Bangaru laxman : असा उघड झाला होता राजकारणातील निलाजरेपणा...

Sarkarnama Podcast : ' तहलका'ने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी लाच घेतल्याचा व्हिडीओ जारी करून खळबळ माजवली होती.
Bangaru laxman
Bangaru laxmanSarkarnama
Published on
Updated on

दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तहलका वेबसाइटची पत्रकार परिषद सुरू झाली होती. देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी माहिती त्यातून समोर येणार होती. देशाच्या राजकारणातील एक सर्वात लाजिरवाणा प्रकार उघड होणार होता. या पत्रकार परिषदेत बनावट संरक्षण सौद्याचा व्हिडीओ दाखवण्यात आला, सौद्यासाठी लाच घेतानाची छायाचित्रे, चित्रीकरण दाखवण्यात आले. सौदा मिळवून देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण हे एका बनावट दलालाकडून एक लाख रुपये घेत असल्याचे अख्ख्या जगाने पाहिले होते.

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे देशावर, विविध राज्यांत काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसला पर्याय म्हणून भारतीय जनता पक्ष समोर येत होता. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपची सत्ता आलेली होती. भाजपची घौडदोड सुरू झाली होती. 'पार्टी वुइथ डिफरन्स' असं बिरुद एव्हाना भाजपच्या नावामागं लागायला सुरुवात झाली होती. हे सर्व सुरू असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे देशभरात खळबळ माजली. भाजपच्या प्रतिमेला धक्का बसला. तो डाग भाजपला कायमचा चिकटून राहणारा होता आणि झालेही तसेच. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना लाच घेताना अख्ख्या देशानं पाहिलं होते. शस्त्रास्त्रांचे दलाल असल्याचं भासवून काही पत्रकारांनी छुप्या कॅमेऱ्याने त्याचं चित्रीकरण केलं होतं. या प्रकारानंतर बंगारू लक्ष्मण यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांना या प्रकरणी चार वर्षांची शिक्षा झाली होती. नंतर त्यांची जामीनावर त्यांची सुटका झाली होती.

त्या काळात तहलकाची शोधपत्रकारिता जोरात सुरू होती, लोकांना त्याचं प्रचंड आकर्षण होतं. स्टिंग ऑपरेशनला त्यानंतर वलय मिळत गेलं. 'तहलका डॉट कॉम'च्या काही पत्रकारांनी शस्त्रास्त्र दलाल असल्याचे सांगत हे स्टिंग केलं होतं. संरक्षण खात्याशी संबंधित एक सौदा करायचा आहे, असं त्यांनी भासवलं होतं. त्यासाठी बंगारू लक्ष्मण यांना एक लाख रुपयांची लाच मागितली होती. ते एक लाख रुपये स्वीकारताना छुप्या कॅमेऱ्यानं त्यांना टिपलं होतं आणि त्यासरशी त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. बोफोर्स, टेलिकॉम, कॉमनवेल्थ आदी घोटाळ्यांवरून काँग्रेसला (Congress) घेरणारा भाजप बंगारू लक्ष्मण यांच्यामुळं तोंडघशी पडला होती. 'पार्टी वुइथ डिफरन्स' या भाजपच्या प्रतिमेला तडा गेला होता. सगळ्यांचेच पाय मातीचे असतात, हे त्यानंतर लोकांच्या लक्षात आलं होतं.

तहलका या शब्दाचा अर्थ खळबळ माजवून देणं असा आहे. या अर्थाप्रमाणेच तहलकानं काम सुरू केलं होतं. बंगारू लक्ष्मण यांच्यावर 13 मार्च 2001 रोजी करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे देशभरात खळबळ माजली होती, राजकारण तापलं होतं. संसदेच्या अधिवेशनात या प्रकरणाचे पडसाद उमटले होते. आपण शस्त्रास्त्रांचे दलाल आहोत, अशी बतावणी करत तहलकाच्या पत्रकारांनी बंगारू लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधला होता. बनावट दलाल बनलेल्या या पत्रकारांनी आपण ब्रिटनचे असल्याचं आणि तेथील वेस्ट एंड नावाच्या शस्त्रास्त्र कंपनीशी संबंधित असल्याची बतावणी केली होती. हा सौदा पूर्ण करण्यासाठी बंगारू लक्ष्मण मध्यस्थी करणार, असं ठरलं होतं. त्यासाठीच त्यांना एक लाख रुपयांची लाच देण्यात आली होती.

