

Sillod Election : सिल्लोड नगरपालिकेसाठी मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या. गेल्यावेळी पेक्षा या निवडणुकीत मताचा टक्काही वाढला आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जी ताकद दाखवली होती, ती नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र गायब होती. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपशिवाय महाविकास आघाडीतील पक्षांनीही लढण्याआधीच शस्त्र खाली ठेवल्यासारखे चित्र पहायला मिळाले. यामुळे विरोधकांनी अब्दुल सत्तार यांना मोकळे मैदान कशासाठी सोडले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पण यावरून सिल्लोड नगरपालिकेचा निकाल काय लागणार? याची फारसी उत्सूकता आता राहिलेली नाही. अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात गेल्या 20 वर्षांपासून सिल्लोडची नगरपालिका आहे. या दरम्यान, 4 वेळा नगराध्यक्ष पदही सत्तार यांच्याच घरात होते. यावेळीही सत्तार यांनी आपले सुपूत्र समीर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. भाजपने मनोज मोरेल्लू यांना उमेदवारी दिली आणि शेवटच्या टप्प्यात आम्ही ही निवडणूक सिरियस घेतल्याचा आव आणला. इतर पक्षांनी दखल घ्यावा, असा प्रचारच केला नाही.
सिल्लोड नगरपालिकेचे मैदान जणू सगळ्या विरोधकांनी अब्दुल सत्तार यांना खेळण्यासाठी मोकळे करून दिले, अशीच परिस्थिती संपूर्ण प्रचारादरम्यान दिसली. सत्तार यांना नगरपालिका निवडणुकीचा दांडगा अनुभव असल्याने त्यांनी कोणाला सोबत घेण्याचा प्रश्नच नव्हता. सत्तार यांनीही स्व पक्षाच्या एकाही नेत्याला सिल्लोडमध्ये फिरकू दिले नाही. सत्तार यांनी शब्द टाकला असता तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एखादी सभा दिली असती, पण सत्तार यांना त्याचीही गरज वाटली नाही.
नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले होण्याआधीपासूनच सत्तार यांनी मुलगा अब्दुल समीर यांच्या नावाची घोषणा करून टाकली होती. इतरवेळी सत्तार यांच्या नावाने खडे फोडणारे, त्यांना टोकाचा विरोध करणारे विरोधक नगरपरिषदेच्या वेळी नेमका कसा गायब होतो? हे कोडचं म्हणावं लागेल. भाजप सोडला तर इतर विरोधी पक्षांना प्रभागात उमेदवारही मिळाले नाही, अशी वाईट अवस्था होती. राज्याच्या सत्तेतील राजकारण वेगळे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेगळे हा शिरस्ता पुन्हा दिसून आला.
नगर परिषदेची निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशीच झाली. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत मतांचा टक्का वाढला. यामध्ये महिला मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. मागील निवडणुकीत 70.93 टक्के मतदान झाले होते, ते यावेळी 74.51 टक्के आहे. निवडणूक सुरुवातीला एकतर्फी वाटत असतांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाग क्रमांक एक, दोन, चार व आठ मध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली. भाजपला व्हाईट वॉश देण्याचा सत्तार यांचा प्रयत्न होता.
परंतु शेवटच्या टप्प्यात भाजपच्या (BJP) उमेदवारांनी त्यांच्या या मनसुब्यावर पाणी फिरविल्याची परिस्थिती आहे. काही प्रभागात झालेल्या चुरशीच्या लढती या निकालात उलटापालट करणाऱ्या ठरणार आहेत.आता निकाल जाहीर होईपर्यंत मतदान केंद्रानुसार झालेल्या मतांची आकडेमोड करण्यात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व्यस्त आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.