Ramesh Kadam: भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास झाला, तरीही रमेश कदमांची क्रेझ कायम!

Mohol Vidhan Sabha Constituency: तरुण वर्ग कोणत्या कारणामुळे रमेश कदम यांचा चाहता झाला आहे?
Ramesh Kadam
Ramesh KadamSarkarnama
Published on
Updated on

मी वेगळं काय केलं नाही..आमदार म्हणून माझं कर्तव्यच होतं ते मी पार पाडलं...सत्ता ही गरीबांच्या दुःखावर फुंकर मारण्याकरता वापरली गेली पाहिजे..सत्तेचा योग्य वापर केला गेला पाहिजे..आणि मीदेखील तेच केलं म्हणूनच जनता माझ्या पाठीशी उभी राहिली..जनतेला आमदाराकडून आणखी काय हवं असतं..रस्ते वीज आणि पाणी ...आणि ते करणं आपलं कर्तव्यच आहे.. त्यामुळचं मी माझ्या मतदारसंघात मागेल त्याला पाणी ही योजना राबवली..त्यासाठी दीड कोटी रुपयांची गाडी घेतली.. 100 जणांच्या सहीचा अर्ज आला की मी तिथं बोअरची गाडी पाठवायचो आणि मोफत बोअर मारून दिला जायचा..त्या ठिकाणी हातपंप बसवला जायचा..मोटार बसवली जायची आणि जनतेला पाणी उपलब्ध व्हायचं.. मागेल त्याला पाणी या योजनेतून आपण जवळपास 650 बोअर घेतल्या.. त्याही स्व:खर्चातून घेतल्या.. मात्र आपण कधी कोणत्याही विकासकामाचं श्रेय घेतलं नाही.. एकदा पाणी दिलं की तिथं आपण उद्घाटनालाही गेलो नाही..किंवा त्याचं कधी राजकीय भांडवलही केलं नाही.. त्यामुळचं मोहोळच्या जनतेने विकासाचा सन्मान केला.

मोहोळची जनता विकासाची कामे करणाऱ्याच्या पाठिशी उभे राहते त्याचंचं उदाहरण म्हणजे...माझ्या उमेदवारी अर्ज भरायला आलेली तरुणांची गर्दी आहे. तरुणाईमध्ये ही जी क्रेझ निर्माण झाली आहे. ती मी केलेल्या कामांची दखल घेऊन दिलेली पोचपावती आहे. मागील साडेचार वर्षे मी तुरुंगात होतो. पण तुरुंगात असताना मलाही हा अंदाज आला नाही की अशा पद्धतीने आठ महिन्यांत आपण जी काही कामं केली आहेत. त्या कामाची लोकं जाणीव ठेवतील. यातूनच लोकांची माझ्याप्रति असलेली आपुलकी दिसून येते . अशी प्रतिक्रिया मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी 2019 च्या निवडणुकीवेळी दिली होती.

होय.. ही प्रतिक्रिया त्याच माजी आमदार रमेश कदम यांनी दिलेली आहे. ज्यांना 2015 मध्ये अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागलं होतं. हे सांगायचं कारण म्हणजे राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची 4 महिन्यांपूर्वीच तब्बल 8 वर्षांनंतर तुरुगांतून जामीनावर सुटका झाली. सुटका झाल्यानंतर ज्या दिवशी त्यांनी मोहोळ या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पाऊल ठेवलं, त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शेकडो तरुणांची उपस्थिती होती. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर जो उत्साह या मतदारसंघातील तरुणांमध्ये होता, तसाच उत्साह, तोच जल्लोष तुरुंगातून सुटून आलेल्या कदम यांच्या जंगी स्वागतावेळी दिसून आला होता.

