देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात झोकून देणं, हे वाटते तितकं सोपं नव्हतं. कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी नोकरी करणाऱ्यांसमोर तर हा प्रश्न डोंगराइतका मोठा होता. मात्र अशा असंख्य लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास प्राधान्य दिलं. नोकऱ्या, व्यवसाय सोडून त्यांनी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिलं. त्यामुळं आपण आज स्वातंत्र्याची फळं चाखत आहोत. या स्वातंत्र्यसैनिकांवर गांधीजींच्या विचारांचा पगडा कायम राहिला. गुलझारीलाल नंदा हे एक असंच नाव. पुढे ते राजकारणात आले. देशाच्या अडचणीच्या काळात दोनवेळा ते अल्पकाळासाठी काळजीवाहू पंतप्रधान झाले, गृहमंत्री झाले. असे असतानाही त्यांना राहायला स्वतःचं साधं घरही नव्हतं. राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर ते भाड्याच्या घरात राहायचे.
सध्याच्या काळात एखादा नेता आमदार जरी झाला तर पुढच्या पाच वर्षांत त्याची 'झेप' डोळे दीपवून टाकणारी असते, हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. अशा काळात गुलझारीलाल नंदा यांच्याकडं स्वतःचं घर नव्हतं, असं म्हटलं तर ते कुणालाही सहजासहजी पटणार नाही, मात्र ही वस्तुस्थिती आहे. दोनवेळा पंतप्रधान राहिलेले गुलझारीलाल नंदा हे भाड्याच्या घरात राहायचे. सध्याचे राजकीय चित्र पाहिले आणि त्यात एखादा साधा राहणीमान असलेला नेता दिसला की लोकांना त्याचं खूप अप्रूप वाटतं. पण एक काळ असा होता, की साधेपणा हा राजकीय नेत्यांचा स्थायीभाव होता. नंदा यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. आताही नेत्यांवर गांधींजींच्या विचारांचा प्रभाव असतो, मात्र त्यांचे विचार आचरणात आणण्याचा 'धोका' ते पत्करत नाहीत. यात काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश आहे, हे वेगळं सांगायची गरज नसावी. जुन्या काळात मात्र अनेक नेते गांधींजींच्या विचारांचे अनुकरण करायचे. अत्यंत साधेपणानं राहायचे, भ्रष्टाचारापासून सुरक्षित अंतर ठेवायचे. दोनवेळा काळजीवाहू पंतप्रधान राहिलेल्या गुलझारीलाल नंदा यांचे नाव या यादीत शीर्ष स्थानी आहे.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं 27 मे 1964 रोजी निधन झालं. त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधानपदी निवड झाली. या दरम्यानच्या काळात गुलझारीलाल नंदा यांना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधा मिळाली. 9 जून 1964 पर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान राहिले. मोरारजी देसाई हे ज्येष्ठ मंत्री होते, मात्र काँग्रेसने ही संधी नंदा यांना दिली. नंदा यांना सत्तेचा मोह नव्हता. ते पदाला चिकटून बसणार नाहीत, कोणताही पेचप्रसंग निर्माण होऊ देणार नाहीत, असं पक्षाला वाटलं. त्यामुळे मोरारजी देसाई यांच्याऐवजी नंदा यांना ही संधी मिळाल्याचं सांगितलं जातं. नंदा यांनी 13 दिवस देश व्यवस्थित सांभाळला. कायदा व सुव्यवस्थेची काळजी घेतली. नंतर लालबहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्यांना गृहमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली.
पुढे 11 जानेवारी 1966 रोजी लालबहादूर शास्त्री यांचं निधन झालं. त्यावेळी इंदिरा गांधी यांच्यासह यशंवतराव चव्हाण, मोरारजी देसाई, के. कामराज आदी दिग्गज नेते पंतप्रधानपदाचे दावेदार होते. असे असतानाही लालबाहूदर शास्त्री यांचे निधन झाल्याच्या दिवशीच काळाजीवाहू पंतप्रधानपदाची जबाबदारी पुन्हा गुलझारीलाल नंदा यांच्याकडेच सोपवण्यात आली. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. त्यांच्या मंत्रिमंडळातही नंदा यांना गृहमंत्रिपद मिळालं. दोनवेळा पंतप्रधान, गृहमंत्री झालेले गुलझारीलाल नंदा राजकीय जीवनातून निवृत्त झाल्यानंतर भाड्याच्या घरात राहिले. कारण ते सच्चे गांधीवादी होते. आपल्या कार्यालयाचा त्यांनी आपल्या खासगी कामासाठी कधीही वापर केला नाही. आजच्या राजकीय नेत्यांची परिस्थिती पाहिली की गुलझारीलाल नंदा यांच्याबाबतची ही माहिती आजच्या पिढीला कदाचित खरी वाटणार नाही, पण ती वस्तुस्थिती आहे.
गुलझारीलाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1898 रोजी पंजाबच्या सियालकोटमध्ये झाला. फाळणीनंतर सियालकोट पाकिस्तानात गेला. लाहोर, अमृतसर, आग्रा आणि अलाहाबादमध्ये (आताचे प्रयागराज) त्यांचं शिक्षण झालं. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी अलाहाबाद येथून मुंबई गाठली. 1921 मध्ये मुंबईतील नॅशनल कॉलेजमध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथेच, म्हणजे मुंबईत त्यांची गांधीजींसोबत पहिली भेट झाली. गांधीजींनी 1920 मध्ये असहकार आंदोलन सुरू केलं होतं. त्यांच्या आवाहनानुसार अनेकांनी नोकऱ्या सोडून या आंदोलनात भाग घेतला होता. नंदा यांचा विवाह 1916 मध्ये झाला होता. त्यांना एक बाळ होतं. अशा परिस्थितीत त्यांची घालमेल सुरू झाली. नोकरी सोडून असहकार आंदोलनात भाग घेतला तर कुटुंबीयांचे काय होणार, अशी चिंता त्यांना सतावत होती. मात्र शेवटी त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
असहकार आंदोलनात सहभागी झाल्यांनतंर नंदा यांनी आयुष्यभर महात्मा गांधीजींच्या विचारांचं अनुकरण केलं. ते अर्थतज्ञही होते. कामगार आणि मजुरांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती, कामगारांबद्दल त्यांना सहानुभूती होती. कामगारांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वस्त्रोद्योग कारखान्यांतील कामगारांसाठी त्यांनी मजूर महाजन संघटनेची स्थापना केली होती. काँग्रेसच्या ट्रेड युनियनच्या उभारणीतही त्यांनी पुढाकार घेतला होता. जिनिव्हा येथे झालेल्या श्रम परिषदेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू करावा, अशी मागणी 1966 मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी नंदा देशाचे गृहमंत्री होते. हा कायदा लागू करावा, यासाठी देशात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू होती. 1966 मध्ये साधू-संतांनी यासाठी संसदेवर मोर्चा काढला होता. मोर्चात सहभागी लोकांनी गोंधळ घातला. शासकीय मालमत्तेची नासधूस करण्यात आली. जमाव नियंत्रित होत नव्हता. त्यामुळं गोळीबार करण्यात आला. त्यात काही आंदोलकांचा मृत्यू झाला. त्यामुळं त्यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. तरीही ते प्रकरण शमले नव्हते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 1971 मध्ये या मुद्द्याचा निवडणुकीत वापर केला होता. खरेतर, नंदा हेही गोहत्याबंदी कायद्याच्या बाजूने होते, मात्र चर्चेने तो प्रश्न सोडवणं त्यांना शक्य झाले नव्हतं.
गृहमंत्रिपद गेल्यानंतर ते आपल्या कुरूक्षेत्र मतदारसंघात सक्रिय राहिले. इंदिरा गांधी यांवी लागू केलेल्या आणीबाणीला त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे वाढदिवस अभिष्टचिंतनाचे निमित्त करून त्यांना भेटण्यासाठी इंदिरा गांधी त्यांच्या निवासस्थानी जाणार होत्या. मात्र इंदिरा गांधी यांनी आपल्या घरी येण्याची गरज नाही, असे नंदा यांनी अधिकाऱ्यांना कळवले होते. तरीही इंदिरा गांधी आल्या, त्यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. आणीबाणीला आपला विरोध कायम आहे, असं नंदा यांनी इंदिरा गांधी यांना सांगितलं होतं. नंदा यांनी अखेर एप्रिल 1977 मध्ये काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, असा निर्णयही त्यांनी जाहीर केला.
नंदा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य साधेपणानं व्यतीत केलं. राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. उदरनिर्वाहाचं साधन त्यांच्याकडे नव्हतं. ते सरकारी बसमधून प्रवास करायचे. दिल्लीत त्यांनी भाड्याचं घर घेतलं होतं. एकदा भाडे न दिल्यामुळं घरमालकानं त्यांना घर रिकामे करायला लावलं होतं, असा उल्लेख रशीद किडवाई यांच्या एका पुस्तकात आहे. नंतर ते मुलीकडे अहमदाबादला गेले. 1977 ते 1988 पर्यंत ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. 15 जानेवारी 1998 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचं सर्व साहित्य एका पिशवीत मावेल इतकंच होतं, असं त्यांच्या कन्या पुष्पाबेन मेहता यांनी सांगितलं होतं.
गुलझारीलाल नंदा हे अत्यंत प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ होते. त्यामुळेच राजकारण सोडल्यानंतर त्यांच्याकडे उपजीविकेचं कोणतंही साधन नव्हतं. त्यांना भ्रष्टाचाराचा अत्यंत तिटकारा होता. हयातभर त्यांनी गांधीजींच्या विचारांचं अनुकरण केलं. गांधीजींच्या विचारांपासून दूर जाणं हेच भ्रष्टाचाराचे मूळ कारण आहे, असं त्यांना वाटायचं. त्यामुळेच त्यांच्या बँक खात्यातही काही हजार रुपयेच असायचे. आणीबाणी आणि त्यानंतरच्या घडामोडींनी कंटाळून ते राजकारणातून बाहेर पडले, मात्र अन्य केोणत्याही पक्षात त्यांनी प्रवेश केला नाही. आपल्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही. आजच्या पिढीला हे ऐकून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. गुलझारीलाल नंदा यांच्यासारखे तत्वनिष्ठ राजकीय नेते आता शोधूनही सापडणार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.