Kolhapur Politics: राजकारणामुळे एकेकाळचे जिवलग मित्र बंटी-मुन्ना बनले वैरी...

Satej Pati Vs Dhananjay Mahadik : दोघेही एकमेकांचं राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात...
Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Satej Pati Vs Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

एकेकाळचे कट्टर मित्र असलेले, अनेकांना जेरीस आणलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे आता कट्टर राजकीय शत्रू आहेत. सतेज पाटील आणि महाडिक गटासाठी प्रत्येक निवडणूक हे एक युद्धाप्रमाणे आहे. त्यामुळे राजकारणातून कोण संपणार, कोण तरणार हे येत्या काळात स्पष्ट दिसेल...

आधी मैत्री, पण राजकारणामुळं आलं शत्रुत्व

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील गट हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यांच्यातील राजकीय वैर हे अत्यंत टोकाचं बनलं आहे. काही वेळेस या दोन गटांची मजल एकमेकांच्या जिवावर उठण्यापर्यंत गेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षाचा रक्तरंजित इतिहास आजही कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला माहीत आहे. पण हेच महाडिक आणि पाटील एकेकाळी जिवलग मित्र होते. शैक्षणिक आयुष्यापासून ते राजकारणाच्या सुरुवातीपर्यंत यांची मैत्री डोळे दीपावणारी होती. पण राजकारणामुळे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला. दोघांच्यात दरी निर्माण झाली. ते आजपर्यंत दोघेही एकमेकांचं राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील नेते म्हणून खासदार धनंजय महाडिक यांचे चुलते महादेवराव महाडिक यांची ओळख होती. गोकुळ दूध संघ, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा बँक, राजाराम कारखाना, विधान परिषद सदस्य अशा सत्ताकेंद्रांत असताना जिल्ह्यात त्यांची एक वेगळी धमक निर्माण झाली होती. जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्यासोबत एकत्र होते. आमदार सतेज पाटील हे त्यावेळी कार्यकर्ता म्हणून त्यांच्याच मुशीत घडले. तिथूनच त्यांची धनंजय महाडिक यांच्यासोबत घट्ट मैत्री झाली.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत बंटी (सतेज पाटील), मुन्ना (धनंजय महाडिक) जोडीने राष्ट्रवादीचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांना अक्षरशः जेरीस आणले होते. खासदार मंडलिक यांच्याकडून अवघ्या काही मतांनी धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्याविरोधात महादेवराव महाडिक यांनी सतेज पाटील यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवले. बंटी आणि मुन्ना यांनी या निवडणुकीत बाजी मारली. खानविलकर यांच्याविरोधात सतेज पाटील विजयी झाले. महाडिक यांनी कधीही पक्ष महत्त्वाचा मानला नाही. ते नेहमी आपले कार्यकर्ते आणि गटाला महत्त्व देतात, असं आजही सांगितलं जातं.

Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Chhagan Bhujbal: शिवसेना का सोडली? भुजबळांनी सांगितलं कारण; मी फक्त...

पहिली ठिणगी पडली..

महाडिक गटाचं राजकारण हे गटकेंद्रित राहिलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार असले तरी महादेवराव महाडिकांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून महापालिकेत आपला वेगळा गट कायम ठेवला. सुरुवातीला अपक्ष असलेल्या सतेज पाटलांना पुढच्या निवडणुकीत काँग्रेसनं तिकीट दिलं. त्यावेळेपासून सतेज पाटलांनी पक्षीय राजकारण सुरू केलं. त्यातून ताराराणी आघाडीत नगरसेवकांच्या उमेदवारीवरून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात पहिली ठिणगी पडली.

महाडिकांना तिकीट नाकारलं...

2009 च्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीनं धनंजय महाडिकांना तिकीट नाकारलं. राष्ट्रवादीने महाडिकांऐवजी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या महाडिक यांनी अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांना मदत करत वचपा काढला. त्यावेळी सतेज पाटलांनी आपली भूमिका कायम ठेवत संभाजीराजेंना मदत केली. ही दुसरी ठिणगी होती. महादेवराव महाडिक यांच्या विचारांशी फारकत घेऊन सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून आपलं राजकारण सुरू ठेवलं. स्वतंत्र गट तयार करत महाडिक यांना आव्हान दिलं.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसने सतेज पाटील यांना उमेदवारी दिली, तर महादेवराव महाडिक यांनी अपक्ष म्हणून त्यांचे पुतणे धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवलं. त्यावेळी धनंजय महाडिक यांना अवघ्या काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला. या ठिकाणी पडली होती तिसरी ठिणगी.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सुरू झालेला वाद गोकुळपर्यंत पोहोचला. गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांच्या मदतीने महाडिकांना आव्हान दिलं. गोकुळ म्हणजे महाडिकांच्या राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र. त्याचं महत्त्व ओळखून सतेज पाटलांनी राजकारणाचे फासे टाकायला सुरुवात केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्राला बंटी-मुन्ना यांच्या जोडीने धूळ चारली...

