Congress News Sarkarnama
विश्लेषण

Assembly Election : काँग्रेसने काय काय गमावले?

Sachin Waghmare

loksabha Election : लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल भाजपने जिंकत बाजी मारली. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसला चारी मुंड्या चित केले तर तेलंगणामध्ये काँग्रेसने बाजी मारली. राजस्थानमध्ये गेल्या 30 वर्षापासूनची परंपरा कायम राहिली. हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये काँग्रेसच्या या लाजिरवाण्या पराभवासाठी इतर घटकांपेक्षा काँग्रेसलाच जबाबदार धरले जात आहे.

या पराभवानंतर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या विजयानंतर काँग्रेसमध्ये आलेला अतिआत्मविश्वास आणि गर्व हे नडले असल्याचे म्हटले जात आहे. विजयाची अपेक्षा असताना आणि चांगल्या योजना असतानाही राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी असताना काँग्रेसचा हा पराभव म्हणजे पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात असताना या पराभवातून काँग्रेसने बऱ्याच गोष्टी गमावल्या आहेत.

काँग्रेसची 'मोहब्बत की दुकान'

'भारत जोडो यात्रे'ला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, युवक काँग्रेसच्या वतीने देशभरातील विधानसभा क्षेत्रामध्ये 'मोहब्बत की दुकान'चे काउंटर उघडण्यात आले होते. या काउंटरवरून काँग्रेसकडून अन्न आणि मुलांना पुस्तके दिली जात होती. युवक काँग्रेसच्या 'भारत जोडो लीडरशिप' या अभियानांतर्गत ही योजना आगामी लोकसभा निवडणूक डोळयांसमोर ठेऊन राबवली होती. मात्र, या योजनेचा तेलंगण वगळता अन्य राज्यात फारसा प्रभाव जाणवला नाही.

'भारत जोडो'ने तयार केलेली प्रतिमा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर 2022 पासून ही यात्रा सुरू केली होती. ही यात्रा 12 राज्यांमधून गेली होती. या यात्रेने 136 दिवसांच्या कालावधीत चार हजार किलोमीटरचे अंतर कापले होते. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली. यामध्ये भारत जोडो यात्रेचे मोठे यश होते. त्यामधून राहुल गांधी यांनी चांगली प्रतिमा निर्माण केली होती. मात्र, विधानसभा निवडणूका पार पडलेल्या तेलंगणातील विकाराबाद, हैदराबाद या दोन तर मध्य प्रदेशातील महू, इंदूर, उज्जैन या तीन जिल्ह्यांतून तर राजस्थानमधील झालावार, अलवर, कोटा, दौसा या चार जिल्ह्यातून अशी तीन राज्यांतील नऊ जिल्ह्यांतून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली होती. मात्र, भारत जोडो यात्रेचा करिष्मा मात्र निकालात पाहावयास मिळाला नाही.

हिंदुत्त्ववादाला तोंड देण्यासाठी तयार केलेली प्रतिमा

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन हिंदुत्त्ववादाला तोंड देण्यासाठी स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, त्याला देखील फारसे यश आले नाही. राहुल गांधी यांनी याआधी अनेकदा सुवर्ण मंदिराला भेट दिलेली आहे. मात्र, त्यांनी मंदिरात सेवा अर्पण केली. गुरुवाणी कीर्तनाला हजेरी लावली. सुवर्ण मंदिराला भेट दिली होती. त्यासोबतच दरबार साहिब किंवा सुवर्ण मंदिराला दिलेल्या भेटीकडे अध्यात्म किंवा राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिले गेले. मात्र, त्याचा फारसा प्रभाव या निवडणूक निकालातून कुठेच जाणवला नाही

ज्येष्ठ मंडळींवर ठेवलेला विश्वास

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी वास्तविक पाहता उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे द्यायला हवी होती. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या सांगण्यावरून ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर विश्वास न दाखविल्याने त्यांनी काँग्रेस पक्ष फोडला. दुसरीकडे सचिन पायलट यांनी एकदा बंड केले असतानादेखील काँग्रेस नेतृत्वाने युवा पिढीवर विश्वास ठेवयाला हवा होता. राजस्थानमधील निवडणुकीची जबाबदारी ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्या ऐवजी नव्या दमाचे सचिन पायलट यांच्यावर सोपवली असती तर नक्कीच त्याठिकाणी वेगळे चित्र दिसले असते.

इंडिया ब्लॉकमध्ये स्वतःची बार्गेनिंग पॉवर

तीन राज्यात भाजपने काँग्रेसचा सुफडासाफ केल्याने आगामी काळात लोकसभेसाठी होणाऱ्या जागा वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंडिया आघाडीचे जागा वाटप करताना काँग्रेसला नमती भूमिका घ्यावी लागणार आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात काँग्रेसला करिष्मा करता आला नाही. त्यामुळे हिंदी पट्ट्यातील या तिन्ही राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, हा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील जागावाटपातही काँग्रेसला आता बॅक फुटवर यावे लागणार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हा आघाडीतील सगळ्यात मोठा पक्ष आहे असे असले तरी या निवडणुकीतील पराभवामुळे जागा वाटपात आता शिवसेना आणि राष्ट्रवादीपुढे काँग्रेसला नमती भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यासोबतच देशभरातील जागावाटपात इंडिया आघाडीतील घटक पक्षासोबत जागावाटप करताना काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होणार आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष हे पक्ष ज्या टाय राज्यात जागावाटप करताना काँग्रेसची कोंडी करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केवळ राज्यातील नेतृत्त्वावर दाखवलेला विश्वास

छत्तीसगडमध्ये महादेव अपच्या माध्यमातून मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhuprsh Baghel) यांच्यावर भाजपकडून भ्रष्टचाराचे मोठे आरोप झाले. मात्र, त्यांच्यावरील आरोप खोडून काढताना जर या निवडणुकीची धुरा दहा वर्षानंतर इतरांकडे सोपविण्याचा निर्णय काँग्रेसने वेळीच घेतला असता तर याठिकाणी भाजपला या वेळेस सत्तेपासून दूर ठेवत आले असते. मात्र, ही चूक काँग्रेसला महागात पडली.

भाजपची रणनीती ठरली यशस्वी

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे पंतप्रधान व मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घेऊन समोर जाण्याचा पायंडा पडणाऱ्या भाजपने अलीकडच्या काळात उत्तर प्रदेश वगळता इतर ठिकाणच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणे टाळले आहे. त्यामुळेच भाजपला या निवडणुकीत केंद्रीय मंत्री, खासदारांना या विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागले आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्र्यापदासाठी अप्रत्यक्ष स्पर्धा लावण्याची खेळी खेळली गेली. मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये प्रत्येकी सात छत्तीसगडमध्ये चार तर तेलंगणमध्ये तीन असे २१ खासदार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात उतरवून शेजारच्या मतदारसंघावर ही प्रभाव पाडण्याची भाजपची रणनीती ठरवली, अन ती यशस्वी झाली.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT