Gopinath Munde : लोकनेते, जादूची कांडी... अर्थात गोपीनाथ मुंडे

Gopinath Munde Sarkarnama Podcast : भारदस्त आवाज, उपस्थितांची एका झटक्यात मनं जिंकणारी वक्तृत्वशैली आणि त्याला जोड विरोधकांना चिमटे काढण्याच्या अफलातून कलेची. सळसळत्या उत्साहाचे प्रतीक, महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठं, प्रतिष्ठित नाव म्हणजे गोपीनाथ मुंडे.
Gopinath Munde
Gopinath MundeSarkarnama

Gopinath Munde Political Journey : 2004 ची विधानसभा निवडणूक. अंबाजोगाई (जि. बीड) येथे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराची सभा सुरू आहे. भाजपचे काही नेते नाराज झालेले असतात. भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थकांना खात्री असते की जादूची कांडी फिरणार आणि त्या नेत्यांची नाराजी दूर होणार. रात्रीतून चक्रे फिरतात आणि नाराजी दूर झालेली असते. त्यामुळे नेते, कार्यकर्ते उत्साहात असतात. त्यालाच जादूची कांडी म्हणून त्यावेळी ओळखलं जायचं. होय, ही जादूची कांडी होती लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची.

एका चौकटीत बंदिस्त झालेल्या भारतीय जनता पक्षाला बहुजन समाजात रुजवण्यात सर्वात मोठा वाटा गोपीनाथ मुंडे यांचा आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. हे काही आपोआप घडलं नव्हतं, जसं राजकीय वारसा असणार्‍यांच्या बाबतीत घडत. गोपीनाथ मुंडे यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता. सतत केलेला संघर्ष आणि कष्टाच्या बळावर त्यांना लोकनेता होण्यापर्यंत मजल मारता आली होती.

भारदस्त आवाज, उपस्थितांची एका झटक्यात मनं जिंकणारी वक्तृत्वशैली आणि त्याला जोड विरोधकांना चिमटे काढण्याच्या अफलातून कलेची. गोपीनाथ मुंडे हे सळसळत्या उत्साहाचे प्रतीक होते, महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठं, प्रतिष्ठित नाव होतं. त्यांच्या नेतृत्वाला जाती-धर्माच्या मर्यादा नव्हत्या. ते सर्वांनाच आपले नेते वाटायचे. त्यांच्यामुळेच राज्यात भाजप वंचितांमध्ये, बहुजन समाजामध्ये पोहोचला आणि पक्षाचा मोठा विस्तार झाला.

दूरदृष्टी ठेवून त्यांनी यासाठी प्रयत्न केले होते. प्रमोद महाजन यांनी शिवसेनेशी युती करून भाजपच्या विस्ताराची मोठी संधी उपलब्ध करून दिली होती. गोपीनाथ मुंडे यांनी त्या संधीचं सोनं केलं, असं म्हटले तर वावगे ठरू नये. मुंडे एका साधारण कुटुंबातून आले होते. असं असलं तरी लोकांची सेवा करण्यासाठीची त्यांची इच्छा प्रबळ होती. कमी वयातच त्यांची ही इच्छा दिसून आली होती.

Gopinath Munde
Maharashtra Politics : प्रचंड घडामोडी, उलथापालथी, धक्क्यांवर धक्के...

रेणापूर हा गोपीनाथ मुंडे यांचा विधानसभा मतदारसंघात. आपल्या मतदारसंघासह त्यांना अन्य मतदारसंघांतही फिरावं लागायचं. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघात लक्ष घालण्यासाठी तुलनेने कमी वेळ मिळत असे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या मतदारसंघात जोर लावला होता. भाजपसह अन्य पक्षांतील काही नेत्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी मुंडे यांचे प्रयत्न सुरू होते. मुंडे यांचा प्रभाव मोठा होता. नेते, कार्यकर्त्यांना सांभाळण्यात, त्यांची नाराजी दूर करण्यात त्यांचा हातखंडा होता. 2004 ची अवघड वाटणारी विधानसभा निवडणूक मु्ंडे यांनी जादूची कांडी फिरवून जिंकली होती. मतदारसंघात त्यांच्या विरोधात निर्माण करण्यात आलेल्या वातावरणाची त्यांनी हवाच काढून टाकली होती.

गोपीनाथ मुंडे जसे लोकनेते होते, तसे ते माध्यमस्नेहीही होते. मुलाखत असेल किंवा एखाद्या प्रश्नावर त्यांना बोलतं करायचं असेल तर ते सहजपणे उपलब्ध व्हायचे. त्या निवडणुकीत त्यांचे दिवसभर भरगच्च कार्यक्रम असायचे. असे अतानाही ते माध्यमांसाठी वेळ काढायचे. तात्पर्य, माणसे जोडण्याची त्यांची कला अद्भुत होती. सर्वच पक्षांतील नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांच्या मैत्रीचे दाखले आजही दिले जातात. हे दोघे व्यासपीठावर एकत्र येणार म्हटले की लोकांची प्रचंड गर्दी व्हायची. त्यांनी काढलेल्या चिमट्यांमुळे प्रेक्षकांमध्ये हंशा पिकायचा.

