Krishna Desai News : कॉम्रेड कृष्णा देसाईंची हत्या अन् शिवसेनेवर न सिद्ध झालेले आरोप

Political News : परळचे तत्कालीन आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या कामगार संघटनांवरील वर्चस्वाच्या लढाईतून झाली होती. देसाई यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले होते. महाडिक हे शिवसेनेचे पहिलेच आमदार.
Krishna Desai news
Krishna Desai news Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेची स्थापना व्हायची होती, त्यावेळी मुंबईत कामगार संघटनांचा मोठा प्रभाव होता. या कामगार संघटनांचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षांचे नेते करत होते. शिवसेनेची स्थापना झाली आणि मग त्यानंतर शिवसेना आणि डावे असा संघर्ष सुरू झाला, वर्चस्वाची लढाई सुरू झाली. हा संघर्ष टोकाला गेला आणि त्यातूनच कम्युनिस्ट नेते, परळचे तत्कालीन आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली. शिवसेनेच्या उदयाचा विषय निघाला की कॉम्रेड कृष्णा देसाई यांचे नाव चर्चेत येतेच. 5 जून 1970 च्या रात्री परळचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर झाला होता. मारेकऱ्यांना शिक्षा झाली, मात्र शिवसेना, बाळासाहेबांवरील एकही आरोप सिद्ध झाला नाही.

कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या कट रचून करण्यात आली, हे सिद्ध झालं होतं, मात्र शिवसेनेवर आरोप सिद्ध झाले नाहीत. असे असले तरी शिवसेनेच्या (Shivsena) उदयाची चर्चा सुरू झाली की कॉम्रेड कृष्णा देसाई यांचे नाव समोर येते. कारण, कॉम्रेड देसाई यांच्या हत्येनंतर परळ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक विजयी झाले होते. (Krishna Desai News)

महाडिक हे शिवसेनेचे पहिलेच आमदार. एक राजकीय हत्या झाली आणि त्यानंतर शिवसेनेला आपला पहिला आमदार मिळाला होता. त्यामुळे कृष्णा देसाई यांची हत्या शिवसेनेला कायम चिकटून राहिली आहे. शिवसेनेवर आरोप सिद्ध झाले नाहीत, हा भाग वेगळा. देसाईंच्या हत्येनंतर डाव्या चळवळीचे खच्चीकरण झाले आणि शिवसेनेचा जोर वाढायला सुरुवात झाली होती.

मराठी माणसाच्या हक्कांसाठी 1966 मध्ये स्थापन झालेली शिवसेना कालांतरानं राजकारणात सक्रिय झाली. मराठी माणसाला मुंबईत नोकऱ्या मिळत नव्हत्या, महत्वाची सर्व पदं परप्रांतीयांनी बळकावली होती. अशा परिस्थितीत मराठी माणसासाठी संघर्ष करणारी संघटना अशी शिवसेनेची ओळख निर्माण झाली होती.

स्थापनेच्या दोन वर्षांनंतरच शिवसेनेनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 1968 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेनं उडी घेतली. प्रजा समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आणि या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे 42 नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे शिवसेना नेते, कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला. शिवसेनेला पुढे राज्याची सत्ता मिळाली. मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. मात्र सुरुवात एका आमदाराने झाली होती. सामान्य परिस्थितीत शिवसेनेला पहिला आमदार मिळाला नव्हता. एका राजकीय हत्येनंतर हा विजय साकारला होता.

Krishna Desai news
Maharashtra Politics : अजितदादा घडाघडा बोला....भुजबळ, सुनेत्रावाहिनी अन्‌ बेनकेही साहेबांना का भेटले?

6 जून 1970 च्या सकाळच्या वर्तमानपत्रांनी मुंबईकरांना हादरवून टाकणारी बातमी दिली, ती परळचे आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येची. कॉम्रेड देसाई लालबाग परिसरात राहायचे. असे सांगितले जाते, की त्यांचं व्यक्तिमत्व आडदांड होतं. त्यांची शैली आक्रमक होती, दादागिरीची होती. ते 1967 मध्ये विधानसभेवर निवडून गेले होते. त्यापूर्वी चारवेळी ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातून ते कामाच्या शोधात मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर ते डाव्या चळवळीत सक्रिय झाले. त्यांनी क्रांतिकरी कम्युनिष्ट पक्षाचीही स्थापना केली होती.

लालबाग परिसरात राहणाऱ्या कॉम्रेड देसाई यांची त्याच परिसरातील ललित राइस मिलमध्ये बैठक होती. तेथेच ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत, लोकांचे प्रश्नही समजून घेत. 5 जून 1970 च्या रात्रीही ते नेहमीप्रमाणं ललित राइस मिलमध्ये बसले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना कार्यकर्त्यांसोबत बाहेर सहलीवर जायचं होतं. त्याचं नियोजन ते करत होते.

त्याचवेळी तेथे काही लोक आले आणि त्यांनी देसाई यांना बाहेर बोलावून घेतलं. त्यावेळी वीज गेली होती. त्यामुळे राइस मिलच्या बाहेरील खांबांवरील दिवे विझलेले होते. सगळीकडे अंधार पसरलेला होता. समोर कोण आहे, हेही ओळखता येत नव्हते. देसाई त्या लोकांसोबत बाहेर आणि त्या गडद अंधारात त्यांच्यावर सपासप चाकूचे वार करण्यात आले.

Krishna Desai news
Pune News : मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवर दिसला 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो; कुटुंबीयांना बसला धक्का, म्हणाले...

ललित राइस मिलच्या बाहेरील परिसरातील वीज खरंतर घालवली गेली होती. प्रचंड काळोख पसरला होता. कृष्णा देसाई हे त्यांना बोलावण्यासाठी आलेल्या लोकांसोबत बाहेर गेले. काळोखातच त्या लोकांनी त्यांच्यावर चाकूनं सपासप वार केले. देसाई यांनी प्रतिकार केला पण, तोपर्यंत घात झाला होता. या हल्ल्यात ते मृत्युमुखी पडले. देसाईंच्या हत्येची माहिती समजल्यानंतर गिरणगावात बंद पुकारण्यात आला, मुंबई हादरून गेली होती. देसाईंच्या अंत्ययात्रेला जवळापस 10 हजार लोक उपस्थित होते.

या हत्येत शिवसेनेचा हात असल्याची चर्चा तेथे सुरू होती. लाल निशाण गटाचे कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी या चर्चेला आवाज मिळवून दिला. स्मशानभूमीत शोकसभेत काहीजणांची भाषणं झाली. चव्हाण यांचंही भाषण झालं. तेथे त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि वसंतराव नाईक यांचं नाव घेतलं. त्यानंतर मराठा दैनिकाने तशी बातमी प्रसिद्ध केली. 'कॉ. कृष्णाचे खरे खुनी बाळ ठाकरे आणि वसंतराव नाईक', असा त्या बातमीचा मथळा होता.

कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येचा बाळासाहेब ठाकरे यांनीही निषेध केला होता. त्यांच्या हत्येत शिवसेनेचा हात आहे, याचा त्यांनी सातत्याने इन्कार केला होता. दुसरीकडे, डाव्या चळवळीकडून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर या हत्येबाबत कायम आरोप करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक उद्धरावदादा पाटील आणि दाजीबा देसाई यांच्यासारख्या नेत्यांनी चौकशीची मागणी लावून धरली होती, मात्र देसाई यांच्या हत्येमागं बाळासाहेब ठाकरे यांचा हात असल्याचं कधीही सिद्ध झालं नाही. असं असलं तरी देसाई यांच्या हत्येचा संशय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कायम राहिला.

Krishna Desai news
Video Ajit Pawar : पवारसाहेब अन् अतुल बेनकेंच्या भेटीवर अजितदादा थोडक्यातच बोलले; म्हणाले...

देसाई यांची हत्या झाली त्याचवर्षी म्हणजे 18 ऑक्टोबर 1970 रोजी त्यांच्या परळ मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. डाव्या पक्षांनी या पोटनिवडणुकीत देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई यांना उमेदवारी दिली होती. एकूण 13 पक्षांनी सरोजिनी देसाई यांना पाठिंबा दिला होता. शिवसेनेनं परळचे नगरसवेक वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली. महाडिक हे बाळासाहेबांचे अत्यंत निकटवर्तीय. 20 सप्टेंबर 1970 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी महाडिक यांच्यासाठी सभा घेतली होती. परळच्या कामगार मैदानात झालेल्या या सभेत त्यांनी डावे पक्ष हे राष्ट्रवादाचे विरोधक असल्याची टीका केली होती. मुंबईतील मराठी माणसाचा मुद्दा शिवसेनेने प्रचारात केंद्रस्थानी ठेवला होता.

