Vasantdada Patil : गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री : वसंतदादा पाटील

Vasantdada Patil Sarkarnama Podcast : राज्यातील सहकार, शिक्षण क्षेत्रातील प्रगतीची मुहूर्तमेढ वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रोवली होती.
Vasantdada Patil Sarkarnama Podcast
Vasantdada Patil Sarkarnama PodcastSarkarnama

Sarkarnama Analysis : शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची बसस्थानकांवर मोठी गर्दी व्हायची. 25-30 वर्षांपूर्वीं हे चित्र राज्यातील सर्वच बसस्थानकांवर पाहायला मिळायचं. या विद्यार्थ्यांना आपापल्या गावांवरून येणाऱ्या बसची प्रतीक्षा असे. कारण त्या बसमधून त्यांच्या घरून त्यांचा जेवणाचा डबा येत असे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरांत राहून शिक्षण घेऊ शकले. तसं पाहिलं तर ही सुविधा तशी छोटीच, मात्र ती महाराष्ट्राच्या उभारणीत मोठा हातभार लावणारी ठरली. ग्रामीण महाराष्ट्रातील काही पिढ्यांचं शिक्षण घेणं या सुविधेमुळे सुकर झालं. बिकट परिस्थितीमुळे जास्त शिक्षण घेऊ न शकलेल्या महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचं महत्व ओळखून ही दूरदृष्टी दाखवली होती. होय, ते मुख्यमंत्री म्हणजे वसंतदादा पाटील. त्यांच्या अशा समाजपयोगी निर्णयांमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते होते.

प्रगत महाराष्ट्राचे शिल्पकार, मराठा समाजातील पहिले मातब्बर नेते म्हणून वसंतदादा पाटील यांना ओळखलं जातं. महाराष्ट्रातील (Maharashtra ) प्रत्येक गावात वसंतदादा पाटील यांचे कार्यकर्ते होते. त्यामुळे गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे. दोनवेळा मु्ख्यमंत्रीपदी राहिलेल्या वसंतदादांनी शेती, शिक्षण, उद्योग, सहकार आदी क्षेत्रांत भरीव कामगिरी केली. समाज, नातेवाईकांतून प्रचंड विरोध असतानाही वसंतदादांनी विधवा असलेल्या शालीनाताई पाटील यांच्याशी दुसरं लग्न करून आपण सुधारणावादी असल्याचा संदेश दिला होता. त्यांच्याच काळात महाराष्ट्रातील सहकार चळवळीला निर्णायक वळण मिळालं. स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला.

वसंतदादा यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 रोजी पद्माळे (ता. मिरज, जि. सांगली (Sangli)) येथे झाला. दादांच्या जन्माच्या एक वर्षानंतर म्हणजे 1918 मध्ये त्यांचे वडील बंडूजी आणि आई रक्मिणीबाई पाटील यांचा प्लेगच्या साथीमुळे एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा सांभाळ आजींनी केला. अशा कौटुंबिक परिस्थितीमुळे दादांना जास्त शिक्षण घेता आले नाही. ते सातवीपर्यंच शिकू शकले, मात्र त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या उपाययोजनांमुळे पुढील काळात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं सोपं झालं. जास्त शिकू न शकलेले, पण सर्वात हुशार राजकीय नेते, असंही त्यांचं वर्णन केलं जातं.

Vasantdada Patil Sarkarnama Podcast
Gulzarilal Nanda : दोनदा पंतप्रधान आणि राहायला घर नाही...!

देश पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली होती. अगदी कमी वयातही, म्हणजे अंदाजे 14 वर्षे वय असताना 1930 पासून दादांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात रेल्वेचं नुकसान करणं, टेलीफोनच्या तारा तोडणं, पिस्तुल, बाँबचा वापर करून त्यांनी इंग्रजांना धडकी भरवली होती. कायदेभंग चळवळ सुरू असताना सोलापूरचे (Solapur) चार तरुण शहीद झाले होते. त्या हुतात्म्यांची आठवण राहावी म्हणून दादांनी चहा सोडला होता. काही काळ त्यांना भूमिगत व्हावं लागलं होतं. स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतल्यामुळं त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

24 जुलै 1943 रोजी दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या खांद्याला गोळी लागली होती. तो दिवस सांगली जिल्ह्याच्या इतिहासात शौर्य दिवस म्हणून ओळखला जातो. 22 जून 1943 रोजी दादा आणि हिंदूराव पाटील हे चित्रपट पाहण्यासाठी जयश्री टॉकीजला गेले होते. पोलि‍सांना याचा सुगावा लागला होता. त्यामुळे सशस्त्र फौजफाटा तैनात करण्यात आला. चित्रपटगृहातून बाहेर आल्यानंतर दादांना त्याची कल्पना आली. त्यामुळे पोलि‍सांच्या स्वाधीन होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पोलिसांनी त्यांची तुरुंगात रवानगी केली.

