Rajiv Satav : ...अन् काळाने काँग्रेसचा चकाकता तारा हिरावला

Rajiv Satav Sarkarnama Podcast : राजीव सातव नव्या पिढीतील सभ्य, आश्वासक चेहरा होते. यांनी कमी वेळेत कळमनुरी ते दिल्ली अशी मजल मारली होती. काँग्रेस पक्ष संघटनेतील एक चकाकता तारा कोरोनाने हिरावून घेतला होता. संकटाच्या काळातून मार्गक्रमण करत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का होता.
Sarkarnama Podcast
Sarkarnama PodcastSarkarnama

Sarkarnama Podcast : तो काळ होता कोरोना महामारीचा. जगासह देशभरात या महामारीनं थैमान घातलं होतं. मनात धडकी भरवणाऱ्या बातम्या रोजच येत होत्या. कोरोनानं अनेकांच्या जीवलगांना मरणाच्या दाढेत नेलं होतं. अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनाही कोरोनानं आपल्यातून हिरावून नेलं. त्या काळात राज्यातील काँग्रेसजनांचा जीवही टांगणीला लागला होता. काँग्रेसच्या एक तरुण, उमद्या नेत्यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला. त्यामुळे काँग्रेसजनांसह त्यांच्या समर्थकांचाही जीव भांड्यात पडला. पण दुर्दैवाने हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. गुंतागुंत वाढली आणि त्यांचं निधन झालं. राजीव सातव... काँग्रेसचे निष्ठावंत, राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. राजीव सातव यांचं 16 मे 2021 रोजी निधन झालं. काँग्रेस पक्ष संघटनेतील एक चकाकता तारा कोरोनाने हिरावून घेतला होता. संकटाच्या काळातून मार्गक्रमण करत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का होता.

राजीव सातव हे नव्या पिढीतील सभ्य, संवेदनशील नेते होते. अगदी अल्प कालावधीत त्यांनी दिल्लीत जम बसवला होता. त्यामुळे देशाच्या राजकरणात त्यांचं नाव झालं होतं. घरात राजकीय वारसा असतानाही त्यांनी आपल्या राजकारणाची सुरवात पंचायत समितीपासून केली. त्यामुळे तळागाळातील नागरिकांचे प्रश्न काय आहेत, ते सोडवण्यासाठी काय करावं लागतं, याची जाणीव त्यांना होती. दिल्लीत गेल्यानंतर वरिष्ठ नेते आणि लोकांमधला ते दुवा बनले. तेथे त्यांनी कामाची गती वाढवली. या गुणांमुळे ते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे निकटवर्तीय, त्यांचे मित्र बनले. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्याही ते संपर्कात आले. त्यांचीशीही सातव यांचे चांगले संबंध निर्माण झाले. जमिनीवर काय परिस्थिती आहे, याची माहिती सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांना राजीव सातव यांच्याकडून मिळू लागली.

Sarkarnama Podcast
Udayanraje Beed Sabha : गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी उदयनराजे गहिवरले...पंकजांच्या अश्रूंचा बांध फुटला!

राजीव सातव (Rajiv Satav) यांची प्रकृती 19 एप्रिल 2021 पासून बिघडली होती. त्यांना कोरोनाची लक्षणं दिसत होती. त्यांनी चाचणी केली आणि दुसऱ्या दिवशी 22 एप्रिल रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवला आला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना पुण्यातील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच 25 एप्रिलला पुन्हा ती खालावली. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं, जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यांनी कोरोनोवर मात केली, असं वाटत असतानाच पुन्हा गुंतागुंत वाढली. काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केलेल्या राजीव सातव यांच्या शरीरात सायटोमेगॅलो हा व्हायरस आढळून आला होता आणि संपूर्ण शरीरात या व्हायरसचा संसर्ग झाला होता. डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही. 16 मे 2021 रोजी राजीव सातव यांनी वयाच्या 47 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हा त्यांच्या कुटुंबीयांसह काँग्रेस पक्ष, राहुल गांधी आणि मराठवाड्याच्या राजकारणासाठी मोठा धक्का होता.