29 सप्टेंबर रोजी सरोजिनी देसाई यांच्या प्रचारासाठी सभा झाली. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, बाबूराव सामंत, सदानंद वर्दे, टी. एस. कारखानीस, दत्ता देशमुख आदी नेत्यांनी त्या सभेला उपस्थिती लावली होती. कुणीही जिंकला तरी चालेल, मात्र शिवसेनेचा उमेदवार विजयी व्हायला नको, अशी भूमिका घेत मोहन धारिया यांनीही परळमध्ये सरोजिनी देसाई यांच्यासाठी सभा घेतली होती. विशेष म्हणजे, धारिया यांच्या इंडिकेट कॉंग्रसेने देसाई यांना जाहीर पाठिंबा दिलेला नव्हता.

कॉम्रेड ए. बी. बर्धन यांनीही देसाई यांचा प्रचार केला होता. शिवसेना आणि डाव्या चळवळींसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर या निकालाचा दूरगामी परिणाम होणार होता आणि तसा तो झालाही.

Krishna Desai news
Crime News : भाजप नगरसेविकांचे गोव्यातील व्हिडिओ व्हायरल, पोलिस ठाण्यात घेतली धाव

डाव्या पक्षांच्या नेत्यांना सरोजिनी देसाई यांच्या विजयाची पूर्ण खात्री होती. कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येमुळं सहानुभूती मिळेल हा मुद्दा तर होताच, शिवाय परळमध्ये डाव्या पक्षांची यंत्रणा चांगली होती, संपर्कही चांगला होता. असं असतानाही कृष्णा देसाई यांच्या हत्येनं मुंबई जशी हादरली होती, तशीच ती या पोटनिवडणुकीच्या निकालानंही हादरून गेली होती. अटीतटीच्या या निवडणुकीत सरोजिनी देसाई यांचा पराभव झाला आणि वामनराव महाडिक विजयी झाले. देसाई यांना 29,913 आणि महाडिक यांना 31,592 मतं मिळाली. 1679 मतांनी महाडिक विजयी झाले होते.

डाव्या चळवळीसाठी ही मोठी पीछेहाट होती. महाडिकांची विजयी सभा शिवाजी पार्कवर झाली. 'जला दो, जला दो, लाल बावटा जला दो', अशा घोषणा आणि 'जल गया, जल गया, लाल बावटा जल गया...' अशा उत्तरादाखल घोषणा शिवसैनिकांनी दिल्या होत्या. परळ विधानसभेची पोटनिवडणूक धर्मयुद्ध होतं, असं त्या सभेत बाळासाहेब म्हणाले होते. महाडिकांच्या विजयानं शिवसैनिकांत उत्साह पसरला आणि शिवसेनेनं जोर पकडला.

Krishna Desai news
Video Ajit Pawar : स्टेज, बॅनर्स, पोस्टर अन् 'जॅकेट'ही गुलाबी, 'पिंक पॉलिटिक्स'वर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझ्या...

कृष्णा देसाई हे 1942 च्या 'चले जाव' लढ्यात सहभागी होते. लालबागमध्ये त्यांनी भूमिगत राहून तरुणांना लष्करी प्रशिक्षण दिलं होतं. 1946 च्या नाविक दलाच्या विद्रोहात त्यांचा सक्रिय सहभाग होता. लालबागमध्ये त्यांनी गिरणी कामगारांच्या मुलांसाठी व्यायामशाळा, वाचनालय सुरू केलं होतं.

नाट्यस्पर्धा, विविध कार्यक्रमांसाठी ते पुढाकार घ्यायचे. स्वतंत्र्यलढ्यात सहभागामुळे त्यांना तुरुंगवास झाला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तिसंग्रामातही त्यांचा सहभाग होता. वर्चस्वाच्या लढाईतून देसाई यांचा खून करण्यात आला होता. त्यांचा खून करण्यात आला त्या रात्री वीज गेली नव्हती तर ती मुद्दाम घालवण्यात आली होती, असेही नंतर समोर आले होते. डाव्यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी देसाई यांच्या खुनासाठी काँग्रेसनं रसद पुरवली होती, असेही आरोप करण्यात आले होते.

(Edited By : Sachin Waghmare)

Krishna Desai news
Video Vasant More : 'महिन्याच्या शेवटच्या दिवसांत विकेट पाडणार', ठाकरे गटाच्या वसंत मोरेंना मनसेच्या कोणी दिली धमकी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com