दादा आणि त्यांचे सहकारी तुरुंग फोडून बाहेर पडण्याच्या तयारीला लागले होते. दरम्यान, त्यांच्या वकीलांनी न्यायालयात धाव घेतली होती, 26 जुलैची तारीख पडली होती. मात्र त्यापूर्वीच 24 जुलै रोजी दादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तुरुंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. स्वच्छतागृहाला जाण्याचे निमित्त करून दादा दुपारी अडीचच्या सुमारास खोलीतून बाहेर पडले. त्यांच्यासोबत हिंदूराव पाटीस आणि सशस्त्र पोलिस होते. दादांनी पहारेकर्‍याला घट्ट पकडून ठेवलं, हिंदुरावांनी बंदूक हिसकावून घेतली. तुरुंगाच्या प्रवेशद्वाराकडं धाव घेत तेथील पोलिसांच्या बंदुकाही त्यांनी हिसकावून घेतल्या.

दादांसह सर्वांनी पाणी असलेल्या खंदकात उड्या घेतल्या. हिंदुरावांची उडी पाण्यात पडण्याऐवजी काठावर पडली आणि त्यांचे दोन्ही पाय मोडले. त्यामुळे त्यांना हलता आलं नाही. अन्य क्रांतिकारक हवेत गोळीबर करत कृष्णा नदीकडे धावले. पोलिस त्यांचा पाठलाग करत होते. पोलिसांच्या गोळीबारात काही क्रांतिकारक शहीद झाले. पोलिसांची एक गोळी दादांच्या खांद्याला लागून आरपार गेली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालला. त्यांना सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सातारा, सांगली भागात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीने दादा स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते.

Vasantdada Patil Sarkarnama Podcast
Gopinath Munde : लोकनेते, जादूची कांडी... अर्थात गोपीनाथ मुंडे

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 वर्षे त्यांनी सांगलीचं प्रतिनिधित्व केलं. 1972 मध्ये ते राज्यात मंत्री झाले. 17 मे 1977 ते 18 जुलै 1978 या काळात ते पहिल्यांदा मुखयमंत्रिपदावर राहिले. दुसऱ्यांदा 2 फेब्रुवारी 1983 चे 1 जून 1985 या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवले. एकूण चार वर्षे ते मुख्यमंत्रिपदी राहिले. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना 1978 मध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना शरद पवार हे 40 आमदारांना घेऊन सरकारमधून बाहेर पडले. त्यामुळे सरकार पडलं आणि वसंतदादांचे मुख्यमंत्रिपद गेलं. त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचं सरकार स्थापन झालं. दोनदा मुख्यमंत्री झाल्यानंतर दादा काही काळ राजस्थानचे राज्यपालही झाले होते. दादांनी राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. राज्याच्या ग्रमीण भागात काँग्रेसचा प्रभाव कायम राहिला, त्यात दादांचा मोठा वाटा आहे.

दादांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्यात संस्थात्मक जााळं निर्माण केलं. सहकार क्षेत्राची जी प्रगती झाली, त्याची बीजे दादांनी रोवली होती. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना दादांचीच देण आहे. दादांचं शिक्षण कमी झालेलं असलं तरी शिक्षणाचं महत्व त्यांना कळलेलं होतं. त्यामुळे राज्यातील खेडोपाडी शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती. त्यामुळेच महाराष्ट्र आज शिक्षण, शेती, सहकार क्षेत्रात अग्रेसर आहे. दादांचं वागणं मोकळेढाकळं होतं. त्यामुळे त्यांची कार्यकर्त्यांशी, लोकांशी घट्ट नाळ जोडली गेली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दादांचा सक्रिय सहभाग होता. त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी होती. त्यातूनच दूरगामी परिणाम करणारे सकारात्मक निर्णय घेण्याची दृष्टी त्यांना लाभली असावी. शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांच्या जगण्याची परिपूर्ण माहिती असल्यामुळेच सहकार, शेती, शिक्षण क्षेत्राला वळण देणारे निर्णय ते घेऊ शकले.

