MVA - Mahayuti Sarkarnama
विश्लेषण

Latur Assembly Election: दोन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या लातूरकरांच्या मनात चाललंय तरी काय?

Political News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत लातूरकर काय करणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

Sachin Waghmare

Latur News : लातूर जिल्ह्याची ओळख गेले काही दिवस काँग्रेसचा बालेकिल्ला अशीच राहिली आहे. मात्र. गेल्या दहा वर्षांत या काँग्रेसच्या गडाला भाजपने सुरुंग लावत शिरकाव केला आहे. गेल्या दहा वर्षांत बरेचसे पाणी पुलाखालून गेले आहे. या ठिकाणच्या तीन विधानसभा मतदारसंघ, जिल्हा परिषद, काही पंचायत समिती व लातूर महापालिका भाजपने ताब्यात घेतली. त्यामुळे एकेकाळी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या गडावर भाजपने कब्जा केला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने (Congress) दोन टर्म भाजपकडे (BJP) असलेल्या जागेवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत लातूरकर काय करणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. (Latur Assembly Election News)

लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लातूर जिल्ह्याने आतापर्यंत राज्याला दोन मुख्यमंत्री, दोन केंद्रीय मंत्री दिले आहेत. यामध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. त्याशिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर सहावेळा खासदार राहिले आहेत. त्याशिवाय केंद्रीय गृह, संरक्षण मंत्रिपद लोकसभेचे सभापती व राज्यपाल पद भूषवले आहे. त्यामुळे दिग्गज नेतेमंडळींचा जिल्हा म्हणून लातूरची ओळख कायम आहे.

अलिकडच्या काळात लातूर जिल्ह्यातील राजकारणाचा कूस बदलला आहे. या ठिकाणची राजकीय समीकरण बदलली आहेत. गेल्या दोन वर्षांच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून महायुतीचे सरकार आले. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीचे धक्के ग्रामपंचायतस्तरापर्यंत बसले आहेत.

त्यानंतर सातत्याने राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. दरम्यान, आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या सहा विधानसभा मतदारसंघाचा घेतलेला आढावा पुढील प्रमाणे.

पक्षीय बलाबल

लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी लातूर शहर, लातूर ग्रामीण मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. तर निलंगा, औसा मतदारसंघ भाजपकडे तर उदगीर, अहमदपूर मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. काँग्रेस दोन, भाजप दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोन असे सध्या पक्षीय बलाबल आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शिवाजी काळंगे विजयी झाले आहेत.

लातूर जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार

लातूर शहर विधानसभा - अमित देशमुख (काँग्रेस)

लातूर ग्रामीण विधानसभा - धीरज देशमुख (काँग्रेस)

निलंगा विधानसभा - संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)

औसा विधानसभा - अभिमन्यू पवार (भाजप)

अहमदपूर विधानसभा - बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार)

उदगीर विधानसभा - संजय बनसोडे (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार)

लातूर शहर विधानसभा :

या मतदारसंघावर 1995 चा अपवाद वगळता काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. 1980, 1985, 1990, 1999, 2004 च्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर 2014 पासून अमित देशमुख या ठिकाणाहून निवडून येतात. 2019 मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसने जिंकला होता.

काँग्रेसच्या अमित देशमुख यांनी भाजपच्या शैलेश लाहोटी यांचा 40 हजार 415 मतांच्या फरकाने पराभूत केले होते. या निवडणुकीत माजी मंत्री अमित देशमुख पुन्हा काँग्रेसचे उमेदवार आहेत तर भाजपचा उमेदवार ठरलेला नाही. याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर या भाजपकडून इच्छुक असल्याचे समजते.

लातूर ग्रामीण मतदारसंघ :

2009 च्या विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ रेणापूर व लातूर मतदारसंघातील काही भाग मिळून निर्मिती करण्यात आला आहे, तीन ही निवडणुकीत याठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख याचे चिरंजीव धीरज देशमुख विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता.

धीरज देशमुख हे 1 लाख 31 हजार 321 मतांना विजयी झाले होते. धीरज देशमुख यांच्यानंतर नोटाला मतदारांनी सर्वाधिक मतदान केले होते. मतदारांनी तब्बल 26 हजार 899 मते याठिकाणी नोटाला दिली होती. यावेळेसच्या निवडणुकीत पुन्हा आमदार धीरज देशमुख इच्छुक आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरलेला नाही. भाजपकडून रमेश कराड यांच्या नावाची चर्चा आहे.

अहमदपूर विधानसभा मतदारसंघ :

2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बाबासाहेब पाटील हे निवडून आले. त्यांनी 84 हजार 636 मते घेत भाजपचे विनायकराव पाटील यांना धूळ चार्ली होती. सध्या बाबासाहेब पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. या निवडणुकीत पुन्हा बाबासाहेब पाटील इच्छुक आहेत तर त्यांच्या विरोधात असलेले विनायकराव पाटील यांनी भाजपसोडून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. सध्या ते महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत.

उदगीर विधानसभा मतदारसंघ :

2019 मध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी झाले. त्यांनी भाजपच्या अनिल कांबळे यांच्यवर 20 हजार 579 मतांनी मात केली होती. सध्या संजय बनसोडे हे राज्य मंत्रीमंडळात क्रीडा मंत्री आहेत. सध्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. याठिकाणी महायुतीकडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री संजय बनसोडे हे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून सुधाकर भालेराव निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. नुकताच त्यांनी भाजपसोडून शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

निलंगा विधानसभा मतदारसंघ

2019 मध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला होता. 2019 मध्ये भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर यांचा 32 हजार131 मतांनी पराभूत केले होता. यावेळेस पुन्हा संभाजी पाटील निलंगेकर मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.

औसा विधानसभा मतदारसंघ

औसा विधानसभा मतदारसंघ 2019 मध्ये भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतला होता. या मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार यांनी विजय मिळवला होता. त्यांनी दोन टर्म काँग्रेसच्या आमदार असलेल्या बसवराज पाटील यांचा 26 हजार 714 मतांच्या फरकाने धूळ चारली होती. याठिकाणी पुन्हा भाजपकडून अभिमन्यू पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर त्यांच्या विरोधात आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दिनकर माने हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT