Mumbai News : शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार आणि दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्याविरोधात बलात्काराचा गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला कोर्टाने दिलासा दिला आहे. या महिलेला हायकोर्टाने काही अटींवर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मुंबईत प्रचाराचा धडाक सुरू असतानाच या महिलेला जामीन मिळाला आहे. त्यात या महिलेविरोधात राहुल आणि त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिस तपास करणार आहेत. या तपासात सहकार्य करण्याचा आदेश हायकोर्टने दिला आहे.
ही महिला पुढच्या दोन दिवसांत गोवंडी आणि साकीनाका पोलिस (Sakinaka Police Station) स्टेशनला हजर राहणार आहे. निवडणुकीच्या काळात महिलेला जामीन आणि पोलिसांकडे तपास होणार असल्याने राहुल शेवाळेंविरोधात राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यापलीकडे जामिनामुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच ही महिला मुंबईत येणार असल्याने राहुल शेवाळेंची झोप उडू शकते. दुसरीकडे, ही महिला काही मंडळींना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ती मंडळी विरोधी बाकांवरची असू शकते; त्यामुळेही राहुल शेवाळेंविरोधात पुन्हा रान उठवले जाण्याची भीती आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महिलेविरोधात साकीनाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये हा जामीन मिळाला आहे. तसेच गोवंडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्येही त्यांच्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत (Loksabha Election 2024) हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राहुल शेवाळेंविरोधातील महिलेची तक्रार पुढे येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावरून विरोधकांनी शेवाळेंची कोंडी केली होती. या प्रकरणात संबंधित महिलेविरोधात कोर्टाच्या आदेशानुसार 2022 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकीनाका आणि गोवंडी पोलिस ठाण्यात ब्लॅकमेलिंग, प्रतिमा मलीन करणे, धमकावणे असे आरोप महिलेवर आहेत. राहुल शेवाळे यांनीच याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. तर त्यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार गोवंडी पोलिस ठाण्यातही त्याचवर्षी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवंडी पोलिसांत दाखल गुन्ह्याप्रकरणी संबंधित महिलेला वर्षभरापूर्वीच कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आता साकीनाका पोलिसांत दाखल गुन्ह्यातही कोर्टाने अंतरिम जामीन दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत हा जामीन असेल. दोन्ही पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये साधर्म्य असल्याने महिलेच्या वकिलांनी साकीनाका गुन्ह्यातही जामीन देण्याची याचिका कोर्टात केली होती. जामीन देताना कोर्टाने त्यासाठी चार अटी घातल्या आहेत.
संबंधित महिलेने तपास अधिकाऱ्यांसमोर 14 व 15 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हजर राहावे. तसेच तपास अधिकारी सांगतील त्यावेळी तपासात सहकार्य करावे, ही प्रमुख अट आहे. त्याचप्रमाणे सोशल मिडियात तक्रारदाराशी संबंधित कोणताही आक्षेपार्ह मजकूर किंवा फोटो प्रसिध्द करू नये, तक्रारदार, साक्षीदार किंवा या प्रकरणाशी संबंधित कुणाशीही संपर्क साधू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा अटी कोर्टाने घातल्या आहेत. तसेच तपास अधिकाऱ्यांना सध्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा बदललेला पत्ता, मोबाईल क्रमांकाची माहिती वेळोवेळी द्यावी, असे आदेश कोर्टाने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड. रूपाली पाटील (Rupali Patil) आणि त्यांची टीम संबंधित महिलेची बाजू मांडत आहेत. महिलेला न्याय देण्याचे कारण पुढे करून रूपाली पाटील यांनीच राहुल शेवाळेंविरोधात राजकारण तापवले होते. त्यातून पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. आता ऐन निवडणुकीत महिलेला जामीन मिळाल्यानंतरही रूपाली पाटील या राजकीय खेळी करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या प्रकरणात वकिली करणाऱ्या रूपाली पाटील या कोणाच्या सांगण्यावरून राहुल शेवाळेंच्या अडचणी वाढवत आहेत,याकडेही लक्ष राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.