राजकीय नेत्यांच्या अकाली निधनाचे मोठे धक्के गेल्या काही वर्षांत मराठवाड्याला सहन करावे लागले आहेत. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं 2012 मध्ये निधन झालं. त्यानंतर 2014 मध्ये भाजपचे नेते, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या निधनानं मराठवाड्याला आणखी एक जबर धक्का बसला. हे चेहरे मराठवाड्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातील आश्वासक चेहरे होते. सर्व जाती-धर्मांतील लोकांना त्यांचा मोठा आधार होता. त्यापाठोपाठ राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्याची मोठी हानी झाली. राजीव सातव यांनाही मराठवाड्यापुरते मर्यादित करता येणार नाही. पक्षसंघटनेत त्यांनी मोठी मजल मारली होती. राहुल गांधी यांच्या ते अत्यंत जवळ गेले होते. असं म्हटलं जातं, की सोनिया गांधी यांच्यासाठी अहमद पटेल यांचं जसं स्थान होतं, तसंच स्थान राजीव सातव यांचं राहुल गांधी यांच्यासाठी होतं.

Sarkarnama Podcast
Nana Patole On Narendra Modi : शरद पवारांवरील टीका नानांच्या जिव्हारी; पंतप्रधान मोदींचा घेतला समाचार...

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या राजीव सातव यांचा राजकीय प्रवास पंचायत समितीपासून सुरू झाला होता. पुढे आमदार, खासदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदी जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पार पाडल्या. 21 सप्टेंबर 1974 रोजी मसोड (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे त्यांचा जन्म झाला. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण केलं. पुण्यातीलच आयएलएस लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. आक्रमक असले तरी त्यांनी नेहमी भाषेची मर्यादा जपली. टीका करतानाही त्यांनी कधी मर्यादा सोडली नाही. साधी राहणी, उच्च विचारसरणी, पक्षसंघटनेसाठी झटण्याची वृत्ती आदी कारणांमुळं त्यांनी पक्षात स्वतःचं एक वेगळं आणि भक्कम स्थान निर्माण केलं होतं. याच गुणांच्या बळावर ते राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळ गेले. 2014 ला मोदी लाट होती. तशा लाटेतही राजीव सातव हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

राजीव यांच्या मातोश्री रजनी शंकरराव सातव (Rajani Satav) या राजकारणात होत्या. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. एकदा त्या विधानपरिषदेवर निवडून गेल्या होत्या. त्या जवळपास 40 वर्षं काँग्रेस पक्षसंघटनेत सक्रिय होत्या. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांचं निधन झाल. राजकारणाचा, काँग्रेसच्या विचारांचा वारसा राजीव सातव यांना आईकडूनच मिळाला होता. राजीव सातव यांचं निधन झालं त्यावेळी ते राज्यसभेवर होते. काँग्रेसचे गुजरात प्रभारी, पक्षाच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक होते. ते दिल्लीतील महाराष्ट्राचा सर्वात तरुण, आश्वासक चेहरा होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजीव सातव यांना थेट विधानसभा, लोकसभा निवडणुकीतून राजकारणाची सुरुवात करता आली असती, मात्र त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी पंचायत समिती सदस्यपदापासून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. 2009 मध्ये त्यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यापूर्वी सलग दोन टर्म हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवत सातव यांनी शिवसेनेकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला होता. 2010 मध्ये युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी हिंगोली मतदाररसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. 2014 ला मोदी लाट होती. त्या लाटेत काँग्रेससह अन्य विरोधा पक्षांची धूळधान उडाली होती. अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. राजीव सातव यांनी मात्र अशा मोदी लाटेतही हिंगोली मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांचा पराभव केला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते, त्यापैकी एक सातव. त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. 2020 मध्ये त्यांना काँग्रेसनं राज्यसभेवर संधी दिली होती.