Gopinath Munde
KesharKaku kshirsagar : मातब्बर,धाडसी नेत्या; मराठवाड्यातील पहिल्या महिला खासदार केशरकाकू क्षीरसागर

12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नाथरा या गावी गोपीनाथ मुंडे यांचा लिंबाबाई आणि पांडुरंग मुंडे या शेतकरी कुटुंबात जन्म झाला. शेतकऱ्याचे पुत्र ते महाराष्ट्राचे लोकनेते असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. घरात शिक्षणाचं फारसं असं वातावरण नव्हतं. आजूबाजूला पाहून त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं. अंबाजोगाई येथून त्यांनी बी.कॉम. केलं. त्यावेळी प्रमोद महाजन हेही अंबाजोगाई येथेच होते. त्यावेळी ते महाजन यांच्या संपर्कात आले. या काळातच ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सार्वजिनक जीवनात सक्रिय झाले. बी.कॉम.नंतर त्यांनी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली. पुण्यात त्यांची ओळख विलासराव देशमुख यांच्याशी झाली. तेथूनच त्यांची मैत्री बहरली. 'दो हंसों का जोडा' असे विशेषण त्यांच्या मैत्रीला लागले.

प्रमोद महाजन यांच्यामुळे मुंडे यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाच्या विचारांचा पगडा होता. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. तेथून ते राजकारणात सक्रिय झाले. 1971 मध्ये जनसंघातून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या विरोधात मुंडे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. त्यामुळं त्यांची रवानगी नाशिक येथील कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचं अध्यक्षपद मिळालं.

प्रमोद महाजन यांच्या भगिनी प्रज्ञा महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), बीडच्या दोन टर्म खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे या त्यांच्या कन्या. 1978 मध्ये त्यांनी बीड जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यानंतर 1980 मध्ये त्यांनी रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या मतदारसंघात लातूर तालुक्यातील गावांचाही समावेश होता. ते सलग पाचवेळा विधानसभेत पोहोचले.

गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा अमोघ वक्तृत्वशैली आणि त्यांनी वंचितांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळं भाजपचं समर्थन वाढलं आणि राज्यासह देशालाही गोपीनाथ मुंडे यांची दखल घ्यावी लागली होती. तत्पूर्वी, युवा मोर्चाचं अध्यक्षपद मिळालं आणि मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीला जणू कलाटणीच मिळाली. या काळात त्यांनी राज्यभरात दौरे केले. लोकांशी संपर्क वाढवला, कार्यकर्त्यांची फळी उभी केली. 1992 ते 1995 या काळात ते विरोधी पक्षनेते राहिले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द प्रचंड गाजली होती. त्यांनी विविध प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणले होते. एनरॉन प्रकल्पावरून त्यांनी सत्ताधारी काँग्रेसची कोंडी केली होती. दाऊदला फरफटत भारतात आणू. एनरॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू, अशा घोषणा मुंडे यांनी दिल्या होत्या, त्या खूप गाजल्या होत्या.

मुंडे यांनी राज्यव्यापी यात्राही काढली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. खरंतर, मुंडेच्या रूपाने भाजपला पहिल्यांदाच राज्यव्यापी चेहरा मिळाला होता. राज्यात भाजपची सत्ता आणायची असेल तर समविचारी पक्षांशी युती करावी लागेल, हे प्रमोद महाजन यांनी हेरलं होतं. नंतर महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना-भाजप युतीला आकार दिला होता. 1995 च्या निवडणुकीत त्याचं फळ मिळालं. युतीची सत्ता आली. शिवसेनेला जास्त जागा मिळाल्यामुळं मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले. गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं.

या काळात बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे म्हणतील तीच पूर्व दिशा असायची, म्हणजे बीड जिल्ह्याचे एकहाती नेतृत्व त्यांच्याकडं आलं होतं. दोनवेळा त्यांनी भाजपचं प्रदेशाध्यपद भूषवलं होतं. याच काळाच भाजप चौकट तोडून बहुजनांमध्ये, वंचितांमध्ये रुजला. गोपीनाथ मुंडे भाजपमधील एकमेव लोकनेते होते, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे, मी मुंडे साहेबांच्या तालमीत वाढलोय, असं अभिमानाने सांगणारे नेते, कार्यकर्ते आजही गावागावांत आढळून येतात. एकदा संपर्कात आलेला माणूस कायमचा त्यांचा होऊन जायचा. भाजपपासून फटकून वागणारे घटकही मुंडे यांच्या अत्यंत जवळ होते. सर्व समाजांना ते आपले वाटायचे.