रमेश कदम तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं! ची घोषणाबाजी करणारी शेकडो तरुणांची आणि मतदारांची ही उपस्थिती रमेश कदम यांची क्रेझ तसूभरही कमी झाली नसल्याचं चित्र दर्शवणारी होती. यावेळी देखील रमेश कदम यांनी आपल्या भाषणातून तरुणांची मनं जिंकण्याची संधी सोडली नाही. तुरुगांतून माझी सुटका झाली अन् मला अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले. पक्षात येण्याचा आग्रह केला. मात्र मी त्यांना एकच सांगितलं, मी आधी माझ्या मोहोळ मतदारसंघात जाणार. जनतेमध्ये फिरणार. त्यांची मतं जाणून घेणार आणि मग मतदार सांगतील त्याचप्रमाणेच माझी राजकीय दिशा ठरवणार, असे म्हणत रमेश कदम यांनी आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा मैदानात उतरून विकासाचं नवं राजकारण सुरू करण्याची घोषणा केली. यावेळी रमेश कदम यांनी मोहोळच्या जनतेला दिलेल्या या मोठेपणामुळं पुन्हा एकदा त्यांनी त्यांची मनं जिंकली होती. हे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणांच्या जलोष्षावरून अधोरेखित झालं होतं. परंतु आता इथे प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे रमेश कदम यांच्याबद्दल तरुणात इतकी क्रेझ का आहे? तरुण वर्ग कोणत्या कारणामुळे रमेश कदम यांचा चाहता झाला आहे?

या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचं एकच उत्तर मिळतं, ते म्हणजे 2014 मध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार रमेश कदम यांनी मतदारसंघात केलेली कामं. कदम यांनी निवडून आल्यानंतर विकासकामांचा धडाकाच सुरू केला होता. मागेल त्याला रस्ते, वीज अन् पाणी. यावर कदम यांनी जोर दिला. त्यांची "मागेल त्याला पाणी" ही योजना इतकी गाजली की मोहोळ मतदारसंघच काय अवघ्या सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. आक्रमक आणि धडाकेबाज वकृत्वशैली असलेल्या रमेश कदम यांनी मोहोळ मतदारसंघातील पाण्याची टंचाई दूर करण्याचा विडाच उचलला होता. त्यासाठी त्यांनी स्वखर्चातून दीड कोटी रुपयांची एक बोअरवेलची गाडीच खरेदी केली आणि मागेल त्याला पाणी ही योजना कार्यान्वित केली. यासाठी संबंधित गावातून 100 जणांच्या सहीचे एक पत्र फक्त आमदारांच्या कार्यालयात पोहोच करायला उशीर. की काही तासांतच गाडी अर्जदारांच्या परिसरात बोअर पाडताना दिसून यायची. रमेश कदम यांची ही योजना इतकी फेमस झाली की 8 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 850 बोअरवेल्स घेण्यात आल्या. एवढेच नाही तर त्यावर हातपंप, वीजपंपबसवून तत्काळ पाणी उपलब्ध करून देण्यात आले. जिथं बोअरला पाणी नाही लागले तिथं पाण्याचे टँकर पोहोचवण्याची व्यवस्था करायलाही रमेश कदम मागे हटले नाहीत. ऐन उन्हाळ्यात मतदारसंघात पाण्याचा सुकाळ जाणवू लागला आणि याच योजनेनं रमेश कदम तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले.

रमेश कदम हे केवळ पाणी या योजनेवरच थांबले नाहीत. त्यांनी मतदारसंघात मागेल त्याला रस्ते, वीज, आरोग्य व्यवस्था पुरवण्याचा धडाका सुरू केला होता. आमदारांचा आक्रमक स्वभाव पाहता प्रशासनही त्याच वेगाने काम करत होते. शिवाय जिथं दिरंगाई होत होती तिथं कदम यांनी स्वखर्चातून विकासकामांचा धडाका लावला. प्रशासकीय दिरंगाईची आडकाठी त्यांनी येऊ दिली नाही. एवढचं नाही तर रमेश कदम यांनी केवळ मोहोळ तालुक्यातच नाही नव्हे, तर मतदारसंघात येणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यासाठी देखील एक मोफत सेवा देणारी रुग्णावाहिका भेट दिली. त्यांच्या कामाचा धडाका तरुणांना भावत होता. प्रशासनावर वचक ठेवणारा आणि विकासाचं राजकारण करणारा एक डॅशिंग आमदार म्हणून मतदारसंघात आणि सोलापूर जिल्ह्यात त्यांची ओळख निर्माण झाली आणि त्यांच्या याच कामामुळे तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल एक प्रकारची क्रेझ निर्माण झाली होती. 2019 मध्ये त्यांनी कारागृहातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 23,597 मते मिळाली होती.

मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा 2009 पासून मागासवर्गीयसांठी राखीव झाला. प्रभावी वक्तृत्व, आक्रमक स्वभाव, चळवळीचा बाणा असलेले मागसवर्गीय समाजातून आलेले रमेश कदम हे पूर्वी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. ढोबळे हे 2009 च्या निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. ढोबळे यांच्यासोबत काम करत असताना रमेश कदम यांची अजित पवारांशी जवळीक वाढली होती. अजित पवारांनाही पक्षात दुसऱ्या फळीतील नेतृत्व निर्माण करायचे होते. त्याचवेळी अजित पवारांनी रमेश कदम यांना अण्णा भाऊ साठे महामंडळावर अध्यक्ष म्हणून संधी दिली. पुढे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले आणि ढोबळेंचा पत्ता कट झाला. रमेश कदम 2014 च्या विधानसभेत निवडून आले. दरम्यान, मोहोळ या मतदारसंघात मागासवर्गीय मतदारांचीही संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, 2014 पर्यंत मागासवर्गीयांच्या प्रश्नांना ज्या आत्मियतेनं न्याय मिळायला हवा होता किंवा मतदारसंघातील त्यांच्या समस्या सोडवल्या जायला हव्या होत्या त्याचं प्रमाण कमीचं होतं. कोणत्याही मतदारसंघाच्या मुख्य मागण्या पाणी, वीज, आणि रस्ते याच असतात. कदम यांनी नेमकं तेच हेरलं होतं आणि त्यांनी दलितांच्या प्रश्नांची आणि समस्यांची सोडवणूक करण्यास सुरुवात केली होती. एवढेच नाही तर पुढे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळात घोट्याळ्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतरही कदम यांनी मतदारसंघातील विकासकामे थांबू दिली नव्हती. म्हणूनच मतदारांमध्ये त्यांच्या विषयी आजही क्रेझ आहे.

Ramesh Kadam
Ayodhya Ram Mandir: उद्याच्या सुटीवर न्यायालयाकडून शिक्कामोर्तब; याचिका फेटाळली...

आमदार असतानाच कदम यांनी वाळू वाहतुकीमुळे मतदारसंघातील गावोगावच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून वाळु माफियांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. याप्रकरणी त्यांनी थेट तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे आणि पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. वाळूमाफियांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये रमेश कदम यांच्याबद्दल एक डॅशिंग आमदार म्हणून निर्माण झालेली प्रतिमा अधिकच उजळ झाली. या प्रकरणात रमेश कदम यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल झाला. त्यामुळे कदम अधिकच आक्रमक झाले. माझ्यावर गुन्हे दाखल करून प्रशासन वाळूमाफियांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्यावर गुन्हा दाखल करताना आम्ही वाळूमाफियांच्या विरोधातील तक्रारीचेही उत्तर द्या, असा जाबच प्रशासनाला विचारला होता. एवढचं नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा पवित्रा त्यांनी यावेळी घेतला होता. या संपू्र्ण प्रकरणात कदम हे प्रशासनाला थेट अंगावर घेत होते. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीत मतदारांमधून त्यांच्या या धाडसाचं अधिकच कौतुक केलं जात होतं.