आपल्याविरोधात कट रचून हे कृत्य करण्यात आलं, असे बंगारू लक्ष्मण यांनी त्यानंतर सांगितलं होतं. त्यांना भाजपच्या (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अनेक दिवस माध्यमांत या प्रकरणाची चर्चा रंगली होती. गावागावांतही चवीने चर्चा व्हायच्या. भाजपच्या पार्टी वुईथ डिफरन्स या प्रतिमेला बसलेला हा पहिला सर्वात मोठा धक्का होता. या प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारची कोंडी केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत सरकारच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. जॉर्ज फर्नांडीस यांचा समता पक्ष हा त्यावेळी एनडीएमध्ये होता. जॉर्ज यांच्या निकटवर्तीय जया जेटली यांचंही नाव या प्रकरणात आलं होतं. शस्त्रास्त्रांचे बनावट दलाल बनलेल्या पत्रकारांशी चर्चा करतानाचा त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. समता पार्टीचे माजी कोशाध्यक्ष आर. के. जैन हेही या प्रकरणात अडकले होते.

तहलकाच्या पत्रकारांनी लष्कराच्या काही बड्या अधिकार्‍यांची नावेही समोर आणली होती. त्यानंतर एका मेजर जनरलसह चार बड्या अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं. यावर विरोधकांचं समाधान झालं नव्हतं. त्यांनी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यातूनच एनडीएमधील घटक पक्षांत फूट पडली आणि तृणमूल काँग्रेस एनडीएमधून बाहेर पडला. ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिला. भाजपसाठी हा मोठा धक्का होता. तहलकाच्या या प्रकरणावरून तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारने मात्र राजीनामा देण्यास इन्कार केला होता. समता पार्टीच्या अध्यक्ष जया जेटली यांनी आधीच राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी जॉर्ज यांनी संरक्षण मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. तहलकानं उघडकीस आणलेल्या या प्रकरणामुळे वाजपेयी सरकारची मोठी नाचक्की झाली होती.

Bangaru laxman
Yashvantrao Gadakh : यशवंतराव गडाखांनी बाळासाहेब विखे पाटील यांना पराभूत केलं, पण...

गेल्या 50 वर्षांत कोणत्याही सरकारवर झालेल्या आरोपांपेक्षा हे आरोप गंभीर असल्याचं नंतर वाजपेयी यांनी सांगितलं होतं. या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत करण्याचे आदेश त्यांनी दिले, मात्र या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती उपलब्ध करून देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळं चौकशीसाठी सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. वेंकटस्वामी यांची नियुक्ती केली. नंतर मार्च 2003 मध्ये न्यायमूर्ती फुकन आयोग स्थापन करण्यात आला. अंतिम अहवाल यायच्या आधीच सरकारनं हे प्रकरण सीबीआयकडं सोपवलं होतं. न्यायालयानं या प्रकरणात बंगारू लक्ष्मण यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. नंतर त्यांची जामीनावर मुक्तता झाली होती. ऑपरेशन वेस्ट एंडनंतर बंगारू लक्ष्मण यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. त्यापूर्वी 1999 ते 2000 पर्यंत त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. 1 मार्च 2014 रोजी त्यांचं सिकंदराबाद येथे निधन झालं. त्यांच्यावर तेथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.

शोध पत्रकारितेच्या क्षेत्रात तरुण तेजपाल यांचं नाव आदरानं घेतलं जायचं. पुढे काही वर्षांनी आपल्याच एका महिला सहकाऱ्याचं लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात ते अडकले. तरुण तेजपाल, अनिरुद्ध बहल आणि संजय दुबे यांनी 1999 मध्ये तहलका डॉट कॉम ही वेबसाइट सुरू केली होती. त्यापूर्वी हे तिघेही ऑऊटलूकमध्ये काम करायचे. ऑपरेशन वेस्ट एंड पूर्ण करण्यासाठी सात महिने लागल्याची माहिती तरुण तेजपाल यांनी दिली होती. संरक्षण सौद्यांमध्ये दलाली वाढली आहे, त्यातून अनेक जणांनी गडगंज संपत्ती गोळा केल्याची माहिती या तिघांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी लंडन येथे वेस्ट एंड नावाची बनावट कंपनी स्थापन केली. त्याद्वारे संरक्षण सौद्यांसाठी लष्करी अधिकार्‍यांशी संपर्क साधला होता. त्यांनाही लाच दिली होती. अधिकार्‍यांना दिलेल्या लाचेची रक्कम 10 हजार ते 60 हजार रुपये अशी होती. अनिरूद्ध बहल आणि मॅथ्यू सॅम्युएल यांनी हे स्टिंग केले होते.

Bangaru laxman
Vasantdada Patil : गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री : वसंतदादा पाटील

शस्त्रास्त्रांचे व्यापारी असल्याचे भासवून बहल आणि सॅम्युएल यांनी लष्करातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी आधीच लाच दिली होती, त्यामुळे त्यांना अनेक मध्यस्थांशी संपर्क साधता आला. भारतीय लष्कराला थर्मल इंजिनियरिंग कॅमेऱ्यांची गरज असल्याचं त्यांना कळालं होतं. आधीच्या काही सौद्यांमध्ये कमिशन खोरी झाल्याचे त्यांना काही अधिकार्‍यांनी सांगितलं होतं. ते संभाषण त्यांनी छुप्या कॅमेऱ्याने चित्रित केलं. या दोघांनी समता पक्षाच्या अध्यक्ष जया जेटली यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना निरोप देण्याचं मान्य केलं. याच प्रकियेत त्यांची बंगारू लक्ष्मण यांच्याशी ओळख झाली. त्यांनी नवीन वर्षाची छोटी भेट म्हणून दीड लाख रुपये स्वीकारले होते. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. ऑपरेशन वेस्ट एंडमध्ये एकूण 100 तासांचे चित्रीकरण झाले होते.

तहलकाने केलेल्या या स्टिंग ऑपरेशनवर नंतर अनेक प्रश्नचिन्हही उपस्थित झाले होते. माहिती प्राप्त करण्यासाठी काही अधिकाऱ्यांना महिला पुरवल्याचाही तहलकावर आरोप झाला होता, मात्र तरुण तेजपाल यांनी त्याचा इन्कार केला होता. या पत्रकारांना अटक करावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी केली होती. तरुण तेजपाल यांना ठार मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आलं होतं. नंतर तहलकाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. त्याला कंटाळून अनिरुद्ध बहल तहलकामधून बाहेर पडले आणि त्यांनी कोब्रापोस्ट डॉट कॉम ही वेबसाइट सुरू केली. याद्वारे त्यांनी केलेले अनेक स्टिंग ऑपरेशन गाजले आहेत. गुजरात दंगलीशी संबंधितही एक स्टिंग ऑपरेशन तहलकाने केलं होतं. तहलकाने अनेक महत्वाचे अहवाल दडपले, त्यांना प्रसिद्धी दिली नाही, असे आरोप त्यांच्याच कर्मचार्‍यांकडून करण्यात आले होते.

Bangaru laxman
Vasantdada Patil : गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री : वसंतदादा पाटील

तरुण तेजपाल यांनी नंतर 2004 मध्ये तहलका साप्ताहिक, टॅब्लॉइड स्वरूपात सुरू केले. 2007 मध्ये त्याचे मासिकात रुपांतर करण्यात आले. तरुण तेजपाल आणि तहलकाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले. व्यवसायात त्यांना मोठे नुकसानही सहन करावे लागले. नोव्हेंबर 2013 मध्ये आपल्याच एका महिला सहकाऱ्याचे पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप तहलकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्यावर झाला होता. गोवा येथे तहलकानं आयोजित केलेल्या थिंकफेस्ट कॉन्फरन्स दरम्यान हा प्रकार घडला होता. हे प्रकरण खूप गाजलं होतं. 30 नोव्हेंबर 2013 रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. 2014 मध्ये आईचे निधन झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. त्यावेळेसपासून ते बाहेरच होते. गोव्यातील जलदगती न्यायालयानं 2021 मध्ये त्यांची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली. आपल्या स्टिंग ऑपरेशमनुळे देशभरात खळबळ माजवणाऱ्या तहलकाचं नाव कालांतराने मागं पडत गेलें. तहलका नितयकालिक आजही प्रकाशित होते, मात्र आता त्याची पूर्वीसारखी चर्चा होत नाही. असे असले तरी तरुण तेजपाल आणि तहलकानं शोध पत्रकारितेला एक नवा आयाम दिला, हे नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com