Sarkarnama Podcast : असा झाला सुरेशदादा जैन यांचा राजकीय अस्त

Nashik Constituency : लोकप्रिय नेते सुरेशदादा जैन यांची राजकीय कारकीर्द घरकुल घोटाळ्यामुळे संपुष्टात आली. राज्यमंत्री राहिलेल्या सुरेशदादा जैन यांची राजकीय कारकीर्द घरकुल घोटाळ्यामुळं संपुष्टात आली. हा घरकुल घोटाळा देशभरात गाजला होता.
Suresh Jain
Suresh Jain Sarkarnama

Suresh Jain : जळगाव शहर आणि सुरेशदादा जैन हे एक राजकीय समीकरणच आहे. त्याचबरोबर सामाजिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील कामकाजाच्या कल्पना अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या व्यवस्थेचे जनक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. जळगाव हे शहर आज एक व्यावसायिक शहर बनलं आहे. सोन्याची बाजारपेठ, कापसाचे बाजार केंद्र आणि डाळिंबाची निर्यात, केळीचे जागतिक उत्पादन केंद्र अशी या शहराची ख्याती आहे. या शहराला आणखी एक जोड मिळाली आहे, ती म्हणजे सुरेशदादा जैन यांचं नेतृत्व.

या शहराच्या गेल्या पन्नास वर्षांच्या वाटचालीत अनेक बदल आणि विकासाचे टप्पे पाहायला मिळतात. या सर्व टप्प्यांवर जे नाव जोडलं जातं, ते आहे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचं. त्यांना एक चूक भोवली. तरुण आयएएस अधिकाऱ्याने ती हेरली आणि सुरेशदादा जैन यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागलं. सलग सात वेळा आमदार, नऊ वेळा नगराध्यक्ष आणि एकदा राज्यमंत्री राहिलेल्या सुरेशदादा जैन यांची राजकीय कारकीर्द घरकुल घोटाळ्यामुळं संपुष्टात आली. हा घरकुल घोटाळा देशभरात गाजला होता.

तरुण आयएएस अधिकारी, जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम Pravin Gedam यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. डॉ. गेडाम यांनी 2005-06 मध्ये या प्रकरणाचा एफआयआर स्वतः लिहिला होता. तो त्यांनी पोलिस ठाण्यात दाखल केला. त्यावर त्यांचीच सही होती. त्याकाळी गाजलेल्या टूजी घोटाळ्यातील आरोपींना जामीन मिळाला होता, मात्र घरकुल घोटाळ्यात सुरेशदादा जैन यांना अनेक वर्षं जामीन मिळाला नव्हता. जळगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून धडाडीचे आयपीएस अधिकारी इशू सिंधू रुजू झाले. इशू सिंधू यांच्या आधी दहा पोलिस Police अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला होता, मात्र तपासात चालढकलच करण्यात आली होती. इशू सिंधू यांनी हे प्रकरण तडीस नेले.

सुरेश जैन हे जळगाव jalgaon शहराचे सलग सात वेळा आमदार होते. या कालावधीत त्यांनी चार वेळा पक्षांतर केलं. मात्र या प्रत्येक वेळी जळगावकरांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. 1980 मध्ये ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एस काँग्रेसचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा आमदार झाले. 1985 आणि 1990 या निवडणुकाही त्यांनी याच पक्षाच्या चिन्हावर लढविल्या आणि आमदार झाले. 1995 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी त्यांनी अपक्ष उमेदवार डॉ. अशोक भंगाळे Ashok Bhangale यांचा पराभव केला होता. 1997 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना-भाजप Shivsena BJP युती सरकारमध्ये ते गृहनिर्माण मंत्री झाले. 2002 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2004 च्या पोटनिवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले. एस काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. घरकुल योजना जळगाव नगरपालिका अशताना राबवण्यात आली होती. त्यात 29 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आढळले होते. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना स्वस्त दरात चांगली घरे मिळावीत, यासाठी ही योजना राबवण्यात आली होती. पिंप्राळा, तांबापुरा, समतानगर आणि मेहरुण येथे 11 हजार घरकुलांचे बांधकाम 1999९ मध्ये सुरू करण्यात आले होते. यासाठी जळगाव नगरपालिकेना 141 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. योजना राबवताना काँट्रॅक्टर आणि बिल्डरना फायदा होईल, असे विविध ठराव नगरपालिकेने केले होते. हे प्रकार 2001 मध्ये समोर आले. कायद्याचे उल्लंघन, अनियमितता, मनमानी निर्णय आणि त्यामुळे गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. ज्या जागेवर घरकुलांचे बांधकाम करण्यात आले, ती जागा पालिकेची नव्हती. बांधकामासाठी जागेचा अकृषी परवाना घेण्यात आला नव्हता. सताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना 29 कोटी रुपये बिनव्याजी, आगाऊ दिले होते. त्यांना विविध सवलतीही देण्यात आल्या होत्या. काम पूर्ण करण्याची मुदतही गुत्तेदारांनी पाळली नव्हती. असे असतानाही सत्ताधाऱ्यांनी या गुत्तेदारांवर कारवाई केली नव्हती.


