कोंडी केल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.

Rajanand More

India Alliance Candidate B Sudarshan Reddy : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमुर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन आणि रेड्डी असा लढत होणार आहे. पण रेड्डी यांची उमेदवारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादीत नसून विरोधकांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी म्हणजे इंडिया आघाडीची सत्ताधारी एनडीएला टाकलेली गुगली असल्याचे विश्लेषण राजकीय तज्ज्ञांकडून केले जात आहे. रेड्डी यांच्या उमेदवारीमागे अनेक कंगोरे दडले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ते अराजकीय व्यक्ती आहेत. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती असल्याने राजकीय वर्तुळाबाहेर त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ते दक्षिण भारतीय आणि त्यातही त्यातही त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील आहे. सध्या ते तेंलगणाचे रहिवासी आहेत.

राधाकृष्णन यांना एनडीएतील सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचाही समावेश आहे. तर सोमवारी त्यांचे कट्टर राजकीय शत्रू जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसनेही राधाकृष्णन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, तोपर्यंत सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टर राजकीय शत्रुला सोबत आणल्याची चर्चा रंगली होती.

या घडामोडींनंतर काही तासांत इंडिया आघाडीने रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करत मोदींच्या मेहनतीवर पाणी फेरल्याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. तसेच चंद्राबाबू यांचीही आघाडीने कोंडी केली आहे. याचे कारण म्हणजे सुदर्शन रेड्डी यांची चंद्राबाबूंशी असलेली जुनी जवळीक. रेड्डी हे वकील असताना 1980 ते 90 च्या दशकात ते चंद्राबाबूंच्या सरकारसोबत जवळून काम करत होते. रेड्डी यांनी टीडीपी सरकारमधील अनेक प्रकरणे कोर्टात हाताळली आहेत. त्यानंतर ते आंध्र प्रदेश हायकोर्टाचे न्यायमूर्तीही होते.

सुदर्शन रेड्डी यांची टीडीपीशी असलेली जवळीक चंद्राबाबूंचे मन वळविणार का, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. मात्र, टीडीपीच्या नेत्यांकडून आपण एनडीए सोबत असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे जगनमोहन रेड्डी यांचीही कोंडी होणार आहे. तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने अद्याप कुणाला पाठिंबा दिला नसला तरी ते रेड्डी यांना मदत करू शकतात. इंडिया आघाडीकडून रेड्डी यांच्यासाठी या तिन्ही पक्षांसोबत चर्चा केली जाऊ शकते.

काँग्रेसने अराजकीय व्यक्तीच्या उमेदवार म्हणून निवडीस संमती देत इंडिया आघाडी एकसंध ठेवण्याचे कामही केले आहे. आम आदमी पक्ष तसेच तृणमूल काँग्रेसने तशी मागणीच केली होती. अन्यथा हे पक्षांनी निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्यासही मागेपुढे पाहिले नसते. दुसरीकडे डीएमकेने तमिळनाडू किंवा दक्षिण भारतातील उमेदवार देण्याची मागणी केली होती. तीही मान्य झाली आहे. त्यामुळे एकंदरीतच सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारी म्हणजे संपूर्ण इंडिया आघाडीची एकजुट आणि सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढविणारी ठरण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT