Mumbai News : लोकसभा निवडणुकीसह हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली अशा एकूण 26 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या नेतृत्वात विजय मिळाला त्या जे.पी.नड्डा यांच्यानंतरचा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागली आहे. लोकसभेसह हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील यशस्वी कामगिरीनंतर आता भाजपमध्ये संघटनात्मक बदलांचं वारं वाहणार आहे.
याची सुरुवात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापासून होणार आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर मोदी-शाह हे पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरुन जे.पी.नड्डांनंतर (JP Nadda) राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मोदी-शाहांच्या अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रीय राजकारणात छाप पाडलेल्या मुत्सद्दी चेहर्याला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
भाजपनं केंद्रात स्वबळासह नाही तरीपण मित्रपक्षांसह सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणार्या जे.पी.नड्डांना भाजपनं थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं. मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी पण चांगलं ट्युनिंग जमल्यामुळेच भाजपकडून त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीही मुदतवाढ देण्यात आली.
एकीकडे भाजप (BJP) लोकसभेनंतर एकापाठोपाठ एक राज्य काबीज केले जात असतानाच आता पक्षात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल आगामी काळात केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. याची सुरुवात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीपासून केली जाणार आहे.भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव,धर्मेंद्र प्रधान,विनोद तावडे,केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी,तेलंगणातील नेते किशन रेड्डी आणि ओबीसी मोर्चाचे के लक्ष्मण यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांची नावं चर्चेत आहेत.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता दिल्लीची निवडणुक नड्डांच्या नेतृत्वात लढली आणि जिंकलीही. आता नड्डाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे संकेत आहेत. पक्षाध्यक्षपदासाठी सुरुवातीला महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचे नाव देखील मध्यंतरी चर्चेत होते. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या रणनीतीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस या पदाची त्यांच्यावर सध्या जबाबदारी आहे.
जे. पी. नड्डा यांचा पक्षाध्यक्षपदाची कार्यकाळ संपल्याने कार्यकारी अध्यक्ष नेमला जाईल, अशी चर्चा होती. परंतु आता हंगामी कारभार कोणाच्या हाती न देता थेट पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यानुसार पक्षातंर्गत वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे. कारण या निवडीनंतरच राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
भाजपानं 2014 नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही तब्बल 303 जागा जिंकून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची किमया करून दाखवली.त्यानंतर अमित शाह यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच जून 2019 मध्ये जे.पी.नड्डा यांचं नाव पहिल्यांदा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आली.त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अमित शाह यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ गाजवल्यानंतर जे.पी.नड्डा यांच्याकडे या पदाची जबाबदारी भाजपकडून देण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात भाजपनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीसह एकूण 26 राज्यांत सत्ता मिळवली. या कामगिरीमुळे नड्डा यांच्या नेतृत्वाची चुणूक दिसून आली. तसेच मोदी-शाहांचा त्यांच्यावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढताच राहिला. नड्डांच्या नेतृत्वातच देशभरात भाजप अधिकाधिक मजबूत होत गेला. .
पण जे.पी.नड्डा हे त्यांच्या दोन वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आल्याचे व त्याचा फटका भाजपला बसल्याचेही दिसून आले.त्यांनी लोकसभेच्या 2024 निवडणुकीवेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपा आता स्वावलंबी झाला असून पूर्वीप्रमाणे त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नसल्याचं विधान केल्यामुळे खळबळ उडाली होती. तसेच संघानेही याबाबत आपली तीव्र नाराजी ही निवडणुकीत दाखवून देतानाच भाजपाच्या जागा 303 वरून 242 पर्यंत घसरल्या होत्या.
तसेच नड्डांनी प्रादेशिक पक्षांबाबतही एक धक्कादायक विधान करतानाच जे. पी. नड्डा यांनी बिहारमधील एका कार्यक्रमात बोलताना आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील. जे उरतील तेदेखील संपून जातील, असं म्हटलं होतं. त्यामुळे मित्रपक्षांची मोठी नाराजी भाजपने ओढवून घेतली होती.
उत्तर भारतात जम बसवल्यानंतर भाजपचं आता पुढचं मिशन हे दक्षिण भारत असणार आहे.कारण दक्षिण भारतात भाजप हा पक्ष आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पार्टीसह सत्तेत आहे.पण कर्नाटक,तामिळनाडू,केरळ, आणि तेलंगणा या राज्यात भाजपला मोठा पराभव स्विकारावा लागलेला आहे.त्यामुळे दक्षिण भारतात भाजपला घट्ट पाय रोवण्यासाठी आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे.त्याचमुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी दक्षिण भारतातलं एक नावं पुढं आणण्याची मोदी-शाहांची रणनीती असू शकते.यामुळे भाजप हा फक्त उत्तर भारतीयांचा पक्ष अशी ओळख पुसण्यास मदत होईल असं बोललं जात आहे.
त्याचमुळे भाजप कर्नाटकचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी,तेलंगणातील भाजपा नेते किशन रेड्डी आणि ओबीसी मोर्चाचे प्रमुख के लक्ष्मण यांच्यापैकी एका नेत्याच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करू शकते. पण आता या लढतीत महाराष्ट्राच्या विनोद तावडेंचं नावही आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. 14 मार्चआधी भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता इंडियन एक्स्प्रेसने म्हटलं आहे.
भाजपचे विद्यमान सरचिटणीस विनोद तावडे यांच्या गळ्यातच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. कारण याआधी दोनवेळा उत्तर प्रदेश संघटना प्रभारी अमित शाह आणि जेपी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांचीही पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यापूर्वी उत्तर प्रदेश,बिहारच्या केंद्रीय निरीक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यामुळे तावडे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.