प्रमोद महाजन हयात असते तर राजकारणात वेगळं चित्र दिसलं असतं. प्रमोद महाजन यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम केलं नसतं, असा दावा जितेंद्र दीक्षित यांनी 'बॉम्बे आफ्टर अयोध्याः ए सिटी इन फ्लक्स' (हार्पर कॉलिन्स इंडिया प्रकाशन) या पुस्तकात केला आहे. दीक्षित यांनी यासह अनेक दावे या पुस्तकात केले आहेत, असे विविध माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांत म्हटले आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना भाजपमध्ये उच्च स्थानावर पोहचलेले, केंद्रीय मंत्रिपद भूषवलेले प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी एप्रिल 2006 मध्ये गोळीबार केला. त्यावेळी त्यांचे वय अवघं 57 वर्षे होतं. 1990 च्या दशकातील भारतातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या, राजकारणाच्या क्षितीजावर दिमाखात तळपणाऱ्या प्रमोद महाजन यांचा 3 मे 2006 रोजी अकाली मृत्यू झाला. भावाने केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते.
भाजपचे दिवंगत नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन - राव यांना भाजपनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून उमेदवारी नाकारली. तो धागा पकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून (ShivsenaUBT) (ठाकरे गट) करण्यात आला. प्रमोद महाजन हयात असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उदय झाला नसता, अशा शब्दांत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदी यांना डिवचलं होतं. निवडणुकीतील टीका-टिपण्णीचा भाग सोडला तरी प्रमोद महाजन यांच्यामध्ये ती क्षमता होती, हे कुणीही नाकारणार नाही. त्यांच्या पुढाकारामुळेच राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झाली होती. त्यामुळेच बलाढ्य काँग्रेस आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला तोंड देणे शक्य झालं होतं.
महाजन कुटुंबीय मूळचे धाराशिवचे (उस्मानाबाद). प्रमोद महाजन यांचे वडील व्यंकटेश महाजन हे शिक्षक होते. नोकरीसाठी ते अंबाजोगाई (जि. बीड) येथे स्थायिक झाले. त्यानंतर त्यांचा धाराशिवशी फार संबंध राहिला नाही. आता व्यंकटेश महाजन यांच्या नावाने धाराशिवमध्ये महाविद्यालय सुरू आहे. प्रमोद महाजन यांचं बालपण अंबाजोगाईतच गेलं. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण बीडमध्ये झाले. नंतर पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली. अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात काही काळ त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केलं. आणीबाणीच्या काळात ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांच्या पत्नीचे नाव रेखा असून, त्यांचा प्रमेविवाह झाला होता. राहुल आणि पूनम (Poonam Mahajan) ही त्यांची दोन अपत्ये. राहुल आणि पूनम दोघेही पायलट आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लहानपणापासूनच प्रमोद महाजन (Pramod Mahajan) हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित होते. 1970-1971 दरम्यान त्यांनी तरुण भारत या दैनिकात पत्रकारिता केली. त्या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, काही काळ त्यांनी एका शाळेत शिक्षकाचीही नोकरी केली होती. ती नोकरी सोडून ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. त्याला देशभरातून विरोध झाला होता. प्रमोद महाजन हेही आणीबाणीच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आंदोलनात भाग घेतला. त्यामुळे त्यांना नाशिक येथील कारागृहात डांबण्यात आले. आणीबाणी लागू असेपर्यंत ते कारागृहातच होते. आणीबाणी मागे घेतल्यानंतर त्यांची सुटका झाली.
एखाद्याला संघातून भाजपमध्ये घेताना काळजी घेतली जायची. निवडूनच संघात घेतलं जायचं. अशा निवडक स्वयंसेवकांमध्ये प्रमोद महाजन यांचा समावेश होता. 1983 मध्ये ते भाजपचे राज्य सचिव झाले. नंतर ते राष्ट्रीय सचिव झाले. 1984 मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 1986 मध्ये ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले.
प्रमोद महाजन यांचे संघटनकौशल्य वाखाणण्याजोगे होते. त्याच्या बळावर त्यांनी राज्यात पक्षातील स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी तसंच स्थान निर्माण केलं. महाराष्ट्रात भाजप रुजवण्यासाठी, नेते घडवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. भाजपला (BJP) नंतरच्या काळात आणि आजही त्याची फळे चाखता येत आहेत. त्यांची इच्छा नेहमीच देशपातळीवर काम करण्याची होती. असे असले तरी महाराष्ट्रात भाजपला बळ मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. गोपीनाथ मुंडे हे त्यांचे बालपणीचे मित्र. राज्यात पक्ष वाढवण्यासाठी त्यांना मुंडे यांची मोलाची साथ मिळाली. मुंडे यांचा विवाह महाजन यांच्या भगिनी प्रज्ञा यांच्याशी झाला.