मुख्यमंत्री असताना दादांनी 1983 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतन विनाअनुदानित तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी अर्थतज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली होती. त्या समितीच्या निष्कर्षांतूनच विदर्भ, मराठवाड्याचा अनुशेष या संज्ञा समोर आल्या. मुख्यमंत्री असताना दादांनी राज्याच्या हिताचे विविध निर्णय घेतले. त्यामुळे त्यांना टीकेचाही सामना करावा लागला, मात्र ते बधले नाहीत. मुलींना मोफत शालेय शिक्षणाचा क्रांतिकारक निर्णय दादांनीच घेतलेला आहे. मुक्त विद्यापीठाची स्थापना त्यांच्याच काळात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी एसटीचा मोफत प्रवास, शिक्षणासाठी परगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्याची एसटीतून मोफत वाहतूक, शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा हे दूरगामी परिणाम करणारे निर्णयही दादांनीच घेतले होते.

सहकार क्षेत्राचा विकास आणि विस्ताराला दादांनी एक निश्चित दिशा दिली. सहकार क्षेत्राचा विकास हा दादांनी महाराष्ट्राच्या उभारणीसाठी केलेलं सर्वाच मोठं काम. राज्यात आज पतसंस्थांचं जाळं निर्माण झाल्याचं दिसून येतं. त्याचंही श्रेयही दादांनाच जातं. ग्रामीण विकास, कृषी, कृषी उद्योग विकास, दुग्धविकास, कुक्कुटपालन या क्षेत्रात त्यांनी सहकार रुजवला. दादांनी राज्यात सहकारी तत्त्वावर तेल गिरण्या, सिमेंट पाइपचे कारखाने, सूत गिरण्या, खताचे कारखाने, कृषी औजारांचे उत्पादन, शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू केले. 1956-57 मध्ये त्यांनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. उसाची लागवड कशा पद्धतीने करायची, याचे प्रात्यक्षिक ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्यायचे. कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थांची निर्मितीही करावी, अशी दूरदृष्टी दादांनी त्या काळात दाखवली होती. साखर कारखान्यांच्या परिसरात आरोग्य, शिक्षण, अन्य उद्योग यासह मूलभूत सुविधांसाठी वेगळा निधी काढून ठेवण्याची संकल्पना दादांचीच. ही संकल्पना आज कारखान्यांच्या परिसरात आकाराला आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना दादांनीच केली. आता या संस्थेचं नाव वसंतदादा पाटील शुगर इन्स्टीटयूट असं आहे. यामुळं संशोधनाला चालना मिळाली. सहकार क्षेत्रातील या कामगिरीची दखल घेऊन त्यांना 1967 मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं. वयाच्या 71 व्या वर्षी 1 मार्च 1989 रोजी मुंबईत दादांचं निधन झालं.

Vasantdada Patil Sarkarnama Podcast
Video Jayant Patil: विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जयंतरावांनी विशाल पाटील अन् विश्वजीत कदमांचं टेन्शन वाढवलं

वसंतदादांच्या पत्नी मालतीताई यांचं 1960 च्या दशकात निधन झालं. मालतीताई यांच्या निधनानंतर दादांनी शालीनीताई पाटील यांच्याशी विवाह केला. शालीनीताई या विधवा होत्या. त्यांना चार अपत्ये होती. त्यामुळे त्यांच्याशी विवाहावरून वसंतदादांवर टीका सुरू झाली. मुंबईतील निवासस्थानी आठजणांच्या उपस्थितीत वसंतदादा आणि शालीनीताई यांचा विवाह झाला. ही बातमी कळताच सांगली जिल्ह्यात नाराजी पसरली. दादा आणि शालीनीताई दोघेही 96 कुळी मराठा, मात्र त्या काळात दुसरा विवाह समाजाला रुचणारा नव्हता. दुसऱ्या विवाहामुळे दादांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, अशी चर्चा सुरू झाली. तरीही दादांनी हा धाडसी निर्णय घेतला होता आणि त्यावर ते ठाम राहिले. दादा आणि शालीनीताई यांना अपत्य झालं नाही. दादा आणि मालतीताई यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील हे सांगलीचे खासदार राहिले होते. 2005 मध्ये प्रकाशबापूंचं निधन झालं. त्यानंतर त्यांचे पुत्र, दादांचे नातू प्रतीक पाटील दोनदा खासदार झाले. प्रतीक पाटील यांना केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दादांचे दुसरे नातू विशाल पाटील हे सांगली मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले. ही दादांचीच पुण्याई म्हणावी लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com