2019 ची लोकसभा निवडणूक मात्र त्यांनी लढवली नाही. विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसला राजीव सातव यांच्या सारख्या अनुभवी, आश्वासक चेहऱ्यांची गरज होती. राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून विरोध होईल, अशी शक्यता त्यांना वाटली. त्यांचा स्वभाव सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा होता. तरीही त्यांनी राज्यात अधिक रस दाखवला नाही. या निवडणुकीत त्यांचा हिंगोली मतदारसंघ विरोधकांनी जिंकला. 2019 च्या त्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली होती. गुजरातेत लक्षणीय कामगिरी करूनही त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. राजीव सातव यांच्याकडं सातत्यानं राष्ट्रीय स्तरावरील जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यामुळं कदाचित महाराष्ट्रातील जबाबदारी त्यांनी मिळाली नसावी. त्यावेळी राज्यात काँग्रेसकडे दिग्गज नेते होते. सातव यांचं वय त्यांच्यापेक्षा कमी होतं. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या तुलनेत त्यांच्याकडं अनुभवही कमी होता. त्यामुळे त्यांनीही राज्यात येण्याचा विचार केला नसावा.

Sarkarnama Podcast
Rahul Shewale News : राहुल शेवाळेंविरोधात तक्रार देणाऱ्या महिलेला जामीन, ऐन निवडणुकीतच शेवाळेंची उडणार झोप?

2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राजीव सातव हे काँग्रेसचे गुजरात प्रभारी होते. त्यावेळी काँग्रेस सत्तेच्या जवळ पोहोचली होती. भाजपला 99 तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातेत काँग्रेसला मोठं यश मिळवून देण्यात राजीव सातव यांची भूमिका महत्वाची होती. 2012 च्या निवडणुकीत गुजरातेत काँग्रेसला फक्त 57 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 119 जागा मिळाल्या होत्या. 2017 मध्ये तिकीटवाटपात आणखी थोडी काळजी घेतली गेली असती तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात अजूनही होत असते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत गुजरातेत काँग्रेसची मोठी पीछेहाट झाली. काँग्रेसच्या जागा 80 वरून थेट 17 वर आल्या. भाजपला 156 जागा मिळाल्या. या निवडणुकीत काँग्रेसला राजीव सातव यांची कमतरता नक्कीच भासली असणार. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला राजीव सातव यांची उणीव भासणार, असे भाकीत त्यांच्या निधनानंतर काही राजकीय विश्लेषकांनी केलं होतं आणि झालंही तसंच. राजीव सातव हयात असते तर कदाचित आज ते काँग्रेसमधील ओबीसी चेहरा म्हणून आणखी पुढे आले असते. काँग्रेसला त्यांचा मोठा फायदा झाला असता. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसनं त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्या काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षही आहेत.

राज्यात गेल्या काही वर्षांपासून जो काही गोंधळ सुरू आहे, जी काही उथळ टीका, उथळ शेरेबाजी सुरू आहे, घाऊक पक्षांतरं सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर राजीव सातव यांच्यासारख्या शांत, संयमी आणि निष्ठावंत नेत्याची कमतरता भासत आहे. असे नेते आता नाहीत, असे नाही, मात्र राजीव सातव या सगळ्यांत उठून दिसले असते. त्यांचे हे गुण हेरूनच काँग्रेसनं त्यांच्यावर विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवत त्यांच्यावर मोठी गुंतवणूक केली होती, मात्र दुर्दैवानं त्यांचं अकाली निधन झालं. राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा शोकसंदेश त्यांचं महत्व आणि उपयुक्तता अधोरेखित करणारा होता. राजीव सातव हे काँग्रेसचे 'अ‍ॅसेट' होते. मोठी स्वप्नं पाहायची, मोठी कामं कशी करायची, याचे धडे त्यांनी युवक काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांना दिले, असे खर्गे म्हणाले होते. राहुल गांधी यांचा शोकसंदेशही अशाच अर्थाचा होता. मित्र राजीव सातव यांना गमावल्याचं दुःख मोठं आहे. ते प्रचंड क्षमता असलेले, काँग्रेसची विचारसरणी जगणारे नेते होते, असं राहुल गांधी म्हणाले होते. आयुष्याची उणीपुरी 47 वर्षं वाट्याला आलेल्या राजीव सातव यांनी पक्षातील नेते आणि नेत्यांच्या मनातही आपलं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनानं काँग्रेसची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

Sarkarnama Podcast
Lok Sabha Election : 'शिवाजी पार्क' एक अन् दावेदार अनेक; कुणाला मिळणार मैदान?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com