स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्षे राज्यात काँग्रेसचा (Congress) दबदबा होता. अनेक वर्षे काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं जाळं राज्यभरातील गावागावांत पसरलेलं होतं. त्यामुळे काँग्रेसला मात देणं सोपं नसायचं. अशा काळात शिवसेनेचा उदय झाला होता. शिवसेना गावागावांत पोहोचू लागली होती. गावागावांत शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते तयार होऊ लागले होते.
काँग्रेसच्या सरंजामदार नेत्यांना कंटाळलेल्या तरुणांना बाळासाहेबांचं नेतृत्व आणि शिवसेनेनं भुरळ घातली होती. त्यावेळी भाजप गावागावांत पोहोचलेला नव्हता. कार्यकर्त्यांची फळी होती, मात्र ती काँग्रेस आणि शिवसेनेइतकी मजबूत नव्हती. ग्रामीण भागात भाजपचं जाळे पसरायचं असेल तर शिवसेनेसोबत युती करावी लागेल, हे प्रमोद महाजन यांनी हेरलं होतं. त्यांच्या पुढाकारानेच शिवसेना-भाजपची युती झाली. पहिल्यांदा 1995 मध्ये युतीची सत्ता आली. त्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले होते. 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन हयात असते तर ही युती सहजासहजी तुटली नसती, हे निश्चित.
अमेरिकेतील बर्मिंघममध्ये 1984 च्या फेब्रुवारी महिन्यात दूतावासातील मराठी अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण झाले. कश्मीर लिबरेशन आर्मीने ते अपहरण केलं होतं. 1971 मध्ये एअर इंडियाच्या विमानाचं अपहरण करणाऱ्या मकबूल भट्टची सुटका करावी, या मागणीसाठी म्हात्रे यांचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण झाल्याच्या तिसऱ्या दिवशी अतिरेक्यांनी म्हात्रे यांची हत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन इंदिरा गांधी (Indira Gandhi) सरकारने मकबूल भट्ट याला फाशी दिली होती. हिंदुत्वाचं राजकारण करण्यासाठी शिवसेनेला हा मुद्दा सापडला होता.
मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या राजकारणाची बाळासाहेबांनी सांगड घातली. त्यावेळी सामना दैनिक सुरू झाले होते. त्या दैनिकाच्या अग्रलेखांतून बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका मांडायला सुरवात केली. त्यावेळी भाजप काठावरच होता. शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 1989 मध्ये पोटनिवडणुकीत विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. बाळासाहेबांनी द्वेषपूर्ण भाषणे केली म्हणून रमेश प्रभू यांची आमदारकी न्यायालयाने नंतर रद्द केली होती, हा भाग वेगळा, मात्र विजयाचा मार्ग शिवसेनेला सापडला होता.
हे सर्व सुरू असताना त्यावेळी भाजपचे कान टवकारले गेले होते. भाजप त्यावेळी गांधी, समाजवादी विचारसरणीवर होता. विलेपार्ले पोटनिवडणुकीत भाजपनं जनसंघाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता, असे सांगितले जाते. मात्र यादरम्यान एक महत्वाची गोष्ट प्रमोद महाजन यांच्या लक्षात आली होती. विलेपार्लेतील शिवसेनेचा विजय हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळं झाला होता, हे महाजनांनी अचूक हेरलं होतं. या विजयामुळे हिंदुत्वाची व्याप्ती त्यांच्या आणि भाजपच्याही लक्षात आली. त्यानंतर त्याचवर्षी पालमपूर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती. तीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मंथन झालं होतं. निवडणुकीत यश मिळवून देणाऱ्या मुद्द्याचा भाजपचाही शोध संपला होता. त्यामुळेच भाजपने रामजन्मभूमी आंदोलन हातात घेण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी देशभरात पसरायचं असेल तर त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांना सोबत घेणं, त्या पक्षांसोबत युती करणं क्रमप्राप्त होतं, असं मत प्रमोद महाजन यांनी पालमपूरच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मांडलं होतं. शिवसेना-भाजप युतीची मुहूर्तमेढ पालमपूरच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीतच रोवली गेली होती. त्यामुळेच तर प्रमोद महाजन यांना शिवसेना -भाजप युतीचं शिल्पकार म्हटलं जातं.
विचारमंथन झाल्यानंतर भाजप नेते शांत बसले नाहीत. युती व्हावी, यासाठी प्रमोद महाजन यांच्यासह अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी (Lalkrishana Adwani) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेटीगाठी सुरू केल्या. अखेर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप युती झाली. याद्वारे एका अर्थानं बहुसंख्याकवादी राजकारणाची सुरवात झाली होती, असे म्हणता येईल. अशाप्रकारे युतीची प्रमोद महाजन यांची इच्छा पूर्ण झाली होती.
