Mahayuti News : महायुती सरकारमध्ये 'कोल्ड वॉर' सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही मंत्री पक्ष विस्तारासाठी कामाला लागले आहेत. हे करत असतानाच धाराशिवचे शिवसेनेचे पालकंमत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी तुळजापूर ड्रग्स प्रकरणावरून गृहखात्याला टार्गेट केले आहे. आधी विकासकामे करा, जिल्ह्यातले सर्व प्रश्न सुटले आहेत का, असे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी ऑपरेशन टायगरवरून सरनाईकांना सुनावले आहे. त्यामुळे पालकमंत्री सरनाईक यांची पुन्हा नाचक्की झाली असून, उद्धव ठाकरेंची सहानुभूती वाढण्यास त्यामुळे मदत होणार आहे.
पालकमंत्री सरनाईक हे 19 आणि 20 तारखेला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा धाराशिवच्या दौऱ्यावर आले, त्यावेळीच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena)खासदार औमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे महायुतीचाच भाग असल्याचे विधान केले होते. त्यानंतर खासदार राजेनिंबाळकर यांनी पालकमंत्री सरनाईक यांना खडे बोल सुनावले होते. लोकांचे प्रश्न सोडवणे की ठाकरेंचे खासदार, आमदार फोडणे, सरनाईकांचे लक्ष्य काय आहे, याचा अंदाज त्यांच्या पहिल्याच दौऱ्यात आला होता.
पालकमंत्री सरनाईक ज्या खासदार राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासाठी गळ टाकत आहेत, ते त्यांच्या गळाला लागतील, याची सुतराम शक्यता वाटत नाही. तरीही त्यांनी प्रयत्न सोडलेले नाहीत. आता तर त्यांनी यात उपमुख्यमंत्री शिंदे यांना ओढले आहे. सावज टप्प्यात आली की शिंदे शिकार करणार, असे ते म्हणाले आहेत. यावरून आमदार कैलास पाटील यांनी सरनाईक यांच्यावर निशाणा लाधला आहे. शिकार सावजाची नव्हे, तर सरनाईक यांचीच होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तुळजापुरातील ड्रग्स प्रकरणावरून त्यांनी ज्या पद्धतीने पोलिसांची कानउघडणी केली, ती गृहखात्याची अब्रू घालवणारी आहे.
पालकमंत्री सरनाईक यांचा या दौऱ्यात महायुतीतील कोल्ड वॉरची प्रचीती तुळजापूर ड्रग्स प्रकरणावरून आली आहे. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. तपास सुरूच आहे. पोलिसांनी धमकावले, असे एका तक्रारदाराने सांगितले आणि पालकमंत्र्यांचा पारा चढला. त्यातून त्यांनी सर्वांसमक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. तक्रारदाराला धमकावले नाही, असे संबंधित पोलिस अधिकाऱ्याने काही माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत, गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. ड्रग्स प्रकरणात किंवा आणखी कोणत्याही प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई तातडीने केली पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही, मात्र पालकमंत्र्यांनी ज्या पद्धतीने पोलिस अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली, ती निश्चितच गृहखात्याचा कारभार निष्क्रिय असल्याची सांगणारी होती. पालकमंत्री सरनाईक यांच्या माध्यमातून शिवसेनेने गृहखात्यावर तर निशाणा साधला नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे झाले कोल्ड वॉर. आता ऑपरेशन टायगरच्या नावाखाली पालकमंत्री सरनाईक आणि त्यांचा पक्ष धाराशिव जिल्ह्यात जाळ्यात अडकत आहे का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार राजेनिंबाळकर आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत. या दोघांना गळाला लावण्याचा प्रयत्न सरनाईक यांचा आहे. हे दोघे शिवसेनेत आले तर समीकरणे कशी होतील, हा आणखी पुढचा भाग आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या राजकारणाला विरोध, हा खासदार राजेनिंबाळकर यांच्या राजकारणाचा पाया आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
डॉ. पाटील यांचे पुत्र राणाजगजितसिंह हे तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत. या परिस्थितीत खासदार राजेनिंबाळकर हे सत्ताधारी शिवसेनेत आले तर त्यांच्या राजकारणाचा आधार मोडित निघेल. याची कल्पना खासदार राजेनिंबाळकर यांना आहे, मात्र पालकमंत्री सरनाईक यांना याची कल्पना आहे का, याबाबत शंका आहे. त्यामुळेच ऑपरेशनचे हसेच होणार आहे, असे सध्यातरी दिसत आहे. शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्ये ओढून पालकमंत्र्यांनी खासदार राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचे महत्त्व आणखी वाढवले आहे. आता आमदार कैलास पाटील यांनी सुनावल्यामुळे सरनाईक तोंडघशी पडले आहेत.
एकंदर, चित्र असे दिसत आहे की गृहखात्याला म्हणजे फडणवीस यांना टार्गेट करत उद्धव ठाकरे यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेकडून सुरू आहे. महायुतीतील कोल्ड वॉर धाराशिवपर्यंत आले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी एसटीच्या बसने प्रवास करत प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. एसटी तोट्यात का आली आहे, याची कारणेही सांगितली. तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आक्रमक भूमिका घेत गृहखात्याची कोंडी केली. ऑपरेशन टायगर सुरूच राहणार, हेही सांगितले, मात्र या ऑपरेशनच्या नादात त्यांना खेळवले तर जात नाही ना, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.