Gopinath Munde
Sarkarnama Podcast : प्रमोद महाजनः शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार

2006 मध्ये प्रमोद महाजन यांचं निधन झालं. त्यामुळे राजकीयदृष्ट्या सर्वाधिक नुकसान गोपीनाथ मुंडे यांचं झालं. महाजन यांचा मुंडे यांना मोठा आधार होता. महाजनांच्या निधनानंतर मुंडे एकाकी पडले. काही वर्षांनंतर ते भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. त्या खऱ्या ठरल्या नाहीत. भाजपमध्ये घुसमट होत असल्याचं वक्तव्य गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं. त्यामुळे ते खरंच भाजप सोडणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

याच दरम्यान त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी बंड केलं होतं. खरंतर धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचं बोट धरून राजकारणात आले होते. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच राजकारणात त्यांना संधी मिळत गेली. काकांशी मतभेद झाल्यामुळे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी तो मोठा धक्का होता. गोपीनाथ मुंडे यांनी अनुभवाच्या जोरावर तो धक्का पचवला. राज्याच्या राजकारणात काकांच्या विरोधात झालेले ते दुसरे बंड होते. त्याआधी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती.

परळी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी बंडखोरी केली होती. गोपीनाथ मुंडे यांची कोंडी व्हावी, यासाठी पक्षातील त्यांच्या अंतर्गत विरोधकांनी धनंजय मुंडे यांना साथ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांचं महत्व कमी करण्याचा, त्यांना बाजूला सारून केंद्रात पाठवण्याचं षडयंत्र आखण्यात आलं होतं, अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती. त्यामुळंच मुंडे यांनी भाजपमधून बाहेर पडण्याची तयारी केली होती, असं सांगितले जातं. एेनवेळी सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवानी यांनी मध्यस्थी करून गोपीनाथ मुंडे यांची नाराजी दूर केली होती. भाजपला बहुजन समाजात रुजवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या वाट्याला तो प्रसंग येणं अनपेक्षित होतं. स्वबळावर बंड करण्याइतकी त्यावेळी म्हणजे जवळपास 12 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांची राजकीय ताकद नव्हती, आवाकाही नव्हता. गोपीनाथ मुंडे यांचं खच्चीकरण करण्यासाठी पक्षांतर्गत आणि विरोधकांनी मिळून रचलेला तो डाव होता, असं सांगितलं जात.

Gopinath Munde
Sarkarnama Podcast : प्रमोद महाजनः शिवसेना-भाजप युतीचे शिल्पकार

गोपीनाथ मुंडे हे भाजपचा ओबीसी चेहरा होते, हे खरे असले तरी त्यांना ओबीसींपु्रते मर्यादित करणे हा त्यांच्यावर अन्याय होईल. प्रचंड क्षमता, लोकसंग्रह, दांडगा अभ्यास आदी गुणांचा खजिना असलेल्या गोपीनाथ मुंडे यांना मुख्यमंत्रिपदान मात्र कायमची हुलकावणी दिली. 1995 मध्ये युतीचं सरकार आलं. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मुंडे यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. कारण शिवसेनेचे अधिक उमेदवार निवडून आले होते. केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सत्कार स्वीकारण्यासाठी 3 जून 2014 रोजी ते दिल्ली येथून बीडकडे निघाले होते. दिल्लीत विमानतळाकडे जाताना त्यांच्या कारला अपघात झाला आणि महाराष्ट्राने लोकनेता गमावला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. मुंडे यांच्या मृत्यूने महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक अध्याय संपला होता.

Gopinath Munde
Sarkarnama Podcast : ...अन् काळाने काँग्रेसचा चकाकता तारा हिरावला

धनंजय मुंडे अद्याप राष्ट्रवादीतच आहेत, मात्र शरद पवार यांची साथ सोडून ते अजितदादा पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यांचा पक्ष राज्यात भाजपसोबत सत्तेत आहे. गेली पाच वर्षे राजकीय विजनवास सहन केलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार होत्या. धनंजय मुंडे यावेळी पंकजा यांच्यासोबत होते. मुंडे यांच्या अपघाती मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात आला होता. संशय व्यक्त करणाऱ्यांमध्ये धनंजय मुंडे आघाडीवर होते.

गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन होऊच शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. 'सीबीआय'च्या अहवालात गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं म्हटले आहे, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवावा लागला, मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या चाहत्यांचे समाधान झालेलं नाही, असंही धनंजय मुंडे म्हणाले होते. विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राला, विशेषतः मराठवाड्याला मोठा धक्का बसला होता. त्यांच्यापाठोपाठ त्यांचे मित्र गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला. त्यांना जाऊन आता दहा वर्षं झाली आहेत. त्यावेळेसपासून नेतृत्वाच्या दृष्टीने मराठवाडा पोरकाच राहिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com