बाळासाहेबांचा योग्य सन्मान राखला जाईल, याचीही त्यांनी काळजी घेतली. युतीच्या कुटुंबप्रमुखांचं पदही त्यांनी बाळासाहेबांना दिलं. प्रमोद महाजन यांना जमिनीवरील परिस्थितीची जाणीव होती. महाराष्ट्रात ग्रामीण भागात भाजपचं जाळे विस्तारायचं असेल तर शिवसेनेला दुखावून चालणार नाही, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळेच त्यांनी युती टिकली पाहिजे, याला सर्वाधिक महत्व दिलं होतं. त्याचा फायदा भाजपला निश्चितपणे झाला. आज गावागावांत भाजप पसरलेला आहे, त्यात प्रमोद महाजन यांच्या रणनीतीचा वाटा मोठा आहे.
1980 च्या दशकात युती, आघाड्यांचे पर्व सुरू झाले. त्या काळात प्रमोद महाजन यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी 1990 मध्ये रथयात्रा काढली होती. त्यांच्या आयोजनात प्रमोद महाजन यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळं त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळाली. आपल्या पक्षाच्या विजयाला हातभार लावणारे प्रमोद महाजन यांनी राज्यसभेचंच प्रतिनिधित्व केलं. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 1996 मध्ये मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची (Loksabha Election) निवडणूक जिंकली होती. पाचवेळा त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. 2004 मधील राज्यसभेवरील त्यांची निवड शेवटचीच ठरली.
प्रमोद महाजन आज हयात असते तर त्यांना या सर्व बाबींची जाणीव राहिली असती. ते अगदी ग्राऊंड लेव्हलवरून राजकारणात आले होते. त्यांच्या कुंटुबाला कोणताही राजकीय वारसा नव्हता. संघटनकौशल्य, सचोटी आणि कष्टाच्या बळावर त्यांनी पक्षात आपले स्थान निर्माण केलं होतं. जितेंद्र दीक्षित आपल्या पुस्तकात म्हणतात की, प्रमोद महाजन आज हयात असते तर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणं पसंत केलं नसतं, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. उद्धव ठाकरे प्रचारसभेत म्हणाले होते, की प्रमोद महाजन हयात असते तर नरेंद्र मोदी यांचा उदय झाला नसता.
जितेंद्र दीक्षित यांनी एका पत्रकार परिषदेतील संवादाचा पुस्तकात समावेश केला आहे. अटलजी, अडवाणी यांच्यानंतर पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, असा प्रश्न पत्रकार प्रमोद महाजन यांना विचारतात. महाजनांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला होता, दुसरा कोणता पर्याय आहे? प्रमोद महाजन यांची पंतप्रधान होण्याची इच्छा लपून राहिली नव्हती. 2002 च्या गुजरात दंगलीत राजधर्म पाळण्याचे आवाहन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना केलं होतं. याबाबत महाजन यांनी मोदी यांना जाहीर टोमणे मारले होते, असे सांगितले जाते. यासाठी त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रोत्साहन होते, असे दीक्षित यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
प्रमोद महाजन हयात असते तर त्यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली असती का, उद्धव ठाकरे म्हणतात तसं नरेंद्र मोदी यांचा उदय झाला नसता का, या बाबींना आता फारसं महत्व नसलं तरी महाजन यांचे पक्षातील स्थान वेगळं होतं, त्यांचे व्यक्तीमत्व वेगळं होतं, त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी केलेलं काम वेगळं होतं, हे मान्य करावे लागेल. महाजन हयात असते तर आजही त्यांचे पक्षातील स्थान वेगळंच राहिलं असतं, परिणामकारक राहिलं असतं, हेही नाकारता येणार नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन-राव यांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यामुळे प्रमोद महाजन यांची पुन्हा चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेत आणलं. हे तात्कालिक कारण असलं तरी प्रमोद महाजन यांनी भाजपच्या वाढीसाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, हे मात्र निश्चित.
22 एप्रिल 2006. प्रमोद महाजन यांच्यासाठी हा दिवस काळ बनून आला होता. त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी रुग्णालयात असलेल्या गोपीनाथ मुंडे आणि महाजन यांच्या कुटुंबीयांची घालमेल सुरू झाली होती. अख्ख्या महाराष्ट्राने प्रमोद महाजन यांच्यासाठी प्रार्थना सुरू केली होती. महाजन यांनी 12 दिवस मृत्यूशी झुंज दिली, मात्र दुर्देवाने ती अपयशी ठरली. 3 मे 2006 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. महाजन कुटुंबियांची अपरिमित हानी झाली. गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात मोठा राजकीय आधार गळून पडला. भाजपने एक सचोटीचा, कमालीचे संघटनकौशल्य असलेला नेता गमावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.