(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्तेवर आलेल्या शिवसेना -भाजप युती सरकारच्या कामकाजाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केलं होतं. हजारे यांनी युती सरकारच्या विविध घोटाळ्यांच्या तपासासाठी आंदोलन केलं. या संदर्भात न्यायालयातदेखील काही खटले दाखल झाले. अण्णा हजारे यांनी आरोप केलेल्या सहा मंत्र्यांमध्ये सुरेश जैन यांचा देखील समावेश होता. त्यामुळे जैन चांगलेच अडचणीत आले होते. 1999 मध्ये राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले. या कालावधीत जैन हेदेखील मंत्रिपदावरून पायउतार झाले. मात्र अण्णा हजारे यांना या खटल्याला दीर्घकाळ सामोरे जावे लागले. यात त्यांनी हजारे यांच्यावर मात केली होती.

सुरेश जैन यांनी आपल्या विधिमंडळ कारकिर्दीची सुरुवात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एस काँग्रेस पक्षातून केली. 1980 मध्ये त्यांनी जळगाव मतदारसंघातून जनसंघाचे गजानन जोशी यांचा पराभव करून विधिमंडळात प्रवेश केला. त्यानंतर सलग सात वेळा ते जळगावचे आमदार झाले. जैन यांची विकासकामे कोणती? याबाबत अनेक मतभेद असू शकतात, मात्र जळगावच्या नागरिकांमधील त्यांची लोकप्रियता विशेष होती. त्यांना मिळणारे मताधिक्क्य कमी कमी होत गेल्याचं दिसतं. पहिल्या निवडणुकीत 24,500 मताधिक्यानं विजयी झालेले जैन शेवटच्या निवडणुकीत अवघ्या अडीच हजार मतांनी निवडून आले होते. मात्र या सबंध प्रवासात ते महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते बनले होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय होते, त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यादेखील ते जवळचे सहकारी होते. त्यांची ही लोकप्रियता, प्रत्येक व्यक्ती आणि कामावर प्रभाव टाकण्याची कला त्यांना राज्याच्या राजकारणात शीर्षस्थानी घेऊन गेली.

Suresh Jain
Lok Sabha Election 2024 : शिंदेंचे 'शिवदूत' निवडणुकीत फडकवणार का विजयी पताका?

सुरेशदादा जैन सलग नऊ वर्षे जळगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. जैन यांनी कार्यभार स्वीकारला तेव्हा नगरपालिकेची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट होती. विकासकामांची तरतूद, प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठीही पैसा नव्हता. यातून नगरपालिकेला बाहेर काढण्यासाठी जैन यांनी एक नवीन संकल्पना पुढे आणली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच जळगाव नगरपालिकेने बीओटी (बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) तत्त्वावर प्रकल्पाची उभारणी केली. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर त्यांनी शहरातील जवळपास 42 भूखंडांचा विकास केला. त्यातून व्यावसायिक इमारती, नगरपालिकेची इमारत, रस्ते, रुग्णालये, शाळा असे अनेक प्रकल्प उभे राहिले. या कालावधीत जवळपास 4400 गाळे बांधण्यात आले. त्या माध्यमातून शहरातील युवकांना रोजगार मिळाला. त्यामुळे सुरशेदादा जैन हे शहरात लोकप्रिय झाले.

त्यापूर्वी बेरोजगार आणि विकासापासून वंचित असलेले शहर, अशी जळगावची ओळख होती. या शहरात अनेकदा दंगली झाल्याच्याही नोंदी आढळतात. एका दंगलीनंतर पाहणीसाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी येऊन गेल्या होत्या, असे लोक सांगतात. बीओटी प्रकल्पानंतर शहराच्या विकासाला चालना मिळाली. जैन यांनी झोपडपट्टी निर्मूलन योजना राबवली. त्यात चार गृहनिर्माण योजना केल्या. त्यामुळे या शहराचे बकाल स्वरूप लयाला जाऊन एक सुनियोजित शहर असे स्वरूप प्राप्त झाले. या योजनांमुळे जैन हे जळगाव शहरात लोकप्रिय नेते म्हणून प्रस्थापित झाले होते.