आमदार म्हणून रमेश कदम प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना तुंरुगवास झाला होता. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडाळाचा निधी बोगस लाभार्थी दाखवून लाटणे, तो निधी स्वत:च्या खासगी संस्थांना वळवणे, तसेच त्या निधीतून महागड्या गाड्यांचे वाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्या आरोपात त्यांना शिक्षाही झाली. त्यावेळी त्यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. तिथंही कदम चर्चेत आलेच, कारण त्यांना मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला ज्या अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, त्याच सेलमध्ये रमेश कदम यांची रवानगी करण्यात आली होती. त्यावरून सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर मंजुळा शेट्ये खून प्रकरणातही कदम चर्चेत आले होते. कारागृहातील कर्मचाऱ्यांनी पुरावे नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासह कारागृह अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याच्या प्रकरणावरूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गेल्याच आठवड्यात त्यांना या प्रकरणातून दिलासा मिळाल्याचे वृत्त आहे. या सर्व प्रकारांनंतरही काही गोष्टी नमूद करण्यासारख्या आहेत.

रमेश कदम यांचं भ्रष्टाचारात नाव आलं असलं तरी त्यांनी मतदारसंघात केलेल्या कामांमुळे त्यांची क्रेझ कायम राहिली. त्यांनी तिकडे भ्रष्टाचार केला असेलही पण आमची कामं होत होती., आमचे प्रश्न सोडवले जात होते. त्यामुळे रमेश कदम यांची मतदारांमध्ये क्रेझ होती, असे मतही काही मतदरांनी व्यक्त केले. एवढचं नाहीतर ज्यावेळी रमेश कदम यांना तुरुंगवास झाला, त्यावेळी त्यांच्या जवळपास एक हजार समर्थकांनी आदित्य ठाकरे यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहून रमेश कदम यांना सोडवण्याची मागणी केली होती. यावरून जनतेमधील रमेश कदम यांच्याविषयी क्रेझ किती होती, याचा अंदाज लावता येणं शक्य आहे. असे असले तरी त्यांनी केलेल्या अपहाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेला गैरव्यवहार कधीच समर्थनीय ठरणार नाही, असेही मत मतदारसंघातील काही नागरिकांनी व्यक्त केले.

रमेश कदम आमदार झाल्यावरच चर्चेत आले होते असे नाही. त्यांनी मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेकवेळा आवाज उठवला आहे.. घायपातापासून केरसुणी तयार करणे, बांबूच्या टोपल्या आणि करंड्या बनविणे, तसेच लग्नकार्यात बँड, झांजा वाजवणं असा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मातंग समाजाची आर्थिक अवस्था इतर दलितांपेक्षाही दयनीय झाली होती. त्यामुळे या समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी रमेश कदम यांची धडपड सुरूच होती. सातत्याने ते समाजाचे प्रश्न उचलून धरत होते. त्याचीच दखल घेत या समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी 2003 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग नेमला होता. त्या आयोगाच्या अध्यक्षपदी रमेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती. समाजासाठी काम करण्याच्या मिळालेल्या या जबाबदारीच्या संधीचं सोनं करण्याचं काम रमेश कदम यांनी केलं. गावोगावी, वाड्या-पाड्यांवर जाऊन रमेश कदमांनी मातंग समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा आढावा घेतला होता. समाजाच्या समस्या मांडत असताना त्यांनी समाजातील मागासलेपण, शिक्षणाचा अभाव, बेरोजगारी, आर्थिक कुचंबना या बाबी विचारात घेतल्या. त्यानुसार रमेश कदम यांच्या समितीने अभ्यास अहवालात केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाणाऱ्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, मातंग विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, सामाजिक, शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी उपाययोजना करणे, त्यासाठी अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी रुपयांचे भाग भांडवल मिळावे, महामंडळाचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी सुमारे 450 पदांची करावी यासह विविध 83 शिफारशी त्यांनी सरकारकडे सादर केल्या होत्या. त्यांच्या या शिफारशींना मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता देखील दिली होती. रमेश कदम यांनी केलेल्या शिफारशी मातंग समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नवसंजीवनी ठरतील अशाच होत्या.

Edited by: Mangesh Mahale

Ramesh Kadam
Congress News: सोमनाथ ते अयोध्या : काँग्रेस ‘हिंदू’ विरोधी की ‘सेक्युलर’?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com