2014 च्या निवडणुकीत मात्र केंद्रीयस्तरावर राजकारण वेगळंच घडत होतं. केंद्रीय पातळीवर नरेंद्र मोदी नावाचं वादळ घोंघावत होतं. मोदीलाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेतून हद्दपार होणार, हे चित्र स्पष्ट होतं. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. त्यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याकडे आघाडीधर्म पाळण्याशिवाय पर्याय नव्हता. हसन मुश्रीफ यांच्या मदतीने महाडिक आणि सतेज पाटील यांची समेट घडवून आणला. लोकसभेला सतेज पाटील मदत करतील आणि विधानसभेला धनंजय महाडिक मदत करतील अशी अट त्यावेळी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. दोघांनी पुन्हा मोदीलाटेत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणला. केंद्रालादेखील बंटी आणि मुन्ना यांच्या जोडीने धूळ चारली.

सतेज पाटलांचा पराभव...

2014 च्या विधानसभा निवडणुकीत महाडिक यांनीआपल्याला मदत केली नसल्याचं सतेज पाटलांनी जाहीरपणे सभेत सांगितलं. तिथून पुन्हा यांच्यात राजकीय वैर सुरू झालं. राज्यातील विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांशी जवळीक असलेल्या सतेज पाटलांचं जिल्ह्यात वाढतं प्रस्थ अनेकांना खुपत होतं. त्यातही सतेज पाटील राज्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेला साताऱ्यातील राजकारणातील हस्तक्षेप राष्ट्रवादीला पचला नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून राष्ट्रवादीने आपला उमेदवारच दिला नाही. राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या धनंजय महाडिकांचे भाऊ अमल महाडिक हे भाजपकडून सतेज पाटलांच्याविरोधात मैदानात उतरले. त्या ठिकाणी सतेज पाटलांना पराभव स्वीकारावा लागला.

महाडिक गटासाठी मोठा धक्का...

सतेज पाटलांना हा पराभव प्रचंड जिव्हारी लागला होता. त्यामुळे आता महाडिकांना राजकारणातून संपवायचंच, असा त्यांनी चंग बांधला. त्यांनी पहिला घाव महादेवराव महाडिकांवर घातला. विधान परिषदेच्या निवडणुकीत महादेवराव महाडिक यांच्याविरोधात सतेज पाटलांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि विजय मिळवला. 2019 च्या लोकसभेत त्यांनी आपलं ठरलंय, म्हणत आघाडी धर्म फाट्यावर मारला आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना विजयी करून धनंजय महाडिक यांचा वचपा काढला. त्यानंतरच्या 2019 च्या विधानसभेत दक्षिण कोल्हापूरमधून सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिकांचा पराभव केला. सतेज पाटलांनी कोल्हापूर महापालिकाही महाडिकांच्या ताब्यातून काढून घेतली. हसन मुश्रीफ यांच्या मदतीने जिल्हा बँकही ताब्यात घेतली. दरम्यान, महाडिक यांचं जिल्ह्यातील राजकारणातील केंद्रस्थान असलेलं गोकुळ दूध संघही सतेज पाटील यांनी ताब्यात घेतलं. महाडिक गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता.

भाजपच्या मदतीने नवसंजीवनी..

आमदार सतेज पाटील यांनीएकामागून एक महाडिक यांचे गड ताब्यात घेतले. जिल्ह्याच्या राजकारणातून महाडिक गट संपला, अशी चर्चा सुरू झाली. एकापाठोपाठ महादेवराव महाडिक, अमल महाडिक, धनंजय महाडिक यांना पराभव पत्करावा लागला. शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद सोडावं लागलं. पण त्यातूनच महाडिक कुटुंबाला भाजपच्या मदतीने नवसंजीवनी मिळाली. राज्यसभेवर धनंजय महाडिक यांना उमेदवारी मिळाली. त्यात ते विजयी झाले.

प्रत्येक निवडणूक ही एक युद्धाप्रमाणे..

सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील वाद इथेच थांबला नाही तर त्यांचा हा वाद राजाराम कारखान्यापर्यंत येऊन पोहोचला. हा एकमेव कारखाना महाडिक यांच्या ताब्यात होता. हादेखील सतेज पाटील यांनी ताब्यात घेण्याचा चंग बांधला, मात्र त्यात अपयश आले. एकेकाळचे कट्टर मित्र असलेले, अनेकांना जेरीस आणलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे आता कट्टर राजकीय शत्रू आहेत. सतेज पाटील आणि महाडिक गटासाठी प्रत्येक निवडणूक ही एक युद्धाप्रमाणे आहे. त्यामुळे राजकारणातून कोण संपणार, कोण तरणार हे येत्या काळात स्पष्ट दिसेल.

Satej Pati Vs Dhananjay Mahadik
Ambadas Danve: दानवेंच्या मुलाच्या लग्नात ठाकरे-शिंदे-फडणवीसांचे एकला चलो रे...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com