Suresh Jain
Lok Sabha Election 2024 : भाजपवर नाराज असलेली मुस्लिम व्होट बँक ठाकरेंच्या पथ्यावर पडणार का? अशी आहे राजकीय समीकरणं

जळगाव नगरपालिकेचे रूपांतर 2003 मध्ये महापालिकेत झाले. त्यावेळी महापालिकेचे पहिले आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जैन यांच्या घरकुल प्रकरणाची चौकशी केली. त्यांनी याबाबत सादर केलेल्या अहवालात घरकुल प्रकरणांमध्ये शंभर जणांना दोषी ठरवत 29 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला होता. याबाबतचा अहवाल त्यांनी 2006 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सादर केला. त्यावरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यामध्ये माजी राज्यमंत्री जैन, मंत्री गुलाबराव देवकर हे प्रमुख संशयित होते. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जैन यांना अटक केली. प्रदीर्घ काळ चाललेल्या खटल्यात न्यायालयाने जैन यांना दोषी ठरवून सात वर्षे शिक्षा आणि शंभर कोटींचा दंड ठोठावला. हे प्रकरण जैन यांच्या राजकीय आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टात आली. घरकुल घोटाळ्यामुळे जैन यांना धक्कादायक प्रसंगांना सामोरे जावे लागले. आता शिक्षा भोगल्यानंतर ते बाहेर आले आहेत. शंभर कोटींच्या दंडाची प्रक्रिया अद्यापही प्रलंबित आहे.

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार 1995 मध्ये सत्तेत आले. त्यानंतर जळगावच्या राजकारणात देखील बदल होऊ लागले होते. एकनाथ खडसे हे युतीच्या सरकारमधील मंत्री झाले. पुढील कालावधीत जळगावच्या राजकारणात जैन विरुद्ध खडसे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत निखिल एकनाथ खडसे विरुद्ध मनीष ईश्वरलाल जैन ही निवडणूक त्याकाळी गाजली. काँग्रेसच्या जैन यांना सुरेशदादा यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे खडसे आणि जैन यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक टोकदार झाला. या निवडणुकीत निखिल खडसे यांचा झालेला पराभव एकनाथ खडसे यांच्या जिव्हारी लागला होता.

सुरेशदादा जैन नऊ वेळा जळगावचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी विधिमंडळात प्रवेश केला. जवळपास 35 वर्षं त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका आणि महापालिका असताना जळगावमध्ये एकछत्री अंमल होता. सर्व गटांच्या नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी वाटचाल केली. यामध्ये सर्व समाजघटकांचे प्रतिनिधी होते. प्रदीप रायसोनी, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अशोक सपकाळे, पांडुरंग उर्फ बंडू काळे, शिवचरण दिंडोरे आदी त्यात प्रमुख होते. जळगाव आज एक व्यापारी शहर झाले आहे. विशेषतः सोन्याची बाजारपेठ म्हणूनदेखील या शहराचा नावलौकिक झाला आहे. त्याचे काही प्रमाणात श्रेय सुरेश जैन यांनी चौकटीबाहेर जाऊन केलेला विकासाचा विचाराला जाते. शहरातील जवळपास 24 भूखंड विकसित करून त्यांनी नगरपालिकेच्या मालकीची व्यापारी संकुले उभारली. साडेचार हजारांहून अधिक व्यावसायिक संस्था त्यात निर्माण झाल्या. हजारो युवकांना रोजगार तर मिळालाच, परंतु व्यापार उदीमला मोठी चालना मिळाली. त्यामुळे या शहराची एक नवी प्रतिमा निर्माण होऊ शकली.

महापालिकेचा स्वमालिकीची सतरा मजली इमारत उभारण्याची कल्पनादेखील त्यांचीच होती. ही इमारत बांधण्यात आली तेव्हा अनेकांनी त्यांच्या कारभाराचे कौतुक केले. या वेळी काही टीकाकारही होते. विशेषत: जैन यांच्या विविध कामकाजाला आणि योजनांना विरोध करण्यात एकनाथ खडसे आघाडीवर होते. त्यांनी विधिमंडळात तसेच विधिमंडळाबाहेर सातत्याने जैन यांच्या विरोधात आवाज उठविला. जळगाव नगरपालिकेच्या अनेक योजनांबाबत खडसे यांनी विधिमंडळात लक्षवेधीद्वारे राज्य शासनाचे लक्ष वेधले होते.

Suresh Jain
Devendra Fadnavis : मतदानाची टक्केवारी घसरली; बाहेर निघा, मतदान करा फडणवीसांची हाक !

जैन यांच्या यशस्वी योजनांमध्ये, वाघूर धरणातून शहराला पाणीपुरवठा योजना आहे. त्यांनी केलेल्या या योजनेतून जळगाव शहराचा पुढील तीन दशकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणे ही त्यांची दूरदृष्टी होती. जैन अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी असूनही सबंध जळगावचा पाठिंबा मिळविण्यात ते यशस्वी झाले होते. त्याचे मुख्य कारण सत्तेबरोबर राहून विकासासाठी काम करताना राजकीय पक्षापेक्षा व्यवस्था आणि व्यक्तीला महत्त्व देण्याचे त्यांचे धोरण होते. त्यामुळेच नगरपालिका आणि नंतरच्या महापालिकेत 90 टक्के नगरसेवक त्यांच्यासोबत असल्याचे दिसून येते. जळगाव शहराच्या विकासाच्या आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना बरोबर घेण्याच्या त्यांच्या या कौशल्यावर त्यांचे राजकारण आणि जळगावची वाटचाल दोन्हीही पुढे पुढे जात राहिले. मात्र, घरकुल